Saturday, November 24, 2012

'लाईट' महात्म्य


गेल्या आठवड्यात म्युनिक मध्ये सकाळी सकाळी वीज गेली आणि अर्ध्या - पाउण तासासाठी सगळ्या घरात हाहाकार झाला! सकाळी उठल्यावर चहा/कॉफी नाही हो!! अगदीच वीजेपुढे लाचारी आली. काहीच कामं होईनात. कधी नव्हे तो candle light breakfast केला. तेवढंच नाही,  candle light प्रात:विधी, candle light अंघोळ अशा बऱ्याच गोष्टी झाल्या. आता काही लवकर वीज येत नाही.. फुकटची सुट्टी मिळाली.. दिवसभर आळस करायचा.. असे इमले बांधत असतानाच उजेड पडला. अगदी शेखचिल्ली च्या गोष्टीसारखं झालं. असो.

पण या वीजसत्रामुळे मायदेशातले load-shedding चे एपिसोड्स डोळ्यासमोर तरळून गेले. खरं सांगू का.. लहानपणी मला संध्याकाळी वीज गेलेली मनापासून आवडत असे. ('लाईट' गेलेली आवडत असे असं म्हणायला हवं.) आपल्याकडे वीज गेल्याने तत्काळ बंद पडणारी आणि नडणारी गोष्ट म्हणजे दिवे. त्यामुळे वीज आणि लाईट हे समानार्थी शब्द झाले आहेत. (एकदा मराठीच्या पेपर मध्ये मी असा लिहिलं होतं! चपला, चंचला, दामिनी असे इतरही वीजेचे समानार्थी शब्द आहेत, ते अपेक्षित होते म्हणे! असो.) तर लाईट गेले की मला आनंद होत असे. मुख्य म्हणजे सर्वव्यापी, सर्वश्रेष्ठ  असे ते जेवण (पर्यायाने स्वैपाक) बंद पडत नसे. gas च्या शेगड्याना धन्यवाद. (त्या हल्ली वेगळ्या कारणांमुळे ७ cylinders नंतर बंद पडतात.) त्यामुळे इथल्या सारखा उदरभरणावर काहीही परिणाम होत नसे. 

दुसरी गोष्ट म्हणजे अभ्यास बंद. officially!! आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे.

आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मेणबत्त्या!! त्या लावायला, त्यांच्या ज्योतीशी खेळायला आणि लाईट आल्यावर त्या फुंकर मारून विझवायला अपार मजा येत असे. मेणबत्तीच्या त्या अंधुक प्रकाशात सावल्यांचे खेळ बघत राहणे हा माझा आवडता छंद होता. टेबलावर ठेवलेल्या मेणबत्तीची स्वत: चीच माडाएवढी सावली समोरच्या भिंतीपर्यंत पडत असे. तिची ज्योत थोडासा वारा आला की लपलपत असे. नंतर बॅटरी (torch ला मराठीत बॅटरी म्हणतात.) आल्यावर ही मेणबत्त्यांची मजा संपली.
आम्ही काही वर्षे कोकणात खेड मध्ये राहायला होतो. तिथे आमच्या समोरच्या काणे वाड्याच्या ओसरीत एक भला मोठा जुना लाकडी झोपाळा होता. लाईट गेले की त्या झोपाळ्यावर आजूबाजूची चिल्ली-पिल्ली गर्दी करत. सगळ्यांना कंठ फुटत. मग शुभं करोति पासून सुरु झालेली यात्रा रामरक्षा, पाढे, कविता अशी स्टेशने घेत हिंदी गाण्यांपर्यंत येई. सारं काही अंधारात! ही अंधारातली मैफल अशी रंगात आलेली असतानाच लाईट येई. आणि मग मेणबत्त्या विझवायची स्पर्धा सुरु होत असे.

आता गेले बरेच दिवस लाईट जाण्याचा अनुभव मिळालेला नसल्यामुळे असेल कदाचित, पण मला कधी कधी आपणच थोडा वेळ घरातली वीज बंद करून टाकावी असं वाटतं. घरातले आपण सगळे जण  वेगळ्या दिशांना आपापल्या gadgets मध्ये तोंडं खुपसून बसलोय याची कधी जाणीव झाली की वाटतंच वाटतं. अर्थात असे जर लाईट घालवले, तर तशीच मजा येणार नाही ही गोष्ट वेगळी. 

काही गोष्टी उगाचच लक्ष्यात राहतात आणि उगाचच आपण त्या miss करतो. 'लाईट जाणे' ही नेहमीच त्यांच्यापैकी एक राहील.

Wednesday, October 10, 2012

उकल

ही पूर्वीच लिहिलेली एक गोष्ट इथेही जोडते आहे.
उकल
"सर्व नागरीकांस कळविण्यात येते की, आपल्या शहरात बेमुदत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. कुणीही घराबहेर पडू नये."
पोलिसांची गाडी पुन्हा एकदा लाउड स्पीकर वरून सूचना देत गेली. डॉ. प्रकाश गॅलरीतून आत आले. त्यांचा चेहरा चिंताग्रस्त दिसत होता. शहरात सकाळपासून तणाव होता. दंगलीचे वारे वहात होते. मीनूची शाळा सुटून ४ तास झाले होते. तिला घेऊन येणारी रिक्षा अजून न अल्याने घरातील सर्वांचा जीव कासावीस झाला होता. कर्फ्यू असल्याने घराबाहेर पडायलाही बंदी. त्यामुळे सगळेच हतबल झाले होते. डॉ. प्रकाश मीनूला शोधण्यासाठी बाहेर पडले असता पोलिसांनी तिचा फोटो ठेऊन घेऊन त्यांना घरी परतण्यास सांगितले होते. मीनूच्या आईचा - सरीताचा अखंड स्तोत्र, मंत्र, जप यांचा घोष सुरू होता. घरातले देव केव्हाच पाण्यात बुडाले होते. 
"कशाला तुम्ही दोघे एवढी काळजी करता? येईल मीनू!" आजोबांनी वातावरण किंचित हलके करण्याचा केविलवाणा प्रयत्न करून पाहिला. पण त्यांचं हे अवसान उसनं होतं, हे सर्वांनाच  माहिती होतं. कारण मीनूचे घरात सर्वात जास्त मेतकूट आजोबांशीच जमत असे. आजोबाही तिच्याशी खेळता खेळता तिच्याएवढेच होत. ती वापरणारी सगळी संबोधनंही त्यांची होऊन जात. एरवी स्वतःच्या मुलाला बाबा, सुनेला आई आणि बायकोला आजी म्हणणारे आजोबा विरळाच!! नातीच्या काळजीने त्यांचा जीव टांगणीला लागला होता.
इतक्यात बंगल्याचे फाटक उघडून पोलिसांची जीप आत आली. सगळ्यांनीच खाली धाव घेतली. जीपमधून हवालदार बाहेर पडला. आणि त्याच्यामागून उडी मारून बाहेर पडली, लाडकी मीनू!! तिला पाहताच बाहेर पडलेले सुटकेचे निःश्वास हवालदारानेही ऐकले. मीनूला ती गुदमरेपर्यंत घट्ट जवळ घेऊन सगळ्यांनी साठलेल्या अश्रूंना वाट करून दिली.
            "शाळेजवळच्या चौकातून उचलली हिला. गाडीत सुखरूप होती. चौकात दंगा पेटला होता. त्यामुळे आणायला उशीर झाला." हवालदार म्हणाला. डॉ. प्रकाशनी त्याचे १० वेळा आभार मानले. त्याला भेट देऊ केली. पण ते पैसे न स्वीकारताच तो निघून गेला.
आजोबांना त्यांचा खेळगडी परत मिळाला खरा, पण तो आता पूर्वीसारखा राहिला नव्हता. दंगा करणारी, खोड्या काढणारी मीनू आता शांत झाली होती. अकाली मोठी झाल्यासारखी. कधी शून्यात नजर लावून बसायची, कधी चिडचिड करायची. 'त्या' चौकातून कधी गेली, तर आपोआप तिला हुंदका यायचा. त्या दंगलीच्या दिवशी तिने काय पाहिलं होतं, हे कुणी तिच्या तोंडून कधीच नाही ऐकलं. कुणी ते विचारलंही नाही. पण तिच्या अवस्थेवरून ते स्पष्टच होत होतं. तिनं पाहिली होती नंग्या तलवारींनिशी संहाराचा खेळ खेळणारी चार - सहा अविचारी टाळकी. त्या एवढ्याश्या जीवाच्या कोऱ्या मनावर तो प्रसंग कायमचा कोरला गेला होता. तिरस्काराची बीजं कुठंतरी खोलवर रुजली गेली होती. तीही अजाणत्या वयात. हे सगळं कळत असूनही त्याला उपाय काय, हे कुणालाच सुचत नव्हतं.
दिवसागणिक मीनूचा विक्षिप्तपणा वाढत होता. रात्री - अपरात्री वाईट स्वप्नं पडून तिला जाग यायची. नंतर नंतर तर झोपही लागेनाशी झाली. तिचे हाल बघवत नव्हते. तिच्या मनात  रुजलेली ती तिरस्काराची बीजं त्याला अंकूर फुटायच्या आत खुडायला हवी होती. तिरस्कारावर प्रेमाचा, संहारावर निर्मितीचा नेहमी विजय होतो, हे तिला पटवून द्यायला हवं होतं. पण हे सगळं शब्दात समजावून सांगण्याइतकी ती मोठी नव्हती. सारेच असहाय्य झाले होते.
एक दिवस संध्याकाळी टेकडीवर फिरून आल्यावर आजोबांच्या चेहऱ्यावर अनेक दिवसांनी सगळ्यांनी आनंद पाहिला. कोड्याची उकल झाल्याचा आनंद! दुसऱ्या दिवशी पहाटेच उठून मीनूला घेऊन ते बाहेर पडले. सुरुवातीला नाखूष असणारी मीनू टेकडीवर सूर्योदय पाहताच जराशी माणसांत आली. त्या उगवत्या सूर्यासमोर आजोबा अणि त्यांची करंगळी धरून त्यांची ही नात असे उभे होते. नंतर आजोबांनी पिशवीतून चार - सहा बिया आणि खुरपं काढलं. मीनूला एका कोपऱ्यात खड्डा खणायला लावला. त्यात त्या बिया ठेवून खड्ड्यावर माती टाकायला सांगितली. "आता बघ मीन्या, बाप्पा कशी जादू करतो ते!" आजोबा म्हणाले.
त्या दिवसापसून रोज मीनू अणि आजोबा सूर्योदयाच्या वेळी टेकडीवर जाऊ लागले. उगवत्या सूर्याला नमस्कार करायचा, मग वॉटर-बॅगेतून आणलेलं पाणी बियांच्या ठिकाणी घालायचं, माती मोकळी करायची, असा रोजचाच क्रम झाला. लवकरच कोंब फुटला. मीनूला त्या दिवशीएवढं आनंदी कधीच कुणी पाहिलं नव्हतं. आता ते एवढंसं रोप मीनूचं मूल झालं. आजोबा कधी येऊ शकले नाहीत, तर ती एकटी टेकडीवर जायची. आपल्या रोपाच्या ओढीने. दोघं एकत्र मोठी होत होती. जसजसं रोप वाढू लागलं, तसतसं मीनूच्या मनातील मळभ दूर होऊ लागलं.
हळूहळू ती पूर्वीसारखी हसू - खेळू लागली. अभ्यासात लक्ष देऊ लागली. निर्मितीचा आनंद तिने अनुभवला होता. आणि अनुभवासारखा दुसरा गुरु तो कुठला!! आजोबांना जे काही सांगायचं होतं, ते या अनुभवाने तिला शिकवलं. ते रोप आधी तिचं मूल होतं. नंतर तिच्या सगळ्या गोष्टी वाटून घेणारा तिचा मित्र झालं, कालांतराने आजोबा गेल्यावर ते तिचे आजोबा बनलं.
त्या माझ्या आजोबांच्याच सावलीत बसून मी मीनू, आता डॉ. सौ. मीना जोशी, माझा हा अनुभव कागदावर उतरवत आहे. तुम्हाला एखादी रस्ता चुकलेली मीनू कुठं आढळली, तर द्या तिला वाचायला. कदाचित तिला मदत होईल.

Wednesday, September 19, 2012

बाप्पा मोरया!!

बाप्पांचे आगमन झाले आणि दरवर्षी प्रमाणे मनात घरच्या गणेशोत्सवाची उजळणी झाली. बाप्पांच्या नुसत्या आठवणीनेही प्रसन्न वाटते.
उदबत्तीच्या सुवासासारखे साऱ्या वातावरणात मांगल्य भरून राहिले आहे असा भास होतो.

आठवते ती आदली लागबगीची संध्याकाळ...
एक एक करून नातेवाईकांचे डेरेदाखल होणे..
मखराच्या सजावटीला शेवटचा touch.. काही केल्या ती सजावट final होत नसते...
मग झांजा घेऊन आणि गांधी टोप्या घालून बाप्पांना आणायला जाणे..
मोरयाच्या गजरात घरी आल्यावर पायावर पडणाऱ्या पाण्याचा ओलावा..
बाप्पांना मखरात ठेवले की सजावटीत काय missing होते, याचा अचानक झालेला साक्षात्कार!

दुसऱ्या दिवशी आईने न उठवता सकाळी लवकर आलेली जाग...
सगळ्यांची तयारी होता होता पूजेला हमखास झालेला उशीर..
फुले, अत्तर आणि उदबत्त्यांचा मिश्र सुगंध..
पूजेनंतर जादू झाल्यासारखा बाप्पांना आलेला जिवंतपणा..
'कोणाचा आवाज मोठा' अशी स्पर्धा असल्यासारख्या म्हणलेल्या आरत्या..  ताल, सुराशी काहीही संबंध नसलेल्या..
आणि घालीन लोटांगण संपता संपता अलगद सुरु होणारी मंत्रपुष्पांजली..
मग हातात पडणारी प्रसादाची फोड आणि पंचामृत.. आणि बाप्पांना मनोभावे केलेला साष्टांग नमस्कार..

आणि मग सुरु व्हायचे ते मोदक पर्व!
मोदकाचा लाडू करणाऱ्याची चेष्टा आणि सुबक २१ पाऱ्या करणाऱ्याचं कौतुक..
सजलेलं प्रसादाचं ताट..
उमललेल्या मोदकाच्या पोटात पडणारी साजूक तुपाची धार..
तडस लागेपर्यंत झालेलं जेवण आणि त्यानंतर आपसूकच डोळ्यावर आलेली झापड..
ताणून दिलेली दुपार..

संध्याकाळची आरती आणि त्याबरोबरच मनात सुरु झालेली विसर्जनाची धाकधूक..
पण येतेच ती वेळ..
एकीकडे स्वैपाकघरात वाटल्या डाळीला आलेली वाफ.. आणि एकीकडे गणपतीची उत्तरपूजा..
पुन्हा मोरयाच्या गजरात सुरु झालेला बाप्पांचा परतीचा प्रवास...
आता 'गणपती बाप्पा मोरया' ला 'पुढच्या वर्षी लवकर या' ची जोड..
मग ती शेवटची आरती..
वाटल्या डाळीचं random वाटप..
बाप्पांना दूर जाताना पाहत राहणारी नजर..
आणि ते डोळ्याआड होताच किंचित दाटलेला गळा..

मग घरी वाट पाहत असलेलं बिचारं एकाकी मखर..
आणि रात्री बाप्पांच्या जागी मखरात बसलेला तो शाडू मातीचा गोळा...

Thursday, September 13, 2012

ब्लॉगला जेव्हा जाग येते (आणि ऑफिसची वही)

माझ्या बिचाऱ्या वाजत-गाजत जन्माला आलेल्या ब्लॉगला दोन पोस्ट्स ची चाटणे देऊन मी जो झोपवला, तो आजतागायत. त्याला या hibernation मधून बाहेर काढण्याची हुक्की मला अधून मधून येत होती, पण कधी सुचत नाही म्हणून, कधी वेळ नाही म्हणून, आणि बहुतांश वेळा निव्वळ आळशीपणामुळे ते राहून जात होतं. दरम्यान ज्या एखाद-दुसऱ्या ओळी, कल्पना सुचल्या, त्या डोक्यातच राहिल्या. कधी grocery च्या यादीच्या कपट्यावर, ऑफिस च्या वहीच्या मागच्या पानावर खरडल्या गेल्या. 

By the way, ऑफिस ची वही ही माझी अगदी 'सच्चा दोस्त', 'जिगरी यार' वगैरे आहे. माझ्या आणि तिच्यात one way 'ये हृदयीचे ते हृदयी' होत असतं. त्याला काही कारणे आहेत:
१. ऑफिस मध्ये कुणालाही मराठीचा गंध नाही. त्यामुळे कामाच्या नोट्स आहेत म्हटलं कि झालं. ;)
२. 'किती थुकरट लिहिलंय'  असं मी म्हणेन एकवेळ, पण ती म्हणत नाही. :)


त्यामुळे या वहीत तुम्हाला बडबडगीते, बालभारतीतल्या कविता, 'दिल तो पागल है' मधली गाणी यांपासून अगदी 'XYZ ची आज सटकलीये' सारखी उक्ती पर्यंत काहीही दिसू शकेल. (अर्थात ही वही तुमच्या हातात कधी पडणार नाही ही गोष्ट वेगळी :P) त्या वहीची मागची पाने भरून भरून पार निम्म्यापर्यंत आली आहेत.

वहीची पाने भरविण्याच्या माझ्या वेळाही एका pattern मध्ये आहेत. code मधला एखादा व्रात्य bug हुलकावण्या देत असतो तेव्हा. कुठेतरी एखादा बदल करत असताना मैलभर दूर असलेला एखादा तिसराच code असहकार पुकारतो तेव्हा. दुसऱ्याच्या code मध्ये बदल करण्यासाठी तो समजून घेत असताना डोकं गरागरा फिरायला लागतं तेव्हा. अशा वेळी, Jerry नी Tom च्या डोक्यात दगड/ bat / pan असलं काहीतरी घातलं, की त्याचे डोळे वाकडे होऊन डोक्याभोवती गोलात तारे चमकू लागतात, तसं आपलं होतंय असं वाटू लागतं. मग 'I dont belong here', 'यासाठीच का केला अट्टाहास' वगैरे विरक्तीचे विचार येऊ लागतात मनात. आणि मग हि माझी ऑफिस मधली सखी येते मदतीला. :D 

तर मुद्दा असं की.... काय बरं.. (छे.. विषयांतराचाच विषय झाला. टायटल बदलायला हवं :D ) तर मुद्दा असा की, या माझ्या ब्लॉगबाळाला झोपेतून जागे करण्याचा संकल्प त्याच ऑफिस च्या वहीवर मी सोडते आहे. सगळे यादीचे कपटे, वहीची पाने, जुनी कात्रणे गोळा करून त्याला भरविण्याची इच्छा आहे. त्याला यापुढे जागरणे घडोत अशी आशा :)