काही दिवसांपूर्वी कॅलिफोर्नियामध्ये प्रचंड वणवे पेटले होते. त्याचा धूर शेकडो मैल लांबवर पसरून वातावरणात भरून राहिला होता. विचित्र अनुभव होता. दिवसभर अंधारलेला लालसर आसमंत, सगळीकडे कोंडून राहिलेला धूर, त्यात लागोपाठचे २-३ भूकंप, भीषण जीवाणू विषाणू.. सगळं एकाच वेळी चाल करून आलं होतं. जगभर निसर्गाचं काही ना काही निराळं सुरू आहे. काहीतरी बिघाड झाल्यासारखं. त्या पार्श्वभूमीवरच हे शब्द.
‘चल झाली वेळ धरित्री’
अवनी द्विधेत थरथरता
आकाशी जहाल उत्तर
“चल झाली वेळ धरित्री,
विसरे मानव, तो नश्वर”
तू दिलास जन्म तयाला
पोषवले जपून इथवर
पोटी घे अनंत पापे
तो घाली घाव निरंतर
नासवले निल-ऐश्वर्य
विसविसले हिरवे लक्तर
तनु राखाडली धुराने
मुख भासे म्लान नि जर्जर
मम ह्रुदय सखे पिळवटते
परि त्याचे ह्रुदयच फत्तर
जरि असे पोटीचा पुत्र
आता संहार बेहत्तर
चल झाली वेळ धरित्री,
विसरे मानव, तो नश्वर
फोटो: https://www.google.com/amp/s/hoodline.com/amp/2020/09/san-francisco-awakens-to-darkness-as-wildfire-smoke-blankets-city-in-red-twilight