Saturday, March 17, 2018

प्रिय रावीस,

तू माझी सावली
तू माझं शेपूट
माझ्यासोबत जिथे तिथे
तुझी बस-उठ

तीन फूट देहाचा
तनामनाला सतत वेढा
“आज काय झालं माहिताय का?”
गप्पा गोष्टी नाहीत थोड्या

झोप आली तू चल
खेळायला तू चल
भूक लागली तू चल
शी लागली तू चल

पायाची भिंगरी न् तोंडाचा पट्टा
नाही त्यांना उसंत
गोष्टी ऐकून गाई येते
तेव्हाच होतं घर शांत

घरी दारी पायात पायात
सतत तुझी भुणभूण
म्हणतात सुटी झालीस की
सारं जाईल पालटून

असं ऐकलं की मात्र
मला काही आवडत नाही
मन माझं दुष्ट त्याला
हेही नको आणि तेही

बोबडं बोलून नाचून गाऊन
मला असं गुंतवायचं
सुटी बिटी झालीस तर
सांग मी काय करायचं?

शाळेत जाताना गोड पापी
झोपताना गालावर तुझा पंजा
उगाच मारलेली घट्ट मिठी
तुझ्या सवयी पण माझ्या गरजा

शिकेन मीही हळूहळू
शेवटी love is letting go
तूही जरा दमानं घे
हळूहळूच मोठी हो!