आपल्या मनात एक माकड असतं. साधंसुधं नाही, मद्य प्यालेलं. ते काही दुष्ट नाही, पण शेवटी माकडच ते. आणि एक शहाणा मुलगा असतो. तेल लावून, चप्प भांग पाडून मोजे बूट घालून शाळेत जाणारा. पहिल्या बाकावर बसून नोट्स लिहिणारा. हे दोघे आपल्या मनात एकत्र नां(भां)द(ड)तात. दोघेही नॉर्मल असतील तर त्यांची युती होत नाही. तिथे लोकशाही नाही. सगळा 'बळी तो कान पिळी' चा न्याय. त्यामुळे प्रसंगानुसार जो बलवान, तो जिंकतो आणि आपल्यावर स्वार होतो. आपल्या मनाच्या back end ला त्यांचे सुख(?)संवाद अखंड चालू असतात. पार्श्वसंगीतासारखे. हे त्यातले काही तुकडे:
१. स्थळ: ७वी अ. वेळ: शास्त्राच्या तासाची
शहाणा मुलगा: सहामाहीला फळ्यावरचं पेपर मध्ये आलं होतं सगळं. यावेळेस उतरवून घ्यायला हवं.
मद्य प्यालेलं माकड: खरंय. आता वही पेन आहेच तर चित्र काढूया. सरांचं. नको? मग ताजमहाल? नाहीतर इतिहासाच्या पुस्तकातल्या गांधीजींना मिशा...
श. मु. : नको. मी लिहून घेणारे. पण हे कळत नाहीए नीट..
म. मा : डबा खाऊया? आज भेंडी आहे.
मु: हे सरांना विचारायला हवं.
मा: ब ला ऑफ आहे वाटतं.
२. स्थळ: हॉस्टेलची खोली. वेळ: परीक्षेच्या आदला दिवस.
रात्री १० वाजता.
मु: आता तरी अभ्यासाला बसूया. मला खूप गिल्टी वाटतंय. टेन्शन आलंय.
मा: सगळ्यांनाच आलं असेल का? जोशीच्या रूम मध्ये डोकावून यायचं का?
रात्री १ वाजता:
मु: आता तरी अभ्यास करूया.
३. स्थळ: ऑफीस. वेळ: मीटिंगची.
मु: काल माझा हाच मुद्दा होता. आपली दिशा थोडी चुकते आहे.
मा: जो जिता वही सिकंदर मध्ये आयेशा झुल्काचं नाव काय असतं बरं..
थोड्या वेळाने.
मु: काय असतं बरं आयेशा झुल्काचं नाव?
४. गाडी चालवताना.
मु: उजवी लेन वेगात आहे. तिकडे जायला हवं.
मा: (मोठ्या आवाजात) मेरी लॉंड्री का एक बिल, एक आधी पडी नॉवेल.
मु: डावीच जास्त वेगात होती वाटतं.
मा: (आणखी मोठ्या आवाजात) ना ना ना ना ना ना
मु: (समोरच्या गाडीला उद्देशून) नियम तोडला तुम्ही. हे काही...
मा: (त्यालाच उद्देशून) इंडिकेटर भाड्याने दिला का रे @###
५. स्थळ: कुठलंही. वेळ: लग्नाळू.
माकड: प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं...
मुलगा: सुशिक्षित, उंच, स्मार्ट, गोरी...
६. स्थळ: कुठलंही. वेळ: महत्वाचे निर्णय घ्यायची.
माकड: मार्ग आमुचा रोधू न शकती ना धन ना दारा घराची वा वीतभर कारा
मानवतेचे निशाण मिरवू महासागरात, जिंकुनी खंड खंड सारा
मुलगा: बिकट वाट वहिवाट नसावी धोपटमार्गा सोडू नको,
संसारामधि ऐस आपला उगाच भटकत फिरू नको.