Sunday, March 5, 2017

चांदी

वीकांताची सकाळ भासत होती शांत नि साधी,
ठाऊक नव्हते अशी शांतता असे वादळाआधी. 

म्हटले उरकून प्रातर्विधी मग ठेवावे आधण,
चार चहाचे घुटके घ्यावे बसून दोघे जण.

अशात कोठून दुर्भाग्याने दुर्बुद्धी ती सुचली,
जाता जाता ओझरती मी स्वप्रतिमा निरखली. 

दर्पणातुनि शुभ्र-पांढरा केस तो लुकलुकला,
खोटे कशास बोलू मम हृदयीचा ठोका चुकला. 

आंतरातले खंबीर वगरे डगमगले ते स्त्रीत्व,
साहजिक आहे, डोक्यावरचा एकच कण परिपक्व. 

कळून आली चूक, देता विवेकास मग संधी,
काय सांगते डोक्यावरची चमचमणारी चांदी. 

कोकीळ जैसा देई वसंत-आगमनाची वर्दी,
तशीच ही या वळणावरची ऋतूबदलाची नांदी. 

रंगलेपही झाकू न शकती पोक्तपणाच्या खुणा,
खुल्या दिलाने स्वागत करणे यातच शहाणपणा. 

डोक्यावरच्या चांदीकरिता उत्तम उपाय गमले,
अशा प्रकारे चहा कपातील वादळ माझ्या शमले. 

Saturday, February 25, 2017

हेबामे

हेबामे म्हणजे मिडवाईफ. मराठीत सुईण म्हणता येईल. हेबामे हा जर्मन शब्द आहे. या हेबामे गरोदरपणात आणि बाळंतपणात मार्गदर्शन, मदत करतात. जर्मनी मध्ये हेबामे सेंटर्स आहेत. तिथे जन्माची तयारी आणि नवजात बाळाची काळजी याबद्दलच्या शिकवण्या घेतल्या जातात. या शिकवणीत होऊ घातलेल्या आई, बाबांची तयारी करून घेतली जाते. अमूल्य माहिती, टिप्स आणि सल्ले दिले जातात. येणारा सुंदर पण अवघड काळ कसा सुलभ करावा याचं मार्गदर्शन केलं जातं. या सेंटरला संपर्क करून तुम्हाला हव्या त्या हेबामे बरोबर तुम्ही व्यक्तिगत कॉन्ट्रॅक्ट करू शकता. या हेबामे सुविधेचा खर्च तुमच्या आरोग्य विम्याकडून भागवला जातो. मग ही हेबामे गरोदरपणाच्या पाचव्या - सहाव्या महिन्यापासून घरी येऊ लागते. सुरुवातीला तिच्या भेटींची वारंवारता कमी असते. नंतर ती आठवड्यातून एकदा, नंतर दोनदा येऊ लागते. माझ्यासारख्या परदेशात गरोदरपण आणि बाळंतपण अनुभवणाऱ्या, आई-आज्जीच्या, मावशा-काकवांच्या कोड-कौतुकाला आणि मार्गदर्शनाला मुकणाऱ्या पहिलटकरणींसाठी हेबामे म्हणजे देवदूतापेक्षा कमी नसते. 

माझ्या हेबामेचा चेहरा अजून माझ्या डोळ्यासमोर आहे. क्रिस्टीना तिचं नाव. शेलाटी, हसरी, उत्साहाने सळसळणारी, चेहऱ्यावरून परिपक्व वाटणारी. तिच्या चेहऱ्यावर मेकअपचा लवलेशही नसायचा. जर्मन स्त्रियांसाठी हे विशेष. ती इंग्लंड मध्ये राहिली होती काही वर्षे. त्यामुळे इंग्रजी अस्खलित बोलायची. पाचव्या महिन्यापासून ती येऊ लागली. आमच्या पहिल्याच भेटीत मी तिची भक्त झाले होते. मला प्रसूती या गोष्टीची आधी प्रचंड भिती वाटायची. या प्रसंगाच्या नेहमी भयावह गोष्टीच ऐकलेल्या असतात. त्यामुळे आपण 'खूप दुखतं' यापलिकडे त्याचा विचारच करत नाही. खरंतर मनाच्या आणि शरीराच्या योग्य तयारीने सामोरी गेलं तर तो आयुष्यातला सर्वोच्च क्षण असतो. माणूस म्हणून समृद्ध करणारा. आपल्यात प्रेम करण्याची किती ताकद आहे हे आपल्यालाच दाखवून देणारा. पण हे असं सांगतच नाही कुणी. नेहमी भीतीदायक वर्णनंच कानी पडतात. माझंही तसंच झालं होतं. पण माझ्या सुदैवाने क्रिस्टीना मला भेटली. तिने माझी प्रसूतीची सगळी भीती आधी दूर केली. काही पुस्तकांची नावे सांगितली. ज्यांचा मला खूप उपयोग (खरंतर उपकार) झाला.

क्रिस्टीनाला स्वतःला ३ मुले होती. त्यापैकी दोघांचे जन्म तिच्या घरीच झाले होते. हो, जर्मनीमध्ये हे हल्ली रूढ होत चाललं आहे. बाळाची आणि आईची तब्येत व्यवस्थित असेल तर बऱ्याच स्त्रिया बाळाला घरच्या घरी सुईणीच्या मदतीने जन्म देणे पसंत करतात. ही एक अतिशय नैसर्गिक प्रक्रिया आहे. जर काही गुंतागुंत असेल तर गोष्ट वेगळी. मग डॉक्टर, औषधे, चिकित्सा, भूल वगैरे आलंच. पण सगळं सुरळित असेल तर जिथे सर्वात आरामदायक वाटेल अशा स्वतःच्या घरी, कुठल्याही ड्रग्स, यंत्र यांपासून दूर आपल्या बाळाने या जगात यावं अशी ही विचारप्रणाली आहे. क्रिस्टीनाच्या प्रत्येक सल्ल्यात ही नैसर्गिक प्रक्रियेची ओढ डोकवायची. तिने मला कधीही कुठलीही औषधे लिहून दिली नाहीत. अगदी जीवनसत्वाच्या गोळ्याही नाही. मला आधी घुटमळायला झालं. माझ्या सारख्या इतर मुली ५-५ गोळ्या एका वेळी घटाघट जिरवायच्या. पण थोडं वाचन, अभ्यास केल्यावर मी तिच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवायचा असं ठरवलं. मला ती नैसर्गिक (प्लॅन्ट-बेस्ड) औषधे लिहून द्यायची. आहारात बदल सुचवायची. श्वसनाचे आणि इतर व्यायाम शिकवायची. ध्यान (मेडिटेशन) करायला सांगायची. मी तिचा एक शब्दही खाली पडू द्यायचे नाही. सतत माझे आपले फूस फूस करत श्वसनाचे व्यायाम सुरु. 

प्रसूतीच्या वेळी भीतीपोटी आपण आपले अवयव आखडून घेतो. त्यामुळे नैसर्गिक प्रक्रियेला अडथळा येतो, वेदना वाढतात आणि आपण अजूनच घाबरतो. असं दुष्टचक्र तयार होतं. त्याऐवजी श्वसनावर लक्ष्य केंद्रित करून निसर्गाला त्याचं काम विनासायास करू द्यावं. अंग शिथिल सोडावं. असं केलं तर प्रसूती लवकर आणि सुलभ होते. क्रिस्टीनाच्या या सल्ल्याचं मी प्रसूतीच्या वेळी तंतोतंत पालन केलं. रावीचा जन्म अतिशय सुलभ झाला. आणखीही बऱ्याच मजा मजा झाल्या. ती सगळी गोष्ट नंतर कधी. पण थोडक्यात जन्माचा तो सोहळा तना-मनाने १००% टक्के उपस्थित राहून मी अनुभवला. याचं श्रेय क्रिस्टीनाला. 

जन्मानंतरही काही आठवडे ती येत राहिली. रावीची पहिली अंघोळ, तिची काळजी, मालिश, माझी शारीरिक झीज भरून काढणे, शून्याखालच्या तापमानात बाळाची आणि माझी काळजी या सगळ्यात तिने मला, कुणालला आणि आईला अमूल्य मदत केली. एकदा ती आईला बाळंतपणासाठी काही पाकक्रिया सांगत होती. तेव्हा आईला जाणवलं, हे तर आपले डिंकाचे लाडू! तिच्या आणि आपल्या जुन्या पद्धतींतले अजूनही समान दुवे आम्हाला वेळोवेळी जाणवायचे. 

क्रिस्टीना जरी गरोदर आणि बाळंतपणासाठी सल्ले देत असली तरी तिची विचारप्रणाली त्यापुरतीच मर्यादित नाही. निसर्गाला त्याचं काम करू देणे, उपचारांपेक्षा प्रतिबंधाला महत्व देणे, आजीबाईचा बटव्यातल्या जादूच्या गोष्टी आपल्या स्वैपाकघरात शोधणे, आपल्या शरीरात खाण्यावाटे काय प्रवेश करत आहे, आपण आपल्या शरीराला वरूनही काय लावत आहोत याची पूर्ण माहिती ठेवणे अशा गोष्टींचा विचार ही मला तिने दिलेली देणगी आहे. आपल्या जीवनशैलीला परिसस्पर्श करणारी माणसं भाग्यानंच भेटतात.माझ्यासाठी परीस झाल्याबद्दल मी तिची अतिशय ऋणी आहे. 

Monday, January 23, 2017

जित्याची खोड

नातलग म्हणाले एक तुम्ही झालात एनआरआय
भारताशी आता तुमचं  देणं-घेणंच काय 
म्हणलं, कप्पाळ 'सकाळ' शिवाय सकाळ होत नै
जित्याची खोड काही मेल्याशिवाय जात नै

पाळंमुळं रोवलीयेत हिंदुस्थानात घट्ट
फ्रेंच रोस्टच्याही 'ब्रू'-करणाचा हट्ट
नाहीतर ते 'काळे पाणी' घशाखाली उतरत नै
जित्याची खोड काही मेल्याशिवाय जात नै

वक्तशीर मेट्रोचीही वाकून वाट पहायची
उगाचच लगबगीने खिडकी सीट पकडायची
जरी डब्यात आपल्याशिवाय काळं कुत्रं दिसत नै
जित्याची खोड काही मेल्याशिवाय जात नै

तिसऱ्या मितीत मान हालवुन मगच होकार जातो
पाय लागला चुकून, आपसूक नमस्कार घडतो
'डाव्या बाजूने चाला'यचा मोह अजूनही सुटत नै
जित्याची खोड काही मेल्याशिवाय जात नै

प्रवासाला निघताना बांधून घ्यावी शिदोरी
वाटेवरती खेळावी अंताक्षरी कंपल्सरी
कॅमेऱ्यातून पाहिल्याविना सहलीत काही दिसत नै
जित्याची खोड काही मेल्याशिवाय जात नै

फोर कोर्स डिनरलाही सुपारीची जोडणी
पास्त्यालाही द्यावी कधी कढीपत्त्याची फोडणी
कांदा-लसूण मसाल्याशिवाय पानसुद्धा हालत नै
जित्याची खोड काही मेल्याशिवाय जात नै

विरघळूनही वेगळे अशी केशरासारखी वृत्ती
हाॅलिवूडची आवड पण बच्चनवरती भक्ती
सुटला जरी भारत तरी भारतीयत्व सोडवत नै
जित्याची खोड काही मेल्याशिवाय जात नै


Tuesday, January 17, 2017

आमची पाकसाधना

शिक्षणासाठी किंवा इतर कारणांमुळे घराबाहेर पडलेल्या बहुसंख्य इतर लोकांप्रमाणेच माझी स्वयंपाकघरातली उमेदवारी भारत सोडून जर्मनीला गेलो तेव्हा सुरु झाली. तोपर्यंत घरात आईला मदत करण्यासाठी जी सी ग्रेड कामे करावी लागतात तेवढाच स्वैपाकघरात वावर. म्हणजे पाने घेणे, उष्टं आवरणे, ऐन वेळी घरात नसलेल्या गोष्टी 'पटकन' कोपऱ्यावरच्या वाण्याकडून / भाजीवाल्याकडून घेऊन येणे इत्यादी. नंतर इंजिनीरिंग सुरु झाल्यावर सुट्टीला घरी जाऊ लागले तेव्हा बी ग्रेड कामे सुरु झाली. शेवटच्या २ पोळ्या लाटणे, भाजी फोडणीला घालणे, पाने वाढणे (डावीकडे कोशिंबीर, उजवीकडे भाजी वगैरे सकट). अशा प्रकारे जर्मनीला गेलो तेव्हा मला उपासमार होणार नाही एवढा स्वैपाक येत होता. पण आवड वगैरे निर्माण झाली नव्हती. 

पण गरज ही शोधाची जननी असते. तशी चांगलं चुंगलं खायला सोकावलेली जीभ ही माझ्या पाककलेची जननी, जनक, भाऊ-बहीण सगळं होती. कुणाललाही (नवरा) खाण्याची नितांत आवड. आमची पत्रिका बघितलेल्या गुरुजींनी एक गूण जबरदस्त जुळतोय म्हणल्यावर गो अहेड दिला असावा. तोच हा गूण. त्यामुळे आमचं बाकी सगळं उत्तर आणि दक्षिण ध्रुवांवर चालू असलं तरी खाण्याची आवड जोपासण्यासाठी आम्ही विषूववृत्तावर येतो. जर्मनी मध्ये प्राथमिक भारतीय किराणा मिळत होता. पण सगळा कच्चा माल. आली लहर काही खायची, काढली गाडी आणि मारला ताव असे अमेरिकन लाड तिकडे नाहीत. त्यामुळे काही खावंसं वाटलं की मुकाट्याने यू ट्यूब वर संशोधन करायचं, साहित्य गोळा करायचं आणि पाकसाधना सुरु. आपला हात जगन्नाथ. 

वेगवेगळ्या cuisine च्या वेगवेगळ्या पाककृती करून बघणे हा आमचा छंद झाला होता. दर सुट्टीच्या दिवशी वेगळा घाट. म्युनिक मध्ये आमच्या ओळखी वाढवण्याच्या निमित्ताने आम्ही नेहमी कुणाकुणाला घरी जेवायला बोलवत असू. खादंतीची खादंती आणि सोशलायझेशनचं सोशलायझेशन. हाय काय अन नाय काय. गूळपोळ्यांपासून तिरामिसूपर्यंत, तांबड्या-पांढऱ्या पासून चिंच गुळाच्या आमटीपर्यंत, अस्सल भारतीय चायनीज पासून थाई रेड करी पर्यंत आम्ही सगळ्यांचे प्रयोग केले आहेत. आम्हा दोघांची इष्टाईल मात्र स्वतंत्र आहे. माझ्या भाजीत गूळ, त्याची तिखट जाळ. मी मेथीचे दाणे नाहीत म्हणून अडून बसणार तर तो जे असेल त्यानी रिप्लेस करून मारून नेणार. मी मोदकाच्या पारीवर संशोधन करणार, तर तो चिकनच्या रश्श्यात तमालपत्राचं महत्व पटवून देणार. मी सतत कुठल्यातरी सारणाच्या नादात, तर तो कुठल्यातरी वाटणाच्या तयारीत. आम्ही लौकरच खानावळ सुरु करायच्या विचारात आहोत. फक्त नाव 'सात्विक थाळी हॉल' ठेवायचं की 'मटण प्लेट हाऊस' हे ठरायचं आहे. 

पण हे सगळे पाकप्रयोग वीकांताला चालायचे. एरवी माझे क्लासेस, अर्ध वेळ नोकरी, त्याची नोकरी या दुय्यम गोष्टींमुळे जेवणा खाण्याची गंमत-जंमतच असायची. विशेषतः वरखाण्याची. (म्हणजे चरखाण्याची.) घरी आलं की फ्रिज, १-२ डबे उघडून निराश व्हायचं आणि मुकाट्याने स्वैपाकाला लागायचं. 

त्याच दिवसांतला हा एक किस्सा. एकदा मला मोदकांची अतिशय आठवण झाली. मोदक आणि गुळाच्या पोळ्या हे माझे अती आवडते गोड पदार्थ आहेत. बाकी केकादी खाताना नाही म्हणलं तरी किंचित अपराधीपणा शिवून जातो. पण मोदक? कॅलरीज गेल्या उडत! तेव्हापर्यंत मी एकटीने मोदक केले नव्हते. सारण आणि पिठी तयार असेल तर मला माफक सुबक मोदक करता येत होते, पण पिठी कुणी केली होती! मी लगेच न डगमगता रूचिरा चाळलं, घरी फोन केले, २-३ यू ट्यूब वीरांच्या मोदकांचा अभ्यास केला. गुरुवार होता. म्हणलं शुक्रवारच्या रात्री घालू घाट. पहिलाच प्रयोग होता, त्यामुळे दोघांना २-२ येतील एवढेच करायचं ठरवलं. अनायसे सगळं सामान घरात होतं. उद्याचं काम हलकं व्हावं म्हणून सारण करायला लागले. नवरा घरात नव्हता. एरवी तो सारखा मधे मधे प्रशांत दामलेगिरी करत असतो. यात हे का घालत नाहीस, कचरा किती केलास, मधेच कसलातरी तोबरा भरुन माझा अंदाज चुकव इ. पण हे काही नसल्याने सारण सुरळित पार पडलं. सारण वाटीबंद आणि वाटी फ्रिजबंद झाली. 

दुसरा अख्खा दिवस मी मोदकांच्या दिवास्वप्नांत घालवला. नाजूक, सुबक २१ पाऱ्यांचा गरम मोदक, त्याचं नाक खुडताच मोकळी झालेली वाफ, गळू पाहणारा तो गोड रस, मग मोदकाच्या पोटात पडलेली साजूक तुपाची धार! अहाहा! घरी आल्या आल्या तयारीला सुरुवात केली. पिठी करायला ठेवली. तिला वाफ येत होती तोवर सारण काढायला फ्रिज उघडला. सारणाची वाटी काही दिसेना. सगळे कप्पे शोधून झाले. मग शंका आली म्हणून बाहेर येऊन पाहिलं तर कुणाल टेबलवर लॅपटॉप घेऊन बसला होता आणि टेबलवर सारणाची वाटी. अर्थातच रिकामी. माझ्या चेहऱ्यावरचे हसू, राग, प्रश्नचिन्ह असे सगळे मिश्र भाव पाहिल्यावर त्याला लिंक लागली आणि तो उत्तरला "पण मला भूक लागली होती!" 

अशा सगळ्या मजेदार, कडू, गोड अनुभवांनी आमचं स्वैपाकघर मोठं झालं आहे. स्वैपाक म्हणजे वेगवेगळ्या चवींचं, गंधांचं आणि रंगांचं सेलिब्रेशन आहे. शेवटी चवी काय हो, पाचच असतात. तिखट, खारट, तुरट, आंबट आणि गोड. या चवींचं गुणोत्तर प्रमाण जमलं की स्वैपाकाचं गणित चोख सुटतं. पण कविता करायला जसं शिकवता येत नाही, तसं 'कोशिंबिरीच्या फोडणीत चमचाभर उडदाची डाळ घालून बघा' असं रेसिपीच्या पुस्तकात लिहिता येत नाही. ते आतूनच यावं लागतं. म्हणूनच या साधनेला पाक'कला' म्हणतात. 

Tuesday, January 10, 2017

छोट्या 'मोठ्या' गोष्टी

शॉपिंग स्ट्रीट, सोबतीला मैत्रिणी / बहिणी / (अहो किंवा ए) आई, खाऊगल्ली.

रिकामी दुपार, खिडकी, सोबतीला गळ्यापर्यंत वाचून झालेलं सुंदर पुस्तक, कॉफी.

सकाळचं कोवळं ऊन, लांब लांब निसर्गरम्य रस्ता, चांगले बूट, पाण्याची बाटली, सोबत नवरा.

खूप दिवसांनी भेटलेल्या मैत्रिणी, रात्र, साठलेल्या गप्पा, अपरात्रीची कॉफी.

खाली घातलेल्या गाद्या, झोपायची वेळ टळून गेलेली, चेकाळलेली रावी.

पावसाळ्याचे दिवस, मुंबई-पुणे एक्सप्रेसवे, पोरीच्या लग्नात हळवा झालेल्या बापासारखा दिसणारा सह्याद्री.

झडझडून केलेला व्यायाम, घामेजलेले कपडे, दुखणं हवंहवंसं वाटावं इतपतच दुखणारे पाय.

आईच्या हातची भरल्या वांग्याची भाजी. (पूर्णविराम!)

रात्री सुसाट पळणारी गाडी, खिडकीची सीट, छानसं रिपीट वर टाकलेलं गाणं आणि वारा प्यालेलं मन.

रात्रीचा दिवस करून केलेले सांघिक परिश्रम, जीव गळ्यात आणून वाट पाहायला लावणारा निर्णयाचा क्षण आणि मग पत्ता लागू न देता निखळणारे आनंदाश्रू, कडकडून गळाभेटी.

समोर फेसाळलेला गर्जना करणारा महासागर किंवा संथ गंभीर कृष्णामाई किंवा हिमाच्छादित महाकाय आल्प्स, हरपलेले भान आणि पुन्हा एकदा झालेली खुजे असल्याची जाणीव.

काळजाला हात घालणारी एखादी कलाक्रुती, आणि दाद कंठाशी आलेली असताना तिची जागा घेणारा आवंढा.

Monday, January 2, 2017

वस्त्रपुराण

मला असं नेहमी वाटतं की, कापडाचे कपडे होतात, तेव्हा त्याला आकार येतो आणि त्यात माणसं वावरू लागतात, तेव्हा त्यात जीवही येऊ लागतो. त्याशिवाय वापरून विटलेल्या, जीर्ण झालेल्या कुडत्यात जीव अडकला नसता. सहवासानं माणसाचं व्यक्तिमत्वही त्यात पाझरत जातं. आजूबाजूच्या परिसराची लक्षणं त्यात जाणवू लागतात. 

म्हणजे, आजीच्या साडीचा स्पर्श तिच्या हातांच्या स्पर्शासारखा जाणवतो. मखमली नसला तरी मऊ, उबदार!

बाळाचं दुपटं, त्याच्याच बोळक्यासारखं. कुणासाठी नकोशा वासाचं, पण आईसाठी चंदनाहून सुगंधी!

पोळ्यांच्या सावित्री काकूंची साडी, त्यांच्या स्वाभिमानासारखी. ठिगळ लावून मजबूत झालेली. 

दुकानात टांगलेला टॉप, दुकानातल्या पुतळ्यांसारखा. सुंदर, पण निर्जीव. 

आजोबांचा जुना खादीचा शर्ट, त्यांच्या व्यक्तिमत्वासारखा. एकेकाळचा रुबाब गमावलेला, पण अजूनही कडक. शुभ्र. 

बाबांची लुंगी, त्यांच्या मनासारखी. अघळ-पघळ. मापे न काढता कुणालाही सामावून घेणारी. 

आईची ठेवणीतली साडी, तिच्या लाजेसारखी. कधीतरीच दिसणारी, पण इतकी मोहक की कुणीही प्रेमात पडावं. 

आणि देवपूजेचा रुमाल, पूजेच्या फुलांसारखा. एकच मांगल्याचा वास असलेला. देवाच्या स्पर्शाने देवपण लाभलेला!