गेल्या आठवड्यात म्युनिक मध्ये सकाळी सकाळी वीज गेली आणि अर्ध्या - पाउण तासासाठी सगळ्या घरात हाहाकार झाला! सकाळी उठल्यावर चहा/कॉफी नाही हो!! अगदीच वीजेपुढे लाचारी आली. काहीच कामं होईनात. कधी नव्हे तो candle light breakfast केला. तेवढंच नाही, candle light प्रात:विधी, candle light अंघोळ अशा बऱ्याच गोष्टी झाल्या. आता काही लवकर वीज येत नाही.. फुकटची सुट्टी मिळाली.. दिवसभर आळस करायचा.. असे इमले बांधत असतानाच उजेड पडला. अगदी शेखचिल्ली च्या गोष्टीसारखं झालं. असो.
पण या वीजसत्रामुळे मायदेशातले load-shedding चे एपिसोड्स डोळ्यासमोर तरळून गेले. खरं सांगू का.. लहानपणी मला संध्याकाळी वीज गेलेली मनापासून आवडत असे. ('लाईट' गेलेली आवडत असे असं म्हणायला हवं.) आपल्याकडे वीज गेल्याने तत्काळ बंद पडणारी आणि नडणारी गोष्ट म्हणजे दिवे. त्यामुळे वीज आणि लाईट हे समानार्थी शब्द झाले आहेत. (एकदा मराठीच्या पेपर मध्ये मी असा लिहिलं होतं! चपला, चंचला, दामिनी असे इतरही वीजेचे समानार्थी शब्द आहेत, ते अपेक्षित होते म्हणे! असो.) तर लाईट गेले की मला आनंद होत असे. मुख्य म्हणजे सर्वव्यापी, सर्वश्रेष्ठ असे ते जेवण (पर्यायाने स्वैपाक) बंद पडत नसे. gas च्या शेगड्याना धन्यवाद. (त्या हल्ली वेगळ्या कारणांमुळे ७ cylinders नंतर बंद पडतात.) त्यामुळे इथल्या सारखा उदरभरणावर काहीही परिणाम होत नसे.
दुसरी गोष्ट म्हणजे अभ्यास बंद. officially!! आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे.
आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मेणबत्त्या!! त्या लावायला, त्यांच्या ज्योतीशी खेळायला आणि लाईट आल्यावर त्या फुंकर मारून विझवायला अपार मजा येत असे. मेणबत्तीच्या त्या अंधुक प्रकाशात सावल्यांचे खेळ बघत राहणे हा माझा आवडता छंद होता. टेबलावर ठेवलेल्या मेणबत्तीची स्वत: चीच माडाएवढी सावली समोरच्या भिंतीपर्यंत पडत असे. तिची ज्योत थोडासा वारा आला की लपलपत असे. नंतर बॅटरी (torch ला मराठीत बॅटरी म्हणतात.) आल्यावर ही मेणबत्त्यांची मजा संपली.
आम्ही काही वर्षे कोकणात खेड मध्ये राहायला होतो. तिथे आमच्या समोरच्या काणे वाड्याच्या ओसरीत एक भला मोठा जुना लाकडी झोपाळा होता. लाईट गेले की त्या झोपाळ्यावर आजूबाजूची चिल्ली-पिल्ली गर्दी करत. सगळ्यांना कंठ फुटत. मग शुभं करोति पासून सुरु झालेली यात्रा रामरक्षा, पाढे, कविता अशी स्टेशने घेत हिंदी गाण्यांपर्यंत येई. सारं काही अंधारात! ही अंधारातली मैफल अशी रंगात आलेली असतानाच लाईट येई. आणि मग मेणबत्त्या विझवायची स्पर्धा सुरु होत असे.
आता गेले बरेच दिवस लाईट जाण्याचा अनुभव मिळालेला नसल्यामुळे असेल कदाचित, पण मला कधी कधी आपणच थोडा वेळ घरातली वीज बंद करून टाकावी असं वाटतं. घरातले आपण सगळे जण वेगळ्या दिशांना आपापल्या gadgets मध्ये तोंडं खुपसून बसलोय याची कधी जाणीव झाली की वाटतंच वाटतं. अर्थात असे जर लाईट घालवले, तर तशीच मजा येणार नाही ही गोष्ट वेगळी.
काही गोष्टी उगाचच लक्ष्यात राहतात आणि उगाचच आपण त्या miss करतो. 'लाईट जाणे' ही नेहमीच त्यांच्यापैकी एक राहील.