कुणाच्या चपळ बोटांत,
कुणाच्या बोलक्या डोळ्यांत,
कुणाच्या सुपीक डोक्यात,
कुणाच्या सुरेल गळ्यात.
किती तरी रूपं तुझी,
किती तरी छटा,
ना तुला लहान कुणी,
ना कुणी मोठा.
ना भाषेचं बंधन तुला,
ना शब्दांचे पाश,
मनापासून मनापर्यंत
असा तुझा प्रवास!
तुझ्यामुळे रंगत आहे,
सुंदर आहे जग,
लहरीपणाचं मात्र काही
होतंय का ते बघ
तुझ्या साधनेसाठी केव्हा
योजावा एकांत
आराधना मग तुझी करावी
संयत आणि शांत
धुडकाविशी तू सर्व आर्जवे
साऱ्या मिनतवाऱ्या
रुसून बसशी पाठ फिरवशी
कलाकृती अपुऱ्या
अवचित एका क्षणी अचानक
भेट तुझी घडावी
जशी काळोख्या उदास रात्री
वीज लखलखावी
उजळून जावा काना कोपरा
स्वच्छ दिसावी वाट
पूर्णत्वाप्रति प्रवास होऊन
जावा निमिषार्धात
निर्मितीस त्या जीवन देई
तुझाच कानमंत्र
प्रसवकळांचा होऊन जातो
क्षणार्धात सुखांत