Saturday, December 7, 2019

टूथफेअरीस पत्र

दुधाचे दात पडणे हा एक मैलाचा दगड असतो. ही फेज बराच काळ चालते. मला आठवतंय माझा शेवटचा दुधाचा दात सहावीत असताना पडला होता. म्हणजे जवळजवळ ६ वर्ष माझे दुधाचे दात पडत होते. रावीचे खालचे २ आणि वरचा १ असे ३ दात हल्लीच पडले. वरच्या दाताच्या ठिकाणी आता सुंदर खिडकी तयार झाली आहे. एकदा दात हलायला लागला की तो सतत हलवायचा चाळा लागतो. मग त्याला नुसता नकळत धक्का लावण्यापासून पार १८० अंशात पिरगळेपर्यंत प्रवास होतो. रावी बघावं तेव्हा त्या दातांशी खेळत असते हल्ली. पार उलटा पालटा होऊन, केवळ एका धाग्याने हिरडीत लटकून शेवटी एकदा कधीतरी तो पडतो. सुस्कारा सोडताना उडून पडतो, खाताना घासाबरोबर खडा लागल्यासारखा येतो किंवा हलवताना अलगद हातात येतो.

दात पडला की तो रात्री उशाखाली ठेवायचा, म्हणजे रात्री टूथफेअरी नावाची परी येऊन तो दात घेऊन जाते आणि त्याबदल्यात एखादं नाणं किंवा छोटीशी भेट ठेऊन जाते. ही अमेरिकन पद्धत ऐकल्यावर हल्लीच्या मुलांची मजाए असं परत एकदा वाटलं. आम्ही दात पडला की त्याला व्यवस्थित न्याहाळून झाल्यावर छपरावर फेकायचो. तेपण नवा दात वाकडा येऊ नये म्हणून. नंतर तयार झालेल्या खिडकीला जीभ लावू नको म्हणून ओरडे खायचो. परी बिरी काई नाई. रावीकडे ३ वेळा टूथफेअरी येऊन गेली. प्रत्येक दाताची वेगळी कहाणी आहे. त्यापैकी या २ अधिक सुरस कहाण्या.

पहिला खालचा दात पडला तेव्हा रावी परीच्या आगमनासाठी बरीच उत्सुक होती. तो नेमका शाळेत पडला. त्यामुळे झिपलॉक बॅग मधून खजिन्यासारखा सांभाळून ती तो घरी घेऊन आली. त्या पडलेल्या दाताचे आणि त्याच्या ठिकाणच्या पोकळीचे यथेच्छ फोटो काढून झाले. कधी नव्हे ते त्या दिवशी कधी एकदा झोपायला जातोय असं तिला झालं होतं. रात्री दात घासायची वेळ झाली तेव्हा तिच्या डोक्यात असे विचार आले असावेत: ‘आपण काही रोज नियमाने दात घासत नाही. टूथफेअरीला अस्वच्छ दात मिळाला तर मिळणाऱ्या नाण्यांमध्ये कपात होण्याची शक्यता आहे. न जाणो, चिडली बिडली तर नंतर येणारच नाही. आत्ता तर पहिलाच दात पडलाय. ते काही नाही. सोन्याचं अंडं देणाऱ्या कोंबडीला खुश ठेवायलाच हवं!’ झालं. तिनं तो दात झिपलॉक मधून बाहेर काढला. हिऱ्यासारखा हाताळत बेसिनजवळ आली आणि तो दात घासायची मनीषा तिने बोलून दाखवली. आता तुम्हाला दाताच्या मापाची कल्पना नसेल तर सांगते. तो दात साधारण तुरीच्या डाळीएवढा होता. पाण्याचा पेला, दुधाची बाटली अशा मोठ्या गोष्टी पण काही कारण नसताना रावीच्या हातातून उगाचच पडतात. तो एवढुसा दात बेसिनच्या जवळ बोटांत पकडून दुसऱ्या हाताने तो ब्रश करताना हमखास तिच्या हातातून सटकणार, बेसिन मध्ये पडणार, मग रडं, सारवासारवी, झोपायला उशीर, सकाळी उठायला उशीर, शाळेत टार्डी स्लिप असा सगळा दूरदृष्टीनं विचार केल्यावर मी तिला म्हणलं, ‘थांब मी घासते तुझा दात. छान लखलखीत करून टाकते.’ तिला ते पटलं.

आता स्लो मोशन. रावीने जपून तिच्या हातातला दात माझ्या हातात दिला. मी त्याला ब्रश करण्यासाठी चिमटीत घट्ट पकडला आणि तेवढ्यात तो खट्याळ दात माझ्या चिमटीतून सट्कन निसटला. पुढचं रामायण झर्रकन माझ्या डोळ्यासमोर आलं आणि मी जिवाच्या आकांताने त्या दाताला पकडण्यासाठी माफक थयथयाट केला. पण तो इकडेतिकडे १-२दा टप्पे घेत अखेरीस बेसिनमधून खाली ‘अच्छा तो हम चलते है’ म्हणता झाला. त्या धक्क्यातून सावरेपर्यंतच टिपेच्या आवाजातलं रडं ऐकू येऊ लागलं.

माझा भाऊ स्वानंद तेव्हा घरात होता. रावीला एकीकडे समजावण्याचा प्रयत्न करत असताना मी दुसरीकडे त्याला परिस्थिती समजावून सांगितली. तो ५ मिनिटांत बेसिनकडून ‘मिळाला! मिळाला!’ अशी आरोळी ठोकत आला. त्याने आणलेला दात बघून तो दात नसून काहीतरी वेगळंच आहे हे मी लगेच ताडलं. खरंतर रावीलाही शंका आली. पण ‘पडून पडून तो असा वेगळाच दिसायला लागलाय’ अशी थाप खपली. स्वानंदने कुठल्यातरी फरशीचा टवका उत्पन्न करून आणला होता. वेळ मारून नेली. दुसऱ्या दिवशी टूथफेअरीचा सोहळा यथासांग पार पडला.

आता दुसरी कहाणी. यावेळेस वरचा मधला दात पडला होता. दात बरेच दिवस हालत होता. अगदी लटकून कंटाळून शेवटी हातात आला होता. त्यामुळे टूथफेअरीला तयारी करायला बराच वेळ मिळाला होता. नाणं, भेट सगळं तयार होतं. झोपताना दात जतन करून उशाखाली ठेवण्यात आला होता. त्या दिवशी टूथफेअरीनी ऑफिसचं काम घरी आणलं होतं. ते संपवून पेंगुळलेल्या अवस्थेत तिने नाणं आणि भेट उशीखाली ठेवली. पण दातांची विल्हेवाट लावायचं तिच्या हातून राहून गेलं.

दुसऱ्या दिवशी रावीला भेट मिळाल्यावर अतिशय आनंद झाला. पण दात तसाच बघून तिला काही कळेना. ‘तू दात उशीखाली नीट ठेवला नव्हतास म्हणून तो टू. फे. ला सापडलाच नसेल!’ असं मी तिला सांगितलं. (रावीला मी किती थापा मारते हे जेव्हा तिला कळेल तेव्हा ती माझ्यावर एवढंच प्रेम करेल का?) मग तिने त्या दिवशी रात्री दाताच्या झिपलॉक बॅगेवर टूथफेअरीला सुंदर पत्र लिहिलं. त्याचा फोटो इथे लावते आहे. (दात दर्शवणाऱ्या पत्रावरच्या बाणाची कृपया दाखल घ्या.)

त्या दिवशी रात्री मात्र वेंधळेपणा न करता टूथफेअरी दात घेऊन गेली.



Saturday, November 16, 2019

नोकरीवाल्या आयांची सभा 

विडंबनाचा पहिला प्रयत्न. चू. भू. द्या. घ्या.
(मूळ बालगीत डावीकडे आणि विडंबन उजवीकडे)


Saturday, November 9, 2019

वाढदिवस इंडस्ट्री


रावीचा सहावा वाढदिवस यावेळेस लक्ष्मीपूजनादिवशी आला होतालहानपणी एखादा सण रविवारी आला की त्याने ‘सुट्टी खाल्ल्याची’ हळहळ वाटत असेतसंच यावेळेस दिवाळीने वाढदिवस खाल्लाम्हणून मग त्यापुढच्या रविवारी करायचा ठरलंकुणा कुणाला बोलवायचं हे तिला विचारताच तिने मारूतीच्या शेपटीपेक्षा (तिच्या भाषेत रपुंजलच्या केसांपेक्षालांब यादी सांगितलीमी म्हणलं, “कौन है ये लोगकहाॅंसे आते है?” त्याकडे तिनं दुर्लक्ष्य केलंत्यावेळेस तिच्या चेहऱ्यावरचा भावही मला संबोधून नेमकं तेच म्हणत होता. “कौन है ये लोगकहाॅंसे आतेहै?” मग मी मुकाट्यानं यादी लिहून घेतलीतेव्हा मला सांगण्यात आलं की आपली आपण यादी ठरवून तिने परस्पर आमंत्रणं देऊन टाकली होतीत्यामुळे मी उपचार म्हणूनपत्ता बित्ता कळावाम्हणून आमंत्रणं पाठवलीमग म्हणलं बाकीची तयारी सुरू करावीकामांची यादी करायला सुरूवात केली तसे तिच्या मित्रमंडळींचे नुकते झालेले वाढदिवस माझ्या डोळ्यांसमोर आलेवाढदिवस आता साधेसुधे राहिले नाहीतएकतर रावीला सरासरी एका वीकेंडला एक या दराने वाढदिवसांची आमंत्रणं असतातघर स्वच्छ करणेग्रोसरी आणणे याच यादीतलं हे एक काम झालंयवाढदिवसाला जाणं. भेटवस्तूंचं बजेट ठेवावं लागतंदुकानात जाऊन खेळणं घ्यायचंते गुंडाळायला कागदांचा कचरा विकत घ्यायचाते ठेवायला प्रेझेंटची सुंदर कागदी पिशवी घ्यायची आणि हे सगळं दर आठवड्याला करायचंमग बड्डेला जायचंतिथं गेलं की पोरं खेळण्यात नाहीशी होतातओळखीतला वाढदिवस असेल तर ठीकनाहीतर पालक इतर पालकांशी ओळख करून घेण्याचाआधीची थोडीफार ओळख असेल तर संभाषण सुरू करण्याचा किंवा ओळख लागत नसेल तर मेंदूला ताण देण्याचा प्रयत्न करत असतात. (एकदा अशाच एका बड्डे पार्टीला माझा नवरा रावीला घेऊन गेला होता. सगळी पार्टी झाल्यावर तो तिसऱ्याच कुणालातरी शुभेच्छा देऊन 'आता आमच्या घरी या' वगैरे म्हणून आला होता.) बड्डे टू बड्डे भेटणाऱ्या या इतर सहपालकांशी बोलून बोलायचं तरी काय हा प्रश्नच असतोहवामानाच्या तक्रारी करून करून किती करणारमग बाबा मंडळी ॲाफिस आणि क्रिकेटवर घसरतातआणि मम्मा गोटात शाळाप्रोजेक्ट यांच्या गोष्टी सुरू होतातमग पिझ्झा आणि केक खायचा आणि रिटर्न गिफ्ट घेऊन घरी यायचंत्या दिल्या - घेतलेल्या भेटवस्तूंच्या पिशव्यांमधल्या गोष्टी घरी जाऊन खेळाच्या बादलीत पडल्या की त्यांचा कार्यभाग उरकलाभारतीय लग्नांना जसं बिग फॅट इंडियन वेडिंग म्हणताततसे काही बड्डेपण बिग फॅट असतातत्यांना एक ‘थीम’ असतेम्हणजे एक सामायिक संकल्पना असतेउदामिकी माऊस किंवा कुठलीतरी एक परीमग त्या बड्डेच्या स्थळाची सजावटकेककेकवरची कॅंडलयजमान कुटुंबाचे कपडेरिटर्न गिफ्ट्सपार्टीच्या टोप्या सगळं झाडून त्या कल्पनेला अनुसरून असतंभलामोठा जेवणाचा घाट असतोकाही बड्डे पूर्णपणे आउटसोर्स्ड असतात. इथे लहान मुलांना खेळण्यासाठीचे 'प्ले एरिया' आहेत. म्हणजे एका मोठ्या हॉलमध्ये बरीच खेळणी, घसरगुंड्या, झोपाळे, भुयारं वगैरे तयार केलेली असतात. अशा ठिकाणी बड्डेची पॅकेजेस असतात. त्यात खेळ, खाणं, रिटर्न गिफ्ट्स सगळं समाविष्ट असतं. असे बड्डे म्हणजे खिशाला खड्डे. खरं सांगायचं तर वाढदिवसाला मुलांना फक्त केक कापणे/खाणे आणि मित्रमंडळींबरोबर मनसोक्त खेळणे यातच रस असतो. आपापल्या बाब्याला घेऊन आलेल्या अतिथी आई - बाबांना फार तर जेवणात रस असतो. फक्त शनिवार रविवार जरा निवांत मिळतात त्यांना. त्यामुळे सगळ्यांच्या मनात 'या दोन तासात सोफ्यावर पसरून नेटफ्लिक्स अँड चिल करायला कसं वाटलं असतं' असे विचार असतात. वाढदिवसाच्या भेटवस्तू या प्रकारातही मुलांना त्याचं वेष्टन काढेपर्यंतच रस असतो. आत काय आहे हे कळलं की त्या भेटवस्तू कपाटाचं धन होऊन जातात. कंझ्युमरिझमची मुलांशी एवढ्या कोवळ्या वयात ओळख होते. हॅलोविन, ब्लॅक फ्रायडे, व्हॅलेंटाईन दिवस यांच्या जोडीला वाढदिवसही. या दिवसांपोटी पैशांची प्रचंड उलाढाल होते. वस्तूंमागून वस्तू घरी येतात आणि पडून राहतात. 'आपल्या वाढदिवसाला त्यांनी आपल्याला अमूक तमूक दिलं होतं' असल्या ताणापोटी आणलेली कसली ती भेट? एखादं हाती तयार केलेलं कार्ड, स्वतः लिहिलेलं पत्र, खाऊ वगैरेही भेटवस्तू असूच शकते. हा सगळा विचार करून आम्ही यावेळेस थोडा वेगळा बड्डे करायचा ठरवला. आई बाबांना सांगितलं, मुलांना आमच्याकडे सोडून तुम्ही तुमचे मुले-विरहित २-३ तास घालवा. भेटवस्तू आणू नका असंही सांगितलं. (आता ते अगदी काहीच लोकांनी ऐकलं ही गोष्ट वेगळी). रिटर्न गिफ्ट म्हणून एकेक डाळिंब (आमच्या अंगणात डाळिंबाचं झाड आहे) दिलं. मुलांना मज्जा म्हणून बोलणारे पक्षी बोलावले होते. (इथे राहणाऱ्या एका जोडप्याचा हा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे ५-६ पाळीव पक्षी आहेत. ते त्यांना बोलायला, छोट्या मोठ्या करामती करायला शिकवतात आणि अशा पार्ट्यांमध्ये हे पक्षी लोकांचं मनोरंजन करतात.) या दोन-तीन तासांचा सदुपयोग करून कुणी पालक बऱ्याच दिवसांनी डेटवर जाऊन आले, कुणी आठवड्याची कामं उरकली. मुलांनीही खूप मजा केली. बड्डे गर्ल एकदम तोऱ्यात होती. दिवसभर नाचून ती आणि २-३ तास वीसेक पोरांना हाकून आम्ही अर्धमेले झालो होतो. संध्याकाळी लवकर झोपून गेलो. एकूण, दिवस छान गेला. रावी आणि रावीचे पालक थोडे मोठे झाले. 

Tuesday, May 28, 2019

खरेदी

इकडे अमेरिकेत आठवड्याची खरेदी एकदाच शनिवारी किंवा रविवारी होते. येता येता दुकानातून किराणा किंवा कोपऱ्यावरून भाजी घेऊन येणं वगैरे प्रकार नाही. वीकेंडची भाजी आणि किराण्याची खरेदी म्हणजे एक कंटाळवाणा प्रकार असतो. आपलं आपलं जाऊन खरेदीची कार्ट घ्यायची, ती ढकलत नेहमीच्या ठिकाणहून नेहमीच्या गोष्टी उचलायच्या. नजरेला आणि जिभेला वाकुल्या दाखवणाऱ्या अति तेलकट किंवा अति गोड पदार्थांतून वाट काढत भाज्या, फळांपर्यंत पोचायचं. ते झालं की दुधाच्या रॅक समोर येऊन ऑरगॅनिक की साधं, फुल फॅट का २% का ०% च्या संभ्रमात २ मिनिटं घालवायची. सगळी यादी एकदाची संपली की रांगेत उभं राहायचं. गल्ल्यावरच्या बाईबरोबर जो काही 'हाय, हावारयू' चा २ वाक्य निरर्थक संवाद होईल तेवढाच. बाकी मनुष्यप्राण्याशी संबंध येण्याचं काही कारण नाही. 

मला अशा वेळेस नेहमी भारतातल्या खरेदीची आठवण होते. अहाहा! 'कशी दिली जुडी?', 'कच्ची नका घालू', 'किरमिजी रंगात दाखवा', 'अहो आम्ही रोजचं गिर्हाइक आहोत', 'ताई जरा समजून भाव सांगा ना', 'तुमचं नाही आमचं पण नाही', 'मागच्या वेळचा नारळ नासका निघाला' अशी वाक्यं सतत कानावर पडत नसतील तर कसली ती खरेदी? भारतात खरेदीची सुद्धा एक स्वतःची संस्कृती आहे. तिचे काही अलिखित नियम आहेत. काही उत्तम सेल्समनशिप, सेवा आणि मार्केटिंगचे नमुने पाहायचे असतील तर भारतात छोट्या स्थानिक दुकानांमध्ये खरेदीला जावं. 

यात कापडखरेदीचा वर्ग उच्च आहे. कपड्यांच्या दुकानातल्या सेल्समनना अध्यात्म, प्राणायाम, ध्यान यांचं ट्रेनिंग देत असावेत. हे दाखवा, ते दाखवा करत अक्खा स्टॉक काउंटर वर पसरला असला तरी तो निगुतीनं घड्या घालायचं काम त्यांना त्याशिवाय कसं जमेल?  साडीखरेदी हा तर सेल्सासमनशिपचा कळस! (गाडीखरेदी त्याच्या दोन बोटं खाली) जनरल कपडे सेल्समन ट्रेनिंग मध्ये डिस्टिंक्शन मिळवणार्यांना साड्या विकण्याच्या एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंगला पाठवत असतील.  

साड्या विकणाऱ्याला साडीचा प्रकार माहित नसला तरी चालेल, 'सब मोह माया है' हे तत्व त्याला आधी कळले पाहिजे. २ तास साड्यांच्या घड्या मोडून त्या किती सुंदर आहेत हे पटवून देऊनसुद्धा गिऱ्हाईक त्या हिरवट आमसुली रंगापायी 'डाव मांडून भांडून मोडू नको' ची आर्जवं धुडकावून 'देखके आते है' म्हणत निघून गेलं तरी डिप्रेशनमुक्त राहता आलं पाहिजे - सब मोह माया है! दोन साड्यांमध्ये एक निवडा यची असे ल तर पटकन एक साडी स्वतःला, एक सहकर्मचाऱ्याला गुंडाळून, त्याचबरोबर लाज गुंडाळून उभं राहता आलं पाहिजे. गिऱ्हाईकाच्या रंगाला प्रत्येक साडी कशी खुलून दिसेल हे सांगता आलं पाहिजे. लग्नाच्या बस्त्याची खरेदी हा तर एखाद्या भारतीयेतर माणसाला तोंडात बोटं घालायला लावेल असा प्रकार आहे. दुकानात गाद्या लोड तक्के! हल्ली माॅलमध्ये खरेदी करायला (सामान उचलायला) आलेल्या, कुठेतरी कोपऱ्यात बसून आशाळभूतपणे घड्याळ बघणाऱ्या नवऱ्यांना माॅलमध्ये गाद्या तक्के उपलब्ध करून देणे ही एक स्टार्टअप बिझनेस आयडियाअसू शकते. (इच्छुकांनी आय. पी. चा आदर करावा.) असो. बस्त्याचं गिर्हाईक असं मुक्काम ठोकण्याच्या तयारीने दुकानात येतं. चहा पाणी, जेवणासाठी सुट्टी घेऊन वर्किंग डे सारखी मनोभावे खरेदी चालते. विहिणबाईंसाठी कुठली साडी घ्यावी, मुलाच्या आत्यासाठी कुठली, यांचं सजेशनपण सेल्समन देतात रीतसर.

किराणा दुकानात आपण हाडामांसाच्या माणसांशी बोलत असू हेच हल्ली विसरायला झालंय. सगळा कॅशलेस, पपेरलेस आणि ह्यूमन इंटरॅक्शनलेस व्यवहार. मी लहानपणी किराणा दुकानात किंवा गिरणीच्या दारात राजकीय महाचर्चेपासून नणंदेच्या चहाड्यांपर्यंत कसल्याही गप्पांचे फड रंगलेले पहिले आहेत. तसले ‘मे. अमके तमके ब्रदर्स, किराणा आणि भुसारमालाचे घाऊक आणि किरकोळ विक्रेते' हल्ली फारसे दिसत नाहीत. त्यांच्या जागी आता ‘बिकानेर किराना भंडार’, 'माँ शाकंभरी जनरल स्टोर्स' किंवा 'फूडी गुडी सुपरमार्केट' आले आहेत. काउंटरवर ठेवलेल्या त्या बरण्या, त्यातल्या लिमलेटच्या गोळ्या, ते लाल रॅपर मधले किसमी टॉफी बार्स, वर्तमानपत्राच्या त्या पुड्या, पुडीचे दोरे, त्याचं ते दुकानात टांगलेलं रीळ, मागे उघडून ठेवलेली किराण्याची पोती सगळं आता इतिहासजमा झालं. प्लास्टिकच्या पॅकेट किंवा पिशव्यांमध्ये बसून किराणा घरी येऊ लागल्यापासून पुड्या आणि पुड्या बांधण्याचं हस्तकौशल्यसुद्धा कालबाह्य झालं. 

आता सर्वांत महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळते. तो म्हणजे बार्गेनिंग. भारतात भाजी, मासे, किराणा, रस्त्यावरचे कपडे या नेहमीच्या ठिकाणांपासून पाणीपुरीचे गाडे, हॉटेलं, बँका, फार्मसी असं कुठेही बार्गेनिंग चालतं. 'MRP ही (जिथे असते तिथे) शोभेची वस्तू आहे' हा विक्रेते आणि ग्राहक यांच्या परस्परसंबंधाचा पाया असतो. रस्त्यावर खरेदी करणाऱ्या बार्गेनिंग कोळून प्यालेल्या ग्राहकांची खरेदी बघणं हा एक रंजक प्रकार आहे. 'थोडा कम करो' पासून श्रीगणेशा होतो. दोन्ही बाजू पहिली बोली लावायला तयार नसतात. थोडा वेळ 'आप बोलो', 'नही आप बताव' झालं की भैय्या १००० चा नारळ फोडतो. मग समोरून ५० नी सुरुवात होते. मग जोरात वाटाघाटी चालतात. "इतना मार्जिनभी नही है मॅडम", "पता है हमको. हमारे पास पैसेही नही है", "इससे कम नही होगा", "इससे ज्यादा नही दूंगी" वगैरे दहा मिनिटे झालं की सौदा सोडून बेहेनजी चालू लागतात. मागून बुलावा येणार आहे याची त्यांना खात्री असते. शाहरुखने काजोलची बघितली नसेल तेवढी बेहेनजींनी मागे वळून बघण्याची भैया वाट बघत असतो. बेहेनजींना हे ठाऊक असतं. थोडं ताणून शेवटी कुणीतरी 'जाऊंदे राव' म्हणत माघार घेतं आणि सौदा सुटतो. 

अशी भावभावनांचा स्पर्श असलेली खरेदी म्हणजे एक अनुभव असतो. नाहीतर 'Paying money in the exchange of goods or services' असल्या कोरड्या गोष्टीला व्यवहार म्हणता येईल फारतर. इकडे युट्यूब वर टार्गेट किंवा वॉलमार्ट शॉपिंग हॉल वगैरे नामक व्हिडिओ बघितले की म्हणावंसं वाटतं, 'हाये कंबख्त तूने पीही नही!'

Thursday, March 28, 2019

आज्जीची गोष्ट

मऊसूत साडी दूधसाय जशी
उबदार चादरीत आज्जीची कुशी
डोळ्यांत झोप, तरीही हट्ट
सांग ना आजी अजून एक गोष्ट
कधी राम तर कधी कृष्ण
इवल्या डोक्यात मोठ्ठाले प्रश्न
कधी बाल शिवबाचे दर्शन घडे
कधी कावळ्याच्या रांजणात खडे
काऊ नि चिऊ, ससा आणि कासव
बिरबलाच्या खिचडीचं मध्येच आर्जव
पापण्यांत झोप मावेना जरी
मी खीर खाल्ली तर बूड घागरी
मंतरलेला आवाज थोपटणारे हात
गोष्ट भिनते गुंगलेल्या मनात
पिसासारखा होत जाई विचारांचा आवेश
झोपेच्या हद्दीत होतो अलगद प्रवेश