दुधाचे दात पडणे हा एक मैलाचा दगड असतो. ही फेज बराच काळ चालते. मला आठवतंय माझा शेवटचा दुधाचा दात सहावीत असताना पडला होता. म्हणजे जवळजवळ ६ वर्ष माझे दुधाचे दात पडत होते. रावीचे खालचे २ आणि वरचा १ असे ३ दात हल्लीच पडले. वरच्या दाताच्या ठिकाणी आता सुंदर खिडकी तयार झाली आहे. एकदा दात हलायला लागला की तो सतत हलवायचा चाळा लागतो. मग त्याला नुसता नकळत धक्का लावण्यापासून पार १८० अंशात पिरगळेपर्यंत प्रवास होतो. रावी बघावं तेव्हा त्या दातांशी खेळत असते हल्ली. पार उलटा पालटा होऊन, केवळ एका धाग्याने हिरडीत लटकून शेवटी एकदा कधीतरी तो पडतो. सुस्कारा सोडताना उडून पडतो, खाताना घासाबरोबर खडा लागल्यासारखा येतो किंवा हलवताना अलगद हातात येतो.
दात पडला की तो रात्री उशाखाली ठेवायचा, म्हणजे रात्री टूथफेअरी नावाची परी येऊन तो दात घेऊन जाते आणि त्याबदल्यात एखादं नाणं किंवा छोटीशी भेट ठेऊन जाते. ही अमेरिकन पद्धत ऐकल्यावर हल्लीच्या मुलांची मजाए असं परत एकदा वाटलं. आम्ही दात पडला की त्याला व्यवस्थित न्याहाळून झाल्यावर छपरावर फेकायचो. तेपण नवा दात वाकडा येऊ नये म्हणून. नंतर तयार झालेल्या खिडकीला जीभ लावू नको म्हणून ओरडे खायचो. परी बिरी काई नाई. रावीकडे ३ वेळा टूथफेअरी येऊन गेली. प्रत्येक दाताची वेगळी कहाणी आहे. त्यापैकी या २ अधिक सुरस कहाण्या.
पहिला खालचा दात पडला तेव्हा रावी परीच्या आगमनासाठी बरीच उत्सुक होती. तो नेमका शाळेत पडला. त्यामुळे झिपलॉक बॅग मधून खजिन्यासारखा सांभाळून ती तो घरी घेऊन आली. त्या पडलेल्या दाताचे आणि त्याच्या ठिकाणच्या पोकळीचे यथेच्छ फोटो काढून झाले. कधी नव्हे ते त्या दिवशी कधी एकदा झोपायला जातोय असं तिला झालं होतं. रात्री दात घासायची वेळ झाली तेव्हा तिच्या डोक्यात असे विचार आले असावेत: ‘आपण काही रोज नियमाने दात घासत नाही. टूथफेअरीला अस्वच्छ दात मिळाला तर मिळणाऱ्या नाण्यांमध्ये कपात होण्याची शक्यता आहे. न जाणो, चिडली बिडली तर नंतर येणारच नाही. आत्ता तर पहिलाच दात पडलाय. ते काही नाही. सोन्याचं अंडं देणाऱ्या कोंबडीला खुश ठेवायलाच हवं!’ झालं. तिनं तो दात झिपलॉक मधून बाहेर काढला. हिऱ्यासारखा हाताळत बेसिनजवळ आली आणि तो दात घासायची मनीषा तिने बोलून दाखवली. आता तुम्हाला दाताच्या मापाची कल्पना नसेल तर सांगते. तो दात साधारण तुरीच्या डाळीएवढा होता. पाण्याचा पेला, दुधाची बाटली अशा मोठ्या गोष्टी पण काही कारण नसताना रावीच्या हातातून उगाचच पडतात. तो एवढुसा दात बेसिनच्या जवळ बोटांत पकडून दुसऱ्या हाताने तो ब्रश करताना हमखास तिच्या हातातून सटकणार, बेसिन मध्ये पडणार, मग रडं, सारवासारवी, झोपायला उशीर, सकाळी उठायला उशीर, शाळेत टार्डी स्लिप असा सगळा दूरदृष्टीनं विचार केल्यावर मी तिला म्हणलं, ‘थांब मी घासते तुझा दात. छान लखलखीत करून टाकते.’ तिला ते पटलं.
आता स्लो मोशन. रावीने जपून तिच्या हातातला दात माझ्या हातात दिला. मी त्याला ब्रश करण्यासाठी चिमटीत घट्ट पकडला आणि तेवढ्यात तो खट्याळ दात माझ्या चिमटीतून सट्कन निसटला. पुढचं रामायण झर्रकन माझ्या डोळ्यासमोर आलं आणि मी जिवाच्या आकांताने त्या दाताला पकडण्यासाठी माफक थयथयाट केला. पण तो इकडेतिकडे १-२दा टप्पे घेत अखेरीस बेसिनमधून खाली ‘अच्छा तो हम चलते है’ म्हणता झाला. त्या धक्क्यातून सावरेपर्यंतच टिपेच्या आवाजातलं रडं ऐकू येऊ लागलं.
माझा भाऊ स्वानंद तेव्हा घरात होता. रावीला एकीकडे समजावण्याचा प्रयत्न करत असताना मी दुसरीकडे त्याला परिस्थिती समजावून सांगितली. तो ५ मिनिटांत बेसिनकडून ‘मिळाला! मिळाला!’ अशी आरोळी ठोकत आला. त्याने आणलेला दात बघून तो दात नसून काहीतरी वेगळंच आहे हे मी लगेच ताडलं. खरंतर रावीलाही शंका आली. पण ‘पडून पडून तो असा वेगळाच दिसायला लागलाय’ अशी थाप खपली. स्वानंदने कुठल्यातरी फरशीचा टवका उत्पन्न करून आणला होता. वेळ मारून नेली. दुसऱ्या दिवशी टूथफेअरीचा सोहळा यथासांग पार पडला.
आता दुसरी कहाणी. यावेळेस वरचा मधला दात पडला होता. दात बरेच दिवस हालत होता. अगदी लटकून कंटाळून शेवटी हातात आला होता. त्यामुळे टूथफेअरीला तयारी करायला बराच वेळ मिळाला होता. नाणं, भेट सगळं तयार होतं. झोपताना दात जतन करून उशाखाली ठेवण्यात आला होता. त्या दिवशी टूथफेअरीनी ऑफिसचं काम घरी आणलं होतं. ते संपवून पेंगुळलेल्या अवस्थेत तिने नाणं आणि भेट उशीखाली ठेवली. पण दातांची विल्हेवाट लावायचं तिच्या हातून राहून गेलं.
दुसऱ्या दिवशी रावीला भेट मिळाल्यावर अतिशय आनंद झाला. पण दात तसाच बघून तिला काही कळेना. ‘तू दात उशीखाली नीट ठेवला नव्हतास म्हणून तो टू. फे. ला सापडलाच नसेल!’ असं मी तिला सांगितलं. (रावीला मी किती थापा मारते हे जेव्हा तिला कळेल तेव्हा ती माझ्यावर एवढंच प्रेम करेल का?) मग तिने त्या दिवशी रात्री दाताच्या झिपलॉक बॅगेवर टूथफेअरीला सुंदर पत्र लिहिलं. त्याचा फोटो इथे लावते आहे. (दात दर्शवणाऱ्या पत्रावरच्या बाणाची कृपया दाखल घ्या.)
त्या दिवशी रात्री मात्र वेंधळेपणा न करता टूथफेअरी दात घेऊन गेली.