Thursday, March 28, 2019

आज्जीची गोष्ट

मऊसूत साडी दूधसाय जशी
उबदार चादरीत आज्जीची कुशी
डोळ्यांत झोप, तरीही हट्ट
सांग ना आजी अजून एक गोष्ट
कधी राम तर कधी कृष्ण
इवल्या डोक्यात मोठ्ठाले प्रश्न
कधी बाल शिवबाचे दर्शन घडे
कधी कावळ्याच्या रांजणात खडे
काऊ नि चिऊ, ससा आणि कासव
बिरबलाच्या खिचडीचं मध्येच आर्जव
पापण्यांत झोप मावेना जरी
मी खीर खाल्ली तर बूड घागरी
मंतरलेला आवाज थोपटणारे हात
गोष्ट भिनते गुंगलेल्या मनात
पिसासारखा होत जाई विचारांचा आवेश
झोपेच्या हद्दीत होतो अलगद प्रवेश