बरेचदा काहीतरी कारण काढून, क्वचित सहज, कधी खूप आग्रह करुन शेवटी ते यायला संमती देतात. फेसटाईम, स्काईप सगळं ठीक, पण खरंखुरं एका ठिकाणी असणं, प्रत्यक्ष नजर मिळवणं, स्पर्श करणं हे जादूसारखं असतं. त्याची ओढ त्यांनाही असतेच. तारीख-वार, ऋतू, सुट्टया, वाढदिवस यांची गणितं मांडून तिकीटं मुक्रर होतात. त्रिकोण / चौकोनात आंबलेलं आयुष्य त्यांच्या वाटेकडे डोळे लावून असतं.
मग भारतातून काय काय आणायचंय त्या गोष्टींची यादी सुरू होते, तिची ५६ वेळा उजळणी होते. त्या यादीत कुळथाचं पीठ, भडंगाचा मसाला, आकाशकंदील, कुकर (लहान / मध्यम / मोठा, दोन भांड्यांचा / तीन भांड्यांचा, आतल्या / बाहेरच्या झाकणाचा वगैरे), डोसे करायचा तवा, केसांना लावायचं आयुर्वेदीक तेल, फ्रोझन आमरस, मोठ्या हीराची केरसुणी, झालंच तर कुरडया, पापड, मेतकूट असं काहीही असतं. या यादीत मुलांच्या गोष्टी राखीव असतात. बॅगचं वजन जास्त भरलं तरी मुलांच्या खेळण्यांना अपील नाही. नेटानं शेवटपर्यंत या सगळ्या सामानाची जमवाजमव ते करतात. मग हळूहळू प्रवासाची शारीरिक मानसिक तयारी सुरू होते. जवळ ठेवायच्या कागदपत्रांची यादी, त्यांच्या प्रिंटआउट हे सगळं पार पडतं. आधी सामान चेक इन, मग सिक्युरिटी, मग इमिग्रेशन हा सगळा क्रम घोकून होतो. बॅगांची वजनं होतात, ४-५ किलो इकडे तिकडे होतात. "पासपोर्ट सांभाळा, इमिग्रेशनच्या शिक्क्यावरची तारीख तपासा" वगैरे सोपस्कार होतात आणि शेवटी एकदाचा व्हाॅट्सॅपच्या 'फॅमिली कट्टा' किंवा तत्सम नावाच्या ग्रूपवर 'checked in at the airport, now waiting for the flight' चा मेसेज थडकतो आणि जीव भांड्यात पडतो. विमानतळावरच्या वायफायचा चोख उपयोग झालेला असतो!
इकडे स्वच्छता, बेडशीट बदलणे, कप्पे रिकामे करणे सुरू असतं. पोरं आठवड्यापासून शेजारी-पाजारी, शाळेत, मित्रमंडळींमध्ये ते येणार असल्याची जाहिरात करत असतात. विमानतळावर त्यांच्या विमानातले लोक बाहेर पडायला लागले की मनात पुन्हा गदारोळ होतो. सामान मिळालं नसेल का, इमिग्रेशनला खूप प्रश्न विचारले असतील का, अरे बापरे खसखस नसेल ना आणली चुकून? इतक्यात ते बाहेर पडताना दिसतात. आम्हाला शोधणाऱ्या नजरा, प्रवासाने थकले भागलेले चेहरे.. सामानाचा डोलारा ढकलत ते बाहेर येतात. मुलं दृष्टीला पडताच, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलतात. थकवा ते हसू ते आनंदाश्रू असं ट्रान्सफॉरमेशन बघण्यासारखं असतं. भावनांचा आवेग हळूहळू प्रवासाच्या हकीकती, कोण किती बारीक / जाड झालंय, मुलं केवढी उंच झालीयेत, कशी मोठी दिसायला लागली आहेत अशा गप्पांमध्ये ओसरत जातो.
घरी आल्या आल्या सामानाची उचकाउचकी सुरु होते. मुलांचाच काय, आमचाही त्याच्यावर डोळा असतो. जरा निवांत झालं की तो अलीबाबाचा खजिना उघडतो. त्यांचे स्वतःचे कपडे आणि पुस्तकं एखाद्या छोट्या पिशवीत मावलेले असतात, आणि बाकी सगळ्या सामानात आमचा संसार भरून आणलेला असतो. त्यात ३-४ पिशव्या तर भाजणीच्या पिठाच्याच असतात. हे सगळं आता कुठे ठेवायचं, हा प्रश्नही तेच सोडवतात. स्वैपाकघर त्यांच्या ताब्यात गेलेलं असतं.
त्या दिवसानंतरचे दिवस, महिने कसे उडून जातात कळतंच नाही. अचानक थेट त्यांच्या निघण्याचा दिवसच उजाडतो. त्यांचा स्काईपचा पासवर्ड हमखास विसरलेला असतो. जाताना बॅग्ज खुळखुळ्यासारख्या झालेल्या असतात. आपल्या माणसांपासून दूर जाण्याचं दुःख, घरचे लागलेले वेध, एवढ्या दिवसांच्या वास्तव्याच्या आठवणी अशा संमिश्र भावना घेऊन ते परततात. त्यांचा निरोप घेऊन विमानतळावरून परतल्यावर घर आपलं नसल्यासारखं भासतं. कप्पे रिकामे झालेले असतात. त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी नसल्याचं प्रकर्षानं जाणवत राहतं. इतके दिवस वाळूसारखे बोटातून सटकून गेले असं वाटत राहतं. त्यांना विश्रांती देण्याचं ठरवलेलं राहून गेलेलं असतं. अमक्या तमक्या ठिकाणी घेऊन जायचं राहून गेलेलं असतं. स्वैपाकघरात गोष्टी सापडेनाशा झालेल्या असतात. पोळ्या काही केल्या गोल होत नसतात. मुलांना एखादं स्तोत्र यायला लागलेलं असतं. एखादा रिकामा झालेला डबा धुवून पुसून चिवड्याने भरून ठेवलेला असतो.
हताश सुस्कारे सोडून मन तयारी करायला लागतं.. आता पुन्हा चौकट, पुन्हा स्काईप, पुन्हा रोजचे संघर्ष, पुन्हा एकदा आपला हात जगन्नाथ!