कोणे एके करोनापूर्व काळी, जेव्हा मुलीचे वेगवेगळ्या अवांतर गोष्टींचे क्लासेस प्रत्यक्ष भेटून होत होते, तेव्हा बरेचदा तिला न्यायची किंवा आणायची कामं करावी लागत. गाडीत गाणं सुरु नसेल तर तिच्या दृष्टीनं फाऊल असतो. त्यामुळे बसल्या बसल्या कुठल्यातरी गाण्याची फर्माईश होत असे. मग मी सिरीमावशीला फर्मान सोडत असे, की लगेच गाणं सुरु, मागे पण गाण्याबरोबर गाणं सुरु. एखादं गाणं ऐकावंसं वाटणं आणि ते कानी पडणं यातलं अंतर साधारण १ मिनिट.
कट टू, नॉट सो लॉंग अगो.. एखादंच गाणं ऐकावंसं वाटणं हा नेसेसरी असला तरी सफिशिएंट क्रायटेरिया नव्हता. ऐकावीशी वाटणारी १२-१५ गाणी जमा करायची. त्यांची माहिती लिहून ठेवायची. मग जवळच्या रेकॉर्डिंग दुकानात ही यादी द्यायची. मग किमान ३ ते कमाल १० दिवसांनी दुकानातले काका एक सुंदर कॅसेट करून देणार. तिच्या आतल्या कागदावर सगळी गाणी लिहिलेली असणार. आपल्या यादीतलं एखादं गाणं न मिळाल्याने गळलेलं असणार. त्याची किंचित हळहळ वाटणार. मग घरी येऊन टेप रेकॉर्डर छान चालत असेल, अडकून बसला नसेल, तर पुढे.
मग त्याचं इजेक्टचं बटण दाबलं की कॅसेट होल्डर खाट्कन आ वासणार. त्यात ती कॅसेट (सरळ, उलटी वगैरे बघून) घालायची. होल्डरचा आ बंद करायचा आणि 'प्ले'चं बटण दाबायचं. मग ते महिन्यापूर्वी ऐकावंसं वाटलेलं गाणं कानांना सुखावणार. कॅसेट अडकत नाही तोवर. मग ५-६ गाण्यांनंतर कॅसेट उलटी करायची.
स्नेह संमेलनाचा नाच बसवताना त्या टेप रेकॉर्डरची परीक्षा असायची. सारखं आपलं फॉरवर्ड रिवाइंड, उलट सुलट करून त्याचं स्ट्रेस टेस्टिंग होत असे. कधीतरी अधे मधे फॉरवर्ड किंवा रिवाइंड करताना टेप हमखास गुंडाळली जाणार, किंवा बाहेर येणार. मग पेन्सिल किंवा पेन नावाचं शस्त्र घेऊन ती फिरवत फिरवत मन लावून उलटी गुंडाळायची.
काही वर्षांनी मग सीडीज् आल्या. तेव्हा साठवायचं माध्यम वेगळं असलं तरी अनुभव साधारण असाच. पण त्या गरीब पण दणकट टेप रेकॉर्डर पेक्षा त्यांचे हे सीडी प्लेअर बंधू जास्त हाय क्लास. त्यांच्या दुप्पट आकाराचे आणि जास्त रुबाबदार. गाण्याबरोबर नाचणारे त्यांचे ते ग्लॅमरस LEDs. मध्यमवर्गीय शो-केसचा एक अख्खा कप्पा व्यापून जणू शोभेची वस्तूच असल्यागत ते मिरवत.
मग संगणकाने घरात क्रांती केली. त्यांच्याबरोबर इंटरनेट आलं, 'वूफर'वाले स्पीकर आले, विनॅम्प मीडिया प्लेअर आलं आणि निरो सीडी बर्नर सॉफ्टवेअर आलं. पेन ड्राइव्हवर गाणी सर्रास वाटली जाऊ लागली. गाणी ऐकण्याच्या अनुभवावर जबरदस्त नियंत्रण आलं. 'साला अपूनीच गॉड है' छाप. एकाच खोलीत आईचा रेडिओ 'झुळझुळ वाणी, खेळवा पाणी' करत असेल तरी एकीकडे कानात हेडफोन लावून 'कल हो ना हो' सुरु ठेवता येऊ लागलं.
मग आले ते एम्.पी.३ मीडिया प्लेअर्स. कुठेही घेऊन जाता येणारं संगीत वॉकमन आणि पोर्टेबल सीडी प्लेअर यांच्या रूपात अस्तित्वात होतं आधीही. पण आता पोर्टेबल संगीत अगदी सामान्य झालं. ऍपलच्या त्या चिंटुश्या चौकोनी 'आयपॉड शफल'ची जबरदस्त क्रेझ होती. कानातलं बोन्डूक सर्वमान्य व्हायला सुरुवात झाली. मग नंतर तर स्मार्ट फोननी अनेक घरगुती वस्तूंच्या नोकऱ्या गेल्या. कॅलेंडर, घड्याळ, फोन यांच्या यादीत म्युझिक प्लेअर्सपण. एवढं झालं तरी बरेच दिवस स्वतः संगीत विकत घेऊन, साठवून ठेवावं लागत होतं. आता तर तेही सगळं ढगात होतं. दूध आणि वर्तमानपत्रासारखं संगीत-पुरवठा ही एक सेवा झाली. महिन्याचं बिल भरलं की वाट्टेल तेव्हा वाट्टेल ते ऐका.
त्यात आता ए. आय. ची भर. म्हणजे एकतर तुम्हाला काय ऐकायचंय हे टायपायचीही गरज नाही. फक्त बोला. आणि दुसरं म्हणजे ऑटो-प्लेलिस्ट. म्हणजे बोलूही नका. तुम्ही जे सामान्यतः ऐकता, त्यावरून तुमची आवड ओळखून आम्हीच तुम्हाला ऐकवत राहू. जेवढं ऐकाल तेवढा आमचा अंदाज बरोबर होत जाईल.
ऑटो-प्लेलिस्ट हा प्रकार सोयीचा असला आणि साधारणपणे तुमच्या आवडीचीच गाणी तुमच्या लिस्टमध्ये असली तरी शेवटी तो संगणकच. तो चालणार अल्गोरिदमवर. भावनेवर नाही. त्यामुळे 'देखा है पेहली बार, साजन की आंखोमें प्यार' (टिक्टी टिडीन्ग, टिक्टी टिडीन्ग), 'चंद्र आहे साक्षीला', 'रोअर' आणि 'जिंदगी कैसी है पहेली' ही सगळी गाणी मला आवडत असली, तरी ती धपाधप एकापाठोपाठ एक, एका दमात ऐकवताना सिरीमावशींना काहीही वाटत नाही. असो. देव त्यांना माफ करो.
संगीत ऐकण्याच्या अनुभवात असे सगळे चांगले वाईट (जास्तकरून चांगलेच) बदल झालेले असले तरी, सर्वांत जास्त आनंद देणारा प्रकार म्हणजे प्रत्यक्ष्य गाणं ऐकणं यात काही कुणाचं दुमत असणार नाही. मग ती एखादी हाय फाय कॉन्सर्ट असो, एखादी शास्त्रीय मैफिल असो, दिवाळी पहाट असो, घरातच मावश्या-काकवांची गप्पांसोबत जमून आलेली मैफिल असो किंवा रात्री झोपवताना आज्जीच्या कातर आवाजातली गुंगवणारी अंगाई असो.. नाही का?