लहानपणी आमच्याकडे एक गोष्टीची कॅसेट होती. ‘छान छान गोष्टी’ नावाची. मला त्या गोष्टी ऐकायचं अगदी व्यसन लागलं होतं. लूपमध्ये ती कॅसेट सुरू असे. भक्ती बर्वे, सुलभा देशपांडे, अश्विनी भावे यांसारख्या दिग्गजांच्या आवाजात या गोष्टी होत्या. मला आजही त्यातली काही वाक्यं जशीच्या तशी आठवतात. त्यांचा आवाज, शब्दांवरचा जोर, पार्श्वसंगीत यांच्यासकट. आणि मुख्य म्हणजे त्या तेव्हा ऐकताना डोळ्यांसमोर जी चित्रं उभी राहिली होती, त्यांच्यासकट. बालमनात तयार झालेली कल्पनेतली ही चित्रं रम्य होती, अवास्तव होती आणि सुंदर होती.
माझी मुलगी सध्या त्याच वयात आहे. तिलाही तो अनुभव मिळावा म्हणून मी त्या गोष्टी इंटरनेटवर शोधल्या. थोडी शोधाशोध केल्यावर काही यूट्यूबवर मिळाल्या. त्याच जशाच्या तशा गोष्टी. त्याच्याबरोबर ॲनिमेटेड व्हिडिओही. मला खूप आनंद झाला. मी लगेच एक गोष्ट रावीला दाखवली.
तिने ती आनंदाने बघितली. पण माझा जबरदस्त विरस झाला. माझ्या मनातली चित्रं आणि ही व्हिडिओतली चित्रं यांचा काहीही संबंध नव्हता. ही चित्रं फारच मिळमिळीत आणि पठडीतली होती. आणि आता रावीला तिची स्वत:ची चित्रं काढायला वावही नव्हता. त्या व्हिडीओतल्या चित्रांची जागा आता तिच्या मनात वेगळं काहीही घेऊ शकणार नव्हतं. एरवी जी वारा पिऊन सुसाट सुटली असती, त्या कल्पनाशक्तीला त्या व्हिडिओतल्या चित्रांनी बंदिस्त केलं.
एखादं पुस्तक वाचलेलं असेल तर त्यावर आधारित सिनेमा बरेचदा अपेक्षाभंग करतो. त्याचं कारण हेच असावं. आपल्या आणि दाखवणाऱ्याच्या कल्पनेचा मेळ बसत नाही. विशेषतः लहान मुलांची कल्पनाशक्ती अचाट असते. त्यावर वहिवाटेची पुटं चढलेली नसतात. शक्य / अशक्य, वास्तव / अवास्तव यातल्या सीमारेषा ठळक झालेल्या नसतात. रावीनी काढलेल्या सगळ्या चित्रांमध्ये ('माझा आवडता पदार्थ' नावाचं चित्र असलं तरी) आकाशात इंद्रधनुष्य असतं आणि त्यात बरेचदा छपन्न रंग असतात. त्यात एखादा ग्लिटरचा आणि एखादा बदामांचा पट्टाही असतो. ती किंवा कुठलंही लहान मूल गोष्ट ऐकत किंवा वाचत असताना त्यांचे ते आ वासलेले, स्वतःला विसरलेले भाव बघून त्यांच्या मनात उडी मारावीशी वाटते. काय सुंदर रंगीबेरंगी चमचमता राडा असेल तिथं! ईशान अवस्थीनी काढलेल्या चित्रांनी भरून माखलेल्या गुहेत शिरल्यासारखं वाटेल. (संदर्भ: तारे जमीन पर)
कधीकधी अशी चित्र रावी रंगवत असतानाच कदाचित तिची मंत्रचळी ऑब्सेसिव्ह आई मधेच ओरडत असेल.. 'झाड कधी जांभळं असतं का?' किंवा 'रेषा सरळ काढ' किंवा 'पटपट आवर' किंवा 'लक्ष कुठे आहे?' किंवा अगदी परवलीचं 'डोळ्यावरचे केस मागे घे'. माफ कर बाई. मोठी झालीस की कळेल तुला!
No comments:
Post a Comment