Sunday, September 28, 2014

रावीचे मनोगत

हाय! माझं नाव रावी. असा माझा अंदाज आहे. कारण बरेच लोक मला रावी म्हणतात. बाबा कधी कधी अरेरावी म्हणतो. आई तर प्रत्येक वेळेस वेगळंच काहीतरी म्हणते. त्यामुळे गोंधळ होतो. पण रावीच असावं बहुतेक. मी आता लवकरच एक वर्षाची होणार आहे. एक वर्ष कसं गेलं कळलंच नाही. असं सगळे म्हणतात. म्हणजे काय कोण जाणे. 

मला खूप सारे छंद आहेत. ते बदलत असतात. आधी पालथं पडून उजवीकडे लोळत लोळत भिंत लागेपर्यंत जायचा माझा छंद होता. मग वाट दिसेल तिकडे रांगत जायचा छंद जडला. विशेषतः आई बाबा जिथे मागे येऊ शकत नाहीत तिथे. उदा. टेबल / खुर्ची खाली, डायपर बॉक्स मध्ये, खेळण्यांच्या बास्केट मध्ये, कपाटाच्या खालच्या कप्प्यात आणि चप्पल stand जवळ. हल्ली सगळीकडे उभं राहण्याची मला आवड लागली आहे. सगळीकडे. विशेषतः pram मध्ये, high chair वर आणि कार सीट मध्ये. मी उठल्या उठल्या आधी उभी राहते आणि मगच बाबाला चिमटे काढते. 

आणि काही गोष्टी मला करायला आवडतात असं नाही, पण त्या केल्याशिवाय मला चैनच पडत नाही. म्हणजे आई जे खायला देते ते सोडून बाकी सर्व गोष्टी खाणे. सर्व. चप्पल, वायर, फोन, स्टीकर, केरसुणी, दोरे वगैरे वगैरे. आई सगळं काढून घेते. हातातून किंवा तोंडातून. आणि मला teether देते.  Teether काही खायचा असतो का?

अपरात्री आई बाबांना लाथा मारायलाही मला आवडतं असं नाही. पण मी त्याला काही करू शकत नाही. कधी कधी मी उठून light लावायला पण जाते. तेही त्यांना आवडत नाही. 

मला sockets आणि plug दिसले की राहवत नाही. बस आणि ट्रेन मध्ये आरडा ओरडा करावाच लागतो. आई बाबांच्या जेवणाच्या ताटावर हात मारावाच लागतो. अशा गोष्टी केल्यावर आईचा चेहरा बघण्यासारखा होतो. बिचारी! कधीकधी तर इतक्या जोरात ओरडते की मला दचकायला होतं. मग मी घाबरल्यासारखं करते आणि परत कामाला लागते. 

आणि काही गोष्टी मला अज्जिबात आवडत नाहीत. मला कुठेही बांधून ठेवलेलं मला आवडत नाही. pram, high chair आणि कार सीटला पट्टे का करतात? आणि टोप्या कशाला बनवतात उगाच?

मला एका जागी स्वस्थ का काय ते बसायलाही अज्जिबात आवडत नाही. आणि झोपायलाही मला विशेष आवडत नाही. 

कुणी भेटलं की आई बाबा मला अचानक फार प्रश्न विचारू लागतात. तेही मला मुळीच आवडत नाही. हाय कसं करायचं? रावी कुठे आहे? रावीचे हात, पाय, नाक कुठे आहे? वगैरे. सगळ्यांना या प्रश्नांची उत्तरं माहित असतात. आणि नसली तरी आपण कशाला सांगायची उगाच? मग अशा वेळी मी आई बाबांना ओळखतच नसल्यासारखी वागते. मग लोक गेले की आई बाबांना वाईट वाटू नये म्हणून हाय पासून टाटा पर्यंत सगळं करून दाखवते. 

आणि माझी secrets सांगू का? आईनं उचलून कडेवर घ्यावं म्हणून मी मोठ्याने गळा काढून खोटं खोटं रडते. आईनं मला भरवताना बिब बांधायचं सोडून द्यावं म्हणून मी बाकी सगळीकडे तोंड पुसते. आईच्या टॉपला तर नेहमीच. तिनेच खरंतर बिब घालायला पाहिजे. मला झोपवून आई नेहमी हळूच सटकायला बघते. पण मी झोपलेलीच नसल्याने मला लग्गेच कळतं आणि मी promptly रडायला लागते. पण तरीही आई रोज प्रयत्न करते. 

माझे २-२ आज्जी आजोबा आहेत. ते सगळे कॉम्प्युटर मध्ये राहतात. माझे खूप लाड करतात. मला ते खूप आवडतात. 

बाबा ऑफिस मधून आला की खूप फास्ट त्याच्याकडे रांगत जाऊन त्याच्या कडेवर थोडा वेळ शांत पडायला मला खूप आवडतं. मग २ मिनिटात आम्ही दंगा करायला सुरुवात करतो. 

माझी आई मला हवं ते काही करून देत नाही. पण मला भूक लागलेली तिला लग्गेच कळतं. ती नसली की मला रडू येतं. मग ती दिसली की मी तिला घट्ट मिठी मारते आणि तिची पाठ थोपटते. आईची कुशी ही माझी सगळ्यात आवडती गोष्ट आहे.    
   

Tuesday, September 16, 2014

बाळराजांचा वरणभात

पहिल्या वाफेचा गरम भात I उकरुनि घ्यावा पानात I 
मोकळा करावा गात I वदनी कवळ घेता II 

भात नसावा कोरडा I नको थंड वा भरडा I 
मऊसूत अन गुरगुट्या I बाळराजांसाठी II 

भातावर तूपाची धार I मीठसुद्धा चिमूटभर I 
लिंबूरसाने चवदार I आमुच्या तोंडास पाणी II 

त्यावर गरम वरण I आणि प्रसन्न वातावरण I 
साऱ्या चिंता होती हरण I सुखद दर्शनाने II 

बाळास खुर्चीत बसवावे I अंगावरती बिब पांघरावे I 
फुंकर मारुनी भरवावे I एकेक घास II 

भात मटमटा पोटात जाई I आईचे घोडे गंगेत न्हाई I 
चटक्यांचे सार्थक होई I  भात कालवताना II 

बाळराजे क्षणही शांत न बसती I खुर्चीवर चढून उभे राहती I 
मधेच ताटावर हात मरती I व्रात्य अन खोडकर ते II 

तोंडातला घास फुरकावणे I मानेला हिसका देणे I 
पोट भरल्याची लक्षणे I बाळराजांची II 

शिलकीचे सेवन आपण करावे I मेतकुटाने सजवावे I 
तोंडी लावण्यास लोणचे घ्यावे I सुख अजून काय ते II