Sunday, July 26, 2020

बदली




हा विषय खरंतर बरेच दिवस डोक्यात घोळत होतापण कधीकधी अगदी जवळचेस्वत:चाच भाग असलेले विषय हातावेगळे करता येत नाहीततसंच काहीतरी झालंबाबांच्या बदल्या हा माझ्या आणि माझ्या बहिणीच्या जडणघडणाचा एक फार मोठा भाग आहेतया बदल्यांनी आमच्यासाठी साध्या साध्या प्रश्नांची उत्तरं मात्र अवघड करून टाकलीउदातू कुठलीआता काय सांगू मी कुठलीया प्रश्नाचं सरधोपट उत्तर मी मुंबई असं देतेकारण मुंबई सगळ्यांना माहीत असते


पण माझा जन्म झाला तेव्हा आम्ही कोल्हापूरात रहायला होतोमी - वर्षांची होईपर्यंतनंतर खेड (दापोलीजवळजिल्हा रत्नागिरी), वाईपांचगणी (जिसातारा), डोंबिवलीगोरेगांववसईकांदिवलीकलकत्ता असा आमच्या कुटुंबाचा प्रवास झालाशिक्षणासाठी पुणे झालंया सगळ्या बदल्यांमध्ये १०वी पर्यंत मी  शाळा बदलल्याशिक्षकमित्रमैत्रिणी बदललेघरंगावं तरबदललीचशेजार बदलले


माझे बाबा बँकेत होते. बदली झाली की बँकेतले बरेच लोक कुटुंबाला एका ठिकाणी ठेऊन बदलीच्या गावाहून जाऊन येऊन करत. अशा कुटुंबात मुलं वडिलांना शनिवार, रविवारीच बघत. आम्ही मात्र प्रत्येक ठिकाणी बिऱ्हाड हालवत असू. बदली झाली कीबाबा नवीन ठिकाणी जाऊन गावशाळा बघूनबॅंकेच्या क्वार्टर्स नसतील तर घर शोधून येतबाकी आम्हीकुणीच यातलं काहीही आधी बघितलेलं नसेबदलीची बातमी कळल्यानंतर त्या त्या गावातल्या वास्तव्यात जोडलेल्या लोकांकडे निरोपाची जेवणाची आमंत्रणं सुरू होत. आम्ही सगळं सामानआपलं आपण गोण्यांमध्ये भरायला लागत असूपोती सामानानी भरली की सुतळ्यांनी बाबा त्यांची तोंडं करकचून बांधतस्वैपाकघर पोत्यात गेलं की शेजार पाजारच्या काकू / आजींकडेजेवणाची निमंत्रणंमग निघायचा दिवस उजाडला की ठरवलेला टेंपो / ट्रक सकाळी सकाळी येत असेसामान भरलं जाई- वर्ष राहून ज्या खोल्यांचं घर झालेलं असायचंत्या उघड्याबोडक्या वाटायला लागतघरातले आमचे असे खास कोपरेखिडक्यामुंबईत यायच्या आधीपर्यंत अंगण या सगळ्यांचा निरोप घेववत नसेशेजाऱ्यांचा निरोप घ्यायला गेलो की तिथूनही पायनिघत नसेसगळ्यांचे डोळे भरून येतपरत असा शेजार मिळणार नाही असं प्रत्येक वेळेस वाटे


नवं घर बघायची अपार उत्सुकता असेआम्ही केवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या घरांत राहिलोकोकणातल्या जांभा दगडाच्या वाड्यात बिऱ्हाड केलंजमीन शेणानं सारवायच्या घरात राहिलोवाईत पेशवेकालीन वाड्यात राहिलोपांचगणीत खिडकीतून थेट ढग आत घेणाऱ्या घरात राहिलोमुंबईतली घरं वाड्यांच्या तुलनेत खुराडासारखी होतीतिथून ढग काय आभाळाचा तुकडाहीदिसत नसेखेडातल्या घराचं परस एवढं प्रचंड होतंकी एखादं पोर हरवावंतिथं सागवानफणसाची झाडं होतीप्राजक्तकुंद होतामुंबईत जिथे आम्हीच जाता येता एकमेकांना धडकायचोतिथे झाडं कुठून येणारवाईखेडातल्या वाड्यांमध्ये पडवीत लाकडी झोपाळाही होताकुईकुई करणाराएवढी विविधता असूनही मला कधीही नवीन घर आवडलं नाही असं झालं नाहीसगळ्या नव्याची उत्सुकताच एवढी असायची की आहे ते घर पाऊल ठेवल्या ठेवल्या आपलं होऊन जाई. नवीन शेजारी सामान हलवतायत म्हणल्यावर चहा-पाण्याची चौकशी होई. नव्या ओळखी होत. सामान लागेपर्यंत खच्चून काम करावं लागे. पण त्यातही मजा होती. आपापल्या गोष्टींना नव्या जागा शोधण्यात, नव्या खास जागांसाठी योग्य त्या गोष्टी शोधण्यात गंमत होती. थोड्या दिवसांत नकळत खोल्यांचं घर होऊन जाई. 


नवीन शाळा हा एक तसा अवघड प्रकार होता. आधीच्या शिक्षकांबरोबर जमा झालेली पुण्याई बासनात गुंडाळून ठेवावी लागे. पुन्हा नव्याने स्वतःची ओळख तयार करायची. स्वतःला नव्या ठिकाणी रुजवायचं. अभ्यास आणि अभ्यासेतर उपक्रमांत स्वतःला नव्याने सिद्ध करायचं. मुलींच्या लहानपणापासून तयार झालेल्या गटांमधनं वाट काढत मैत्रिणी शोधायच्या. विशेषतः टीन एज मध्ये. पण या सगळ्यामुळे आम्ही लवचिक झालो. आहे त्या परिस्थितीत जुळवून घ्यायला शिकलो. आणि खरंतर मला अशी नव्याची चटकच लागली. प्रत्येक ठिकाणची स्वतःची एक संस्कृती असे. एक भाषा असे. त्यात विरघळून जाताना जुन्या गावच्या भाषेचा, संस्कृतीचा गंधही आमच्यामुळे नव्या ठिकाणी पसरे. 


नव्या ठिकाणी आम्ही आमच्या आमच्या शाळा-कॉलेज मध्ये व्यस्त होऊन जात असू. पण आईला मात्र व्यस्त होण्यासाठी गोष्टी शोधाव्या लागत. तिला त्यामुळे तिच्या मैत्रिणींसारखी वर्षानुवर्षाची सुरक्षित नोकरी करता आली नाही. पण तीही व्यस्त होण्यासाठी गोष्टी शोधून काढायचीच. काही तिला माहित असलेल्या, तर काही अशाही ज्या आपल्याला येतात हे तिचं तिलाच माहीत नसे. प्रत्येक ठिकाणी तिची वेगळीच ओळख तयार होत असे. आणि बदली झाली की फार का-कु न करता ती ओळख ती गुंडाळून ठेवत असे. 


प्रत्येक ठिकाणहून निघताना 'इथला आपला वाटा संपला' असं आम्हाला वाटे. पण तो वाटा कधीच संपत नाही हे आता जाणवतं. कधी जोडलेल्या माणसांच्या रूपात, कधी सुखद, दुःखद आठवणींच्या रूपात, कधी त्या त्या ठिकाणी उचललेल्या भाषेच्या रूपात.. प्रत्येक ठिकाणचा वाटा अजूनही सोबत करतोय. प्रत्येक गाव माझा एक हिस्सा झालंय. आणि मीही माझा एकेक हिस्सा एकेका गावात सोडून आले आहे. आज एखाद्या गावी परत गेले तर आम्ही दोघे कितीही बादललो असलो तरी या हिश्श्यांमुळे आम्हाला एकमेकांची ओळख पटेल. ते मला म्हणेल, 'एवढीशी पहिली होती, केवढी मोठी झालीस.' मी म्हणेन 'तूही'. मग ते मला पुन्हा सामावून घेईल. 

Friday, July 17, 2020

सवय

मनू,


तुझ्याशी आज फोनवर बोलताना बरीच थकलेली आणि हताश वाटलीस. बाळही रडत होतं. तेव्हा ही सगळी शिकवणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतीसम्हणून हे पत्रतुझ्या सवडीने वाच


बाळ इतकं तान्हं असताना तुला सोडून यावं लागलंयाची फार रूखरूख लागून राहिली आहेनाहीतर मांडीवर डोकं घेऊन तुझ्या केसांवरून हात फिरवावासा वाटत होता अगदीकाही इलाज नाहीतुमच्या पिढीचं सगळंच खूप वेगळं आहे बघबाळाची काळजी तिकडे एवढ्या थंडीत घेणंतुझी मालीशत्याची आंघोळमालिशतुझी काळजी घेणंतुझं पथ्यपाणी सगळंच निराळंमला बरेचदा अगदी हतबल वाटत होतं तिथे असतानाहीआता तर दूरचीच गोष्ट


आज तुला कळत नव्हतं बाळ का रडतंय ते आणि त्याचं केवढं वाईट वाटत होतंहे अगदी असंच माझ्याबरोबर झालं होतंतू झालीस तेव्हाएकतर फार किरकिरी होतीस तूसारखी रडायचीसमला अगदी राग यायचा स्वत:चाचएवढं कसं कळत नाही आपल्यालाअशा कशा आपण आईआज तुला त्याच कारणांवरून चिडचिड करताना ऐकलं आणि ते आठवलंवाटलंकाही गोष्टी नाही बदलतत्या बदलूच शकत नाहीत


तुम्हाला वाढवताना कधीही 'मुलीच्या जातीला..' पासून सुरु होणारं वाक्य उच्चारलं नाही. बाई म्हणून काही वेगळा त्याग बीग करावा लागतो हे गावीही नाही तुझ्या. आणि आता अचानक हे आईपण. त्यामुळे आईपणाची झळ माझ्यापेक्षा तुला जास्त लागेल कदाचित. पण एकच गोष्ट नेहमी लक्षात ठेव आणि आचरणात आण. ती म्हणजे संयम. पेशन्स. काळ आणि बाळ शिकवत राहतात आईपणाचे धडे. आत्ता तिला तू आणि तुला ती नवखे आहात. थोडा वेळ द्या. मग अशी सवय होईल एकमेकींची, की आईपण रुतून बसेल अंगात. ते कधीही निघत नाही आयुष्यभर. माझंच काय माझ्या आईचंही नाही सुटलंय. तसूभरही. 

अजून थोड्या दिवसांनी बाळ थोडं सुटं व्हायला लागेल. तिला आपलं आपलं सगळं करायला आवडायला लागेल. तेव्हाही नको नको होईल. पण त्याचीही सवय होईल. नंतर हळूहळू तिला तिचे विचार येतील, मतं येतील. शिंगांएवढी. कदाचित आई ओल्ड फॅशन्ड वाटायला लागेल. माती तेवढी मऊ राहणार नाही. तिला घडवणं, आकार देणं अवघड जायला लागेल. पण ती फेज येतेच. त्याचीही सवय करून घ्यावी लागेल. 

मग हळूहळू भांडं चाकापासून वेगळं होईल. तेव्हा जीव घुसमटेल. आपल्या आतलं काहीतरी तुटतंय असं वाटेल. हेही होतच असतं. याची आपल्याला कधी सवय होईल असं वाटत नाही, पण होते तीही हळूहळू. आणि दूर असली तरी नंतरही तिला तुझी गरज असेलच. रेसिपी विचारण्यासाठी, दुखल्या-खुपल्याला औषध विचारण्यासाठी, कधी चिडचिड करून घेण्यासाठी, बाळंतपणासाठी, नातवंडं वाढवण्यासाठी... आपल्या बाळाला आपली गरज असणं हीच आईची गरज असते. 

मग नातवंडांची सवय होते. आणि त्यांना सोडून यावं लागलं की त्याचीही सवय होते. सवय होणे हा सृष्टीचा नियम आहे. आणि तो तसा आहे हे केवढं वरदान आहे! 

काळजी करू नकोस असं म्हणणार नाही, कारण काळजी करणं हे आईपणाबरोबर फ्री येतं आणि कायमचा मुक्काम ठोकतं. पण संयम ठेऊन वाट बघ. सवय होण्याची

- आई

Saturday, July 11, 2020

चक्र


आमच्या अंगणातलं अलुबुखारचं झाड फळांच्या वजनानं अगदी जडावलंयएरवी त्याची सळसळचपळता लक्ष वेधून घेतेआता फांद्या थोड्या झुकल्यातएखाद्या गर्भारणीसारख्या त्याच्याहालचाली मंदावल्यातआता लाॅकडाऊनमुळे त्याच्याकडे जवळून बघता आलंत्याचं सौंदर्य निरखता आलंनाहीतर एरवीच्या धबडग्यात घरातच कमी वेळ वावर असतोअंगणात तर नाहीचजवळजवळ.



या आमच्या प्लमला मार्चमध्ये सुंदर मोहोर आला होतासंपूर्ण झाड मोहक पांढऱ्या फुलांनी डवरलं होतंपाॅपकाॅर्नचं झाड जणूमग त्याला हळूहळू कोवळीपोपटीतुकतुकीत पालवी फुटलीतेव्हा झाड इतकं अवखळ वाटायचंवारा आला की त्याची सळसळ घरात ऐकू यायचीफांद्या खिडक्यांना घासून कुईकुई आवाज करायच्या



त्या पालवीची पानं होईस्तोवर लगेच फुलांचीजागा अगणित इवल्या इवल्या हिरव्या फळांनी घेतलीती फळं हळूहळू मोठी होऊ लागलीआकारानं आणि वजनानंसुद्धामग फांद्या कळत्या झाल्याअल्लडपणा कमी केला त्यांनीत्याइवल्या फळांची काळजी घेण्यातत्यांचं हवं नको जपण्यात त्या व्यस्त झाल्याआता त्यांची फळं छान मोठी झालीतलालचुटुक आणि गरगरीतअगदी रसाळ गोमटीआम्ही हल्ली याझाडाच्या खूप सहवासात असतो म्हणून की कायपण या वर्षी जरा जास्तच फळं आलीआता थोड्या दिवसात फळं जास्त व्हायला लागतील आणि झाडाखालचा सगळी जमीन लाल-जांभळ्या रंगात रंगून जाईलफळं सगळी निघून गेली की त्या फांद्या एम्प्टी नेस्टर्स सारख्या दिसू लागतीलथोड्या दु:खी भासतीलपण एवढ्या दिवसांत करायला  मिळालेली सळसळ करूनघेतीलमग हळूहळू पानंही रंग बदलतीलमला ही बदललेल्या रंगाची पानं फार आकर्षित करतातम्हातारं व्हावं तर असंगळून पडण्याच्या एक क्षण आधीपर्यंत आनंद वाटत



आणि मग एक एक करून सगळी पानं गळतीलझाड अगदी उघडं बोडकं दिसायला लागेलत्याच्या शुष्क खोडात एकच गोष्ट ओली असेल - वसंतातल्या त्या तान्ह्या तुकतुकीत पालवीचीआस.


या झाडाच्या प्रेमात त्याचे वर्षभर प्रत्येक ऋतूत काढलेले फोटो शोधायला गेले. आणि त्या फोटोंबरोबर आणखीही बरंच काही गवसलंगेल्या काही महिन्यातलेच फोटो. माझ्या भाचीचे जन्मझाल्या झाल्या रडतानाचे लाल लाल फोटोआणि माझी आजी - म्हणजे माझ्या तान्ह्या भाचीची पणजी गेलीतेव्हा भावंडांनीकाकांनी ग्रुपवर पाठवलेले तिचे तरुणपणाचे फोटो. प्लमच्या फोटोंची आणि या फोटोंची डोक्यात सरमिसळ झाली आणि क्षणात काहीतरी नव्याने सापडलं. नियती कुठल्या स्वरूपात धडे देत असते! ऋतुचक्राशी बांधलेल्या आमच्या प्लमच्याजीवनचक्राकडे मी तटस्थपणे बघत होतेआणि ते फोटो बघून उमगलंकी मी स्वत:सुद्धा एका मेरी गो राउंडचा पाळणा आहेआमच्या चक्रांची गती वेगळी आहे एवढंचकिती सारखं केलंयआपल्याला सृष्टीनेसगळ्यांना आपापली चक्र आखून दिली आहेतही सगळी चक्र फिरती राहतील अशी काळजी घेतली आहे


या चक्रातला प्रवास सुखाचा व्हावा म्हणून सगळ्यांना त्यांचा त्यांचा प्लमही दिलायप्रवासातला प्रत्येक टप्पा देखणा कसा करावा हे शिकवण्यासाठी!