मनू,
तुझ्याशी आज फोनवर बोलताना बरीच थकलेली आणि हताश वाटलीस. बाळही रडत होतं. तेव्हा ही सगळी शिकवणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतीस, म्हणून हे पत्र. तुझ्या सवडीने वाच.
बाळ इतकं तान्हं असताना तुला सोडून यावं लागलं, याची फार रूखरूख लागून राहिली आहे. नाहीतर मांडीवर डोकं घेऊन तुझ्या केसांवरून हात फिरवावासा वाटत होता अगदी. काही इलाज नाही. तुमच्या पिढीचं सगळंच खूप वेगळं आहे बघ. बाळाची काळजी तिकडे एवढ्या थंडीत घेणं, तुझी मालीश, त्याची आंघोळ, मालिश, तुझी काळजी घेणं, तुझं पथ्यपाणी सगळंच निराळं. मला बरेचदा अगदी हतबल वाटत होतं तिथे असतानाही. आता तर दूरचीच गोष्ट.
आज तुला कळत नव्हतं बाळ का रडतंय ते आणि त्याचं केवढं वाईट वाटत होतं. हे अगदी असंच माझ्याबरोबर झालं होतं. तू झालीस तेव्हा. एकतर फार किरकिरी होतीस तू. सारखी रडायचीस. मला अगदी राग यायचा स्वत:चाच. एवढं कसं कळत नाही आपल्याला? अशा कशा आपण आई? आज तुला त्याच कारणांवरून चिडचिड करताना ऐकलं आणि ते आठवलं. वाटलं, काही गोष्टी नाही बदलत. त्या बदलूच शकत नाहीत.
तुम्हाला वाढवताना कधीही 'मुलीच्या जातीला..' पासून सुरु होणारं वाक्य उच्चारलं नाही. बाई म्हणून काही वेगळा त्याग बीग करावा लागतो हे गावीही नाही तुझ्या. आणि आता अचानक हे आईपण. त्यामुळे आईपणाची झळ माझ्यापेक्षा तुला जास्त लागेल कदाचित. पण एकच गोष्ट नेहमी लक्षात ठेव आणि आचरणात आण. ती म्हणजे संयम. पेशन्स. काळ आणि बाळ शिकवत राहतात आईपणाचे धडे. आत्ता तिला तू आणि तुला ती नवखे आहात. थोडा वेळ द्या. मग अशी सवय होईल एकमेकींची, की आईपण रुतून बसेल अंगात. ते कधीही निघत नाही आयुष्यभर. माझंच काय माझ्या आईचंही नाही सुटलंय. तसूभरही.
अजून थोड्या दिवसांनी बाळ थोडं सुटं व्हायला लागेल. तिला आपलं आपलं सगळं करायला आवडायला लागेल. तेव्हाही नको नको होईल. पण त्याचीही सवय होईल. नंतर हळूहळू तिला तिचे विचार येतील, मतं येतील. शिंगांएवढी. कदाचित आई ओल्ड फॅशन्ड वाटायला लागेल. माती तेवढी मऊ राहणार नाही. तिला घडवणं, आकार देणं अवघड जायला लागेल. पण ती फेज येतेच. त्याचीही सवय करून घ्यावी लागेल.
मग हळूहळू भांडं चाकापासून वेगळं होईल. तेव्हा जीव घुसमटेल. आपल्या आतलं काहीतरी तुटतंय असं वाटेल. हेही होतच असतं. याची आपल्याला कधी सवय होईल असं वाटत नाही, पण होते तीही हळूहळू. आणि दूर असली तरी नंतरही तिला तुझी गरज असेलच. रेसिपी विचारण्यासाठी, दुखल्या-खुपल्याला औषध विचारण्यासाठी, कधी चिडचिड करून घेण्यासाठी, बाळंतपणासाठी, नातवंडं वाढवण्यासाठी... आपल्या बाळाला आपली गरज असणं हीच आईची गरज असते.
मग नातवंडांची सवय होते. आणि त्यांना सोडून यावं लागलं की त्याचीही सवय होते. सवय होणे हा सृष्टीचा नियम आहे. आणि तो तसा आहे हे केवढं वरदान आहे!
काळजी करू नकोस असं म्हणणार नाही, कारण काळजी करणं हे आईपणाबरोबर फ्री येतं आणि कायमचा मुक्काम ठोकतं. पण संयम ठेऊन वाट बघ. सवय होण्याची.
- आई
No comments:
Post a Comment