हा विषय खरंतर बरेच दिवस डोक्यात घोळत होता. पण कधीकधी अगदी जवळचे, स्वत:चाच भाग असलेले विषय हातावेगळे करता येत नाहीत, तसंच काहीतरी झालं. बाबांच्या बदल्या हा माझ्या आणि माझ्या बहिणीच्या जडणघडणाचा एक फार मोठा भाग आहेत. या बदल्यांनी आमच्यासाठी साध्या साध्या प्रश्नांची उत्तरं मात्र अवघड करून टाकली. उदा. तू कुठली? आता काय सांगू मी कुठली? या प्रश्नाचं सरधोपट उत्तर मी मुंबई असं देते. कारण मुंबई सगळ्यांना माहीत असते.
पण माझा जन्म झाला तेव्हा आम्ही कोल्हापूरात रहायला होतो. मी ४-५ वर्षांची होईपर्यंत. नंतर खेड (दापोलीजवळ, जिल्हा रत्नागिरी), वाई, पांचगणी (जि. सातारा), डोंबिवली, गोरेगांव, वसई, कांदिवली, कलकत्ता असा आमच्या कुटुंबाचा प्रवास झाला. शिक्षणासाठी पुणे झालं. या सगळ्या बदल्यांमध्ये १०वी पर्यंत मी ७ शाळा बदलल्या. शिक्षक, मित्रमैत्रिणी बदलले. घरं, गावं तरबदललीच. शेजार बदलले.
माझे बाबा बँकेत होते. बदली झाली की बँकेतले बरेच लोक कुटुंबाला एका ठिकाणी ठेऊन बदलीच्या गावाहून जाऊन येऊन करत. अशा कुटुंबात मुलं वडिलांना शनिवार, रविवारीच बघत. आम्ही मात्र प्रत्येक ठिकाणी बिऱ्हाड हालवत असू. बदली झाली की, बाबा नवीन ठिकाणी जाऊन गाव, शाळा बघून, बॅंकेच्या क्वार्टर्स नसतील तर घर शोधून येत. बाकी आम्हीकुणीच यातलं काहीही आधी बघितलेलं नसे. बदलीची बातमी कळल्यानंतर त्या त्या गावातल्या वास्तव्यात जोडलेल्या लोकांकडे निरोपाची जेवणाची आमंत्रणं सुरू होत. आम्ही सगळं सामानआपलं आपण गोण्यांमध्ये भरायला लागत असू. पोती सामानानी भरली की सुतळ्यांनी बाबा त्यांची तोंडं करकचून बांधत. स्वैपाकघर पोत्यात गेलं की शेजार पाजारच्या काकू / आजींकडेजेवणाची निमंत्रणं. मग निघायचा दिवस उजाडला की ठरवलेला टेंपो / ट्रक सकाळी सकाळी येत असे. सामान भरलं जाई. २-३ वर्ष राहून ज्या खोल्यांचं घर झालेलं असायचं, त्या उघड्याबोडक्या वाटायला लागत. घरातले आमचे असे खास कोपरे, खिडक्या, मुंबईत यायच्या आधीपर्यंत अंगण या सगळ्यांचा निरोप घेववत नसे. शेजाऱ्यांचा निरोप घ्यायला गेलो की तिथूनही पायनिघत नसे. सगळ्यांचे डोळे भरून येत. परत असा शेजार मिळणार नाही असं प्रत्येक वेळेस वाटे.
नवं घर बघायची अपार उत्सुकता असे. आम्ही केवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या घरांत राहिलो. कोकणातल्या जांभा दगडाच्या वाड्यात बिऱ्हाड केलं. जमीन शेणानं सारवायच्या घरात राहिलो. वाईत पेशवेकालीन वाड्यात राहिलो. पांचगणीत खिडकीतून थेट ढग आत घेणाऱ्या घरात राहिलो. मुंबईतली घरं वाड्यांच्या तुलनेत खुराडासारखी होती. तिथून ढग काय आभाळाचा तुकडाहीदिसत नसे. खेडातल्या घराचं परस एवढं प्रचंड होतं, की एखादं पोर हरवावं. तिथं सागवान, फणसाची झाडं होती. प्राजक्त, कुंद होता. मुंबईत जिथे आम्हीच जाता येता एकमेकांना धडकायचो, तिथे झाडं कुठून येणार. वाई, खेडातल्या वाड्यांमध्ये पडवीत लाकडी झोपाळाही होता. कुईकुई करणारा. एवढी विविधता असूनही मला कधीही नवीन घर आवडलं नाही असं झालं नाही. सगळ्या नव्याची उत्सुकताच एवढी असायची की आहे ते घर पाऊल ठेवल्या ठेवल्या आपलं होऊन जाई. नवीन शेजारी सामान हलवतायत म्हणल्यावर चहा-पाण्याची चौकशी होई. नव्या ओळखी होत. सामान लागेपर्यंत खच्चून काम करावं लागे. पण त्यातही मजा होती. आपापल्या गोष्टींना नव्या जागा शोधण्यात, नव्या खास जागांसाठी योग्य त्या गोष्टी शोधण्यात गंमत होती. थोड्या दिवसांत नकळत खोल्यांचं घर होऊन जाई.
नवीन शाळा हा एक तसा अवघड प्रकार होता. आधीच्या शिक्षकांबरोबर जमा झालेली पुण्याई बासनात गुंडाळून ठेवावी लागे. पुन्हा नव्याने स्वतःची ओळख तयार करायची. स्वतःला नव्या ठिकाणी रुजवायचं. अभ्यास आणि अभ्यासेतर उपक्रमांत स्वतःला नव्याने सिद्ध करायचं. मुलींच्या लहानपणापासून तयार झालेल्या गटांमधनं वाट काढत मैत्रिणी शोधायच्या. विशेषतः टीन एज मध्ये. पण या सगळ्यामुळे आम्ही लवचिक झालो. आहे त्या परिस्थितीत जुळवून घ्यायला शिकलो. आणि खरंतर मला अशी नव्याची चटकच लागली. प्रत्येक ठिकाणची स्वतःची एक संस्कृती असे. एक भाषा असे. त्यात विरघळून जाताना जुन्या गावच्या भाषेचा, संस्कृतीचा गंधही आमच्यामुळे नव्या ठिकाणी पसरे.
नव्या ठिकाणी आम्ही आमच्या आमच्या शाळा-कॉलेज मध्ये व्यस्त होऊन जात असू. पण आईला मात्र व्यस्त होण्यासाठी गोष्टी शोधाव्या लागत. तिला त्यामुळे तिच्या मैत्रिणींसारखी वर्षानुवर्षाची सुरक्षित नोकरी करता आली नाही. पण तीही व्यस्त होण्यासाठी गोष्टी शोधून काढायचीच. काही तिला माहित असलेल्या, तर काही अशाही ज्या आपल्याला येतात हे तिचं तिलाच माहीत नसे. प्रत्येक ठिकाणी तिची वेगळीच ओळख तयार होत असे. आणि बदली झाली की फार का-कु न करता ती ओळख ती गुंडाळून ठेवत असे.
प्रत्येक ठिकाणहून निघताना 'इथला आपला वाटा संपला' असं आम्हाला वाटे. पण तो वाटा कधीच संपत नाही हे आता जाणवतं. कधी जोडलेल्या माणसांच्या रूपात, कधी सुखद, दुःखद आठवणींच्या रूपात, कधी त्या त्या ठिकाणी उचललेल्या भाषेच्या रूपात.. प्रत्येक ठिकाणचा वाटा अजूनही सोबत करतोय. प्रत्येक गाव माझा एक हिस्सा झालंय. आणि मीही माझा एकेक हिस्सा एकेका गावात सोडून आले आहे. आज एखाद्या गावी परत गेले तर आम्ही दोघे कितीही बादललो असलो तरी या हिश्श्यांमुळे आम्हाला एकमेकांची ओळख पटेल. ते मला म्हणेल, 'एवढीशी पहिली होती, केवढी मोठी झालीस.' मी म्हणेन 'तूही'. मग ते मला पुन्हा सामावून घेईल.

No comments:
Post a Comment