Wednesday, June 17, 2020

मज्जेची मजा 

मज्जा जेव्हा छोटी होती तेव्हा किती मस्त होती 

इवल्याश्या बुडबुड्यात निर्व्याज व्यस्त होती 

हसरीसालसआनंदीहाडाची भिडस्त होती  

देणं तिचं भरभरूनमागणी मात्र स्वस्त होती


नकळत होई तिची माझी अनेकदा भेट

बोलावल्याचं आठवत नाही कधी तिला थेट

इतर भावांत मिसळायची धुंद लकेरी घेत

सुख द्यायचीहोतं तिचं आनंदाचं शेत


सणवाराची आठवते ती सजलेली सुंदर 

भावंडांच्या घोळक्यामध्ये नेहमीच ही हजर

बागेमध्ये झोका घ्यायला यायचीच बरोबर

नाही कुठले आढे वेढेनाही जर - तर


घरी तर ती सारखीच येऊन जाऊन असायची

ताईचं गाणं ऐकताच हमखास टपकायची

आज्जीची गोष्ट तिला खूप खूप आवडायची

आईने शिरा केलाकी मनोमन हरखायची


कधी कुणास ठाऊकपण झालं असेल हळूहळू 

मोठं झालं जग माझंलागलं जास्त कळू 

मज्जादेखिल फुगलीलागली सतत छळू  

तिच्यामागे धापा टाकत दिवस लागले पळू 


येईल का ती वाढवला जर एखाद स्क्वेअर फूट?

येईल का जर विकत घेतला मखमलीचा बूट? 

वाळूसारखी निसटत होती घट्ट होती मूठ 

पैसा, कीर्ती, गाडी-माडी ठरवत सारं झूठ!


कधीतरी तिने जरी दिलं अंधूक दर्शन 

आमच्यामध्ये होतं एक साहजिकच घर्षण 

मला होतं आणखी मोठ्या मजेचं आकर्षण 

"बघ!" म्हणलं मी तिला फेसबुकचं प्रदर्शन


एके दिवशी बागेमध्ये दिसली एक धिटुकली

तिच्याबरोबर विहरत होती तिची मजा चिमुकली

तिला पाहता आगळीक माझी चटकन मला उमगली

घटनांची श्रुंखलाच माझ्या डोळ्यांपुढे चमकली


तिच्या नव्हे तर माझ्याभवती होता तो बुडबुडा

दूर दूर ती जात होतीवाढे त्याचा वेढा

फुटला तेव्हा पडला खोट्या अपेक्षांचा सडा

त्याक्षणी ती पुन्हा बिलगली दाटलेल्या गळा!

Sunday, June 7, 2020

हिडन फिगर्स

(सौम्य स्पॉईलर अलर्ट)

मी ९  महिन्यांची गरोदर होते. कितीही वाचलं, समजलं तरी बाळंतपणाची, आई होणं आपल्याला झेपेल का, याची भिती वाटायची. तेव्हा एकदा आई म्हणाली होती, ‘मधे, जे येईल पुढ्यात ते हाणून पाडायचं’. आणि माझी सगळी भिती जादूसारखी पळून गेली होती. शब्द केवढे सामर्थ्यवान असतात! वेळ, मन:स्थिती, परिस्थिती सगळं काही पालटवण्याची शक्ती असते त्यांच्यात. तेच, नेहमीचेच शब्द

हे असं नव्यानं जाणवण्याचं कारण म्हणजे कालहिडन फिगर्सनावाचा चित्रपट पाहिला. सध्या अमेरिकेत आणि जगभरही थोड्या-अधिकप्रमाणात वंशभेदाविरूद्ध चळवळ सुरू आहे. जगात अनेक ठिकाणी अनेक प्रकारांनी अजूनही लोकांना भेदभावाला सामोरं जावं लागतं, हे मी ऐकत, वाचत आलेली आहे. ते कानावर पडतं, पण ते ह्रदयापर्यंत पोचलं काल प्रथमच. जोवर आपल्याला स्पर्श करत नाहीत, तोपर्यंत सगळे प्राॅब्लेम्स बोथट असतात. संवेदनशीलतेचा अभाव, डोळ्यांसमोर फोन, कानात हेडफोनचं बोंडूक आणि मनावर चढलेलीएव्हरीथिंग इज फाईनची पुटं. असा सगळा जामानिमा बाळगत जगताना आपल्या स्वत:वर काही अन्याय होत असेल तर तोही कळू नये. दुसऱ्याचं तर दूरच राहिलं. जात्यातले दाणे रडतात आणि सुपातले हसतात त्यातलाच हा प्रकार.

तीन अत्यंत हुशार कृष्णवर्णीय महिलांच्या खऱ्या लढ्याची गोष्ट म्हणजेहिडन फिगर्स’. कृष्णवर्णीयांसाठी बसमध्ये विलग जागा ठेवण्याचा, त्यांच्यासाठी विलग कक्ष, विलग बाथरूम्स ठेवण्याचा हा कालखंड. आणि या तिघी कृष्णवर्णीय, त्यात महिला, त्याच उच्चविद्याविभूषित. म्हणजे अनेक पातळ्यांवर अल्पसंख्यांक. स्वत:च्या मेरिटवर समाजव्यवस्थेला धक्का देऊन आपल्यासारख्या इतरांसाठी वाटा निर्माण करण्याचा त्यांचा प्रवास पाहताना कधी आपण स्वत: त्या प्रवासात सामील होतो कळतच नाही. त्यांच्या तोंडचे शब्द झपाटून टाकतात. त्यांच्यावर झालेला अन्याय आपल्याला पिळवटून टाकतो. ‘वंशभेदया गुळगुळीत झालेल्या शब्दाची धग जाणवत राहते नंतरही बराच वेळ.

यातल्या एका प्रसंगात तर शब्दांनी अक्षरशः गारुड केलं. कॉम्प्युटर हे नवीन संशोधन होतं त्या काळात या गणितात निपुण असलेल्या तिघी, इतर अनेकांबरोबर 'कॉम्प्युटर' म्हणून नासामध्ये नोकरी करत होत्या. यांपैकी मेरी जॅक्सनला नासामध्ये इंजिनियर व्हायचं होतं. पण त्याच्यासाठी तिला आणखी शिक्षण घेणं गरजेचं केलं गेलं होतं. हे शिक्षण जिथे मिळेल अश्या विद्यापीठात कृष्णवर्णीयांना प्रवेश नव्हता. अगदी कायद्यानेच तो नाकारला होता. काही दिवस यावर चिडचिड करून झाल्यावर तिने सरळ कोर्टात धाव घेतली. तिच्या कोर्टातल्या सुनावणीचा तो प्रसंग. छोटासाच - मिनिटांचा. न्यायाधीशांना ती म्हणते, 'आजपर्यंत एखादी गोष्ट घडलेली नाही म्हणून आताही ती होऊ देण्यापेक्षा, ती घडवून आणणारे आपण पहिले लोक का होऊ शकत नाही? आज तुम्ही निर्णय दिलेले किती खटले आजपासून १०० वर्षांपर्यंत मैलाचे दगड म्हणून गणले जातील?'

परिस्थितीच्या नाकावर टिच्चून मेरी नासामधली पहिली महिला इंजिनिअर झाली!

स्टेटस कोला धक्का देणं काय असतं ते धक्का देणाऱ्यालाच कळू शकतं. कुठल्याही काळात यास्टेटस कोचं समर्थन करणारे, त्याला धक्का लागू देणारे असतातच. त्या त्या गोष्टीला बराच काळ लोटल्यानंतर आपण त्यांचं सरसकटगुड पीपलआणिबॅड पीपलअसं वर्गिकरण करतो. पण लोक कधीच असे पूर्ण गुड किंवा पूर्ण बॅड नसतात. सनातन विचारांचे पण चांगले लोकही असतीलच. अशा लोकांविरूद्ध लढताना स्वत:वरच शंका येईल असे कितीतरी प्रसंग आनंदीबाई जोशी किंवा सावित्रीबाई फुले यांच्यावर आले असतील. त्यांनी कुठलं बळएकवटून त्यांचा लढा दिला असेल त्यांनाच कळेल. पण अशा व्यक्तिमत्त्वांच्या कहाण्या प्रभावी कलाकृतींमधून समोर येतात, तेव्हा निदान त्यांच्या लढ्याची तप्त जाणीव होते. आपण आत्ता जिथे कुठे आहोत, जे काही करतोय, त्यासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे अशा कितीतरी हिडन फिगर्स कारणीभूत आहेत याची जाणीव होते. 'संघर्ष' म्हणवून घेणाऱ्या, कुरवाळून घेण्याची सवय झालेल्या आपल्या फुटकळ प्रॉब्लेम्सना सणसणीत चपराक बसते

आणखी एक धडा. आपण जे काही करतोय, ते का करतोय, असा प्रश्न स्वतःला नेहमी विचारावा. त्याचं उत्तर जर 'कारण हे असंच होत आलंय' असं काहीसं आलं, तर समजावं की ती व्यवस्था 'पहिल्या पावला'च्या प्रतीक्षेत आहे