संदीप,
आज माझी एवढी मोठी इमेल बघून आश्चर्य वाटलं असेल तुला. पण तू नुकताच अमेरिकेला गेलास तेव्हा अशाच भल्या मोठ्या इमेल्स पाठवायचो आपण एकमेकांना. व्हिडिओ कॉल नव्हते आणि साधे कॉल केवढे महाग! हल्ली सगळं बोलणं व्हिडिओवर होतं त्यामुळे हे कमी झालंय. पण अवघड भावना पोचवायलापत्रं सोपी पडतात.
अशोकला जाऊन उद्या २ महिने होतील. तिकडे येण्याबद्दल तू गेले २ महिने सतत मला विचारतोयस. मी रोज तुला काय आणि कसं सांगू या विचारात आहे. हेत्या प्रश्नाचं थोडं लांबलचक उत्तर.
आमच्या जवळजवळ ४० वर्षांच्या सहजीवनात प्रत्येक दिवस मी सुखात होते. अशोकच्या अपघातानंतर सुद्धा. अशोक आदर्श नवरा होता. अपघातानंतर तोलोकांसाठी पूर्वीचा अशोक राहिला नाही, पण आतून तो अशोकच होता. तसाच हसरा, आनंद शोधणारा, समोरच्याला आपलंसं करणारा. एवढा मोठा शास्त्रज्ञवगैरे आहे यावर लोकांचा विश्वास बसत नसे. जुन्या घरासमोरच्या भाजीवाल्याला त्याने तो माळी आहे असं सांगितलं होतं. तो बरेच दिवस याला माळीदादाम्हणत होता. सतत माकडचेष्टा, विनोद. त्याच्या हुशारीचा, स्टेटसचा कधीही त्यानं बडेजाव केला नाही. माझ्यापुढे तर कधीच नाही. एक वेगळी व्यक्ती म्हणूनमाझ्या स्वातंत्र्याचा नेहमी आदर केला. किंबहुना व्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे काय हे त्यानेच मला त्याच्या वागण्यातून शिकवलं. त्यामुळेच माझा, माझ्यासाठीचाविचार मी करू शकते आहे. मी त्याला खूप मिस करते आहे. मला वाटलं नव्हतं एवढं. अशोक काही अचानक किंवा अकाली गेला नाही. मी या दिवसाचीकल्पना आणि तयारी अनेकदा केलेली होती. अगदी मनातलं सांगायचं झालं तर काही दिवस असे होते की मी हे होण्याची वाट बघतिलेली आहे. पणएकटेपणाच्या ज्या संकल्पना माझ्या डोक्यात होत्या, त्यापेक्षा हे खूप वेगळं आहे. दुःख तर आहेच. पण एक वेगळीच शांततापण आहे. ४० वर्षांनंतर भेटायलाआलेल्या मैत्रिणीसारखी ही शांतता.
संदीप, खूप विचार करून मी इथेच राहण्याचा निर्णय घेतलाय. अर्थात तुझ्याकडे येऊन माझ्या व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा येणारे असं मला मुळीच वाटत नाही. तूहीत्याच मुशीत घडला आहेस. पण तरीही मला सध्या तरी इथेच एकटीनंच राहावंसं वाटतंय. तू समजून घेशील.
मी येत राहीन थोड्या दिवसांसाठी अधून मधून. शिवाय व्हिडिओ कॉल्स आहेतच.
- आई
संदीपने अधाशासारखी मेल वाचली. परत परत वाचली. हातातला कॉफीचा मग तसाच होता. एकदाही तोंडाला न लावताच कॉफी थंड झाली होती. संदीपलाआईचा राग आला होता.
"असं कसं म्हणते ही? शांतता कसली आलीये? हा एवढा मोठा पॅरा का लिहिलाय मधे? काय संबंध? शब्द शब्द शब्द.. नाही येणार इकडे वगैरे सगळं ठीकआहे, पण हे शांतता, एकटेपणा काय आहे?"
पहिला धक्का ओसरल्यावर त्याने पुन्हा एक एक शब्द हळूहळू वाचला. 'तू समजून घेशील' या वाक्यावर तो घुटमळला. तटस्थपणे आईचा विचार करायलाकमी पडतोय का आपण? ती नेहमी 'आई' असते. बाबाची बायको काही लोकांसाठी. कधीतरी विजया धर्माधिकारींची बहीणही. कुणी तिचा 'मृदुला कुलकर्णी' म्हणून विचार करतं का?
त्याच्या डोळ्यासमोरची आईची कॉटनच्या साडीतली मूर्ती अस्पष्ट होऊ लागली. तिची जागा जुन्या फोटोतल्या आईच्या चित्रांनी घेतली. विजू मावशीचा हातधरलेल्या आईचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो. विजू मावशीच्या हातात पहिल्या नंबरची आणि आईच्या हातात उत्तेजनार्थ ट्रॉफी असलेला फोटो. लग्नात बाबाच्यामित्रांनी गराडा घातलेला फोटो. लग्नातला दोन स्ट्रॉनी एकाच बाटलीतून थम्ब्स-अप पितानाचा फोटो. त्याला कडेवर घेऊन खिदळतानाचा फोटो. बाबाच्याकॉन्फरन्सेस मधले तिचे पार्ट्यांमधले फोटो. अपघातानंतर 'सायंटिस्ट्स फेव्हरेट' केस-२५११B ला घेऊन आलेल्या आईचे जगभरातल्या वेगवेगळ्यादवाखान्यांतले, विद्यापीठांमधले आणि ऑफिसातले फोटो. खरंच आईचा एकटीचा एकही फोटो आपल्याला आठवत नाही?
"आई तशी हुशार होती. अकॅडेमिकलीही. पण तिची हुशारी विजू मावशीमुळे झाकोळून गेली नेहमीच. आई वयानं आणि गुणांनीही नेहमी नंबर २ राहिली. लग्नानंतर तिचं दुसरेपण अधोरेखितच झालं. बाबाचं व्यक्तिमत्व असं एवढं झळझळीत होतं की समोरचा दिपून जायचा. त्याच्यामागे उभी असलेली आई कुणीबघूच शकायचं नाही. पण ती तशीच खंबीरपणे उभी राहिली, तिथेच. नंबर २च्या जागी. घट्ट.
बाबाचा अपघात झाला तेव्हा कोलमडून गेली असती खरंतर. कोलमडणं सोपं होतं. पण ही अजूनच ताकदीनं उभी राहिली. बाबाच्या मेंदूला दुखापत झाली होती. त्याआधी त्याचा मेंदू हेच त्याचं शस्त्र होतं. तोच अधू झाला. शरीरानं ठणठणीत. पण ५ मिंटापूर्वीचं काही आठवायचं नाही. एखाद्या बाळाला सांभाळावं तसं तिनंसगळं केलं. बाबाचा मेंदू अशा जागी निकामी झाला होता, की त्याची स्मृती गेली असली तरी नेहमीच्या जागा, कृती, व्यक्ती लक्षात राहत होत्या, पण त्याआपल्या लक्षात आहेत, हेच त्याला आठवत नव्हतं. मानवी मेंदूचा अभ्यास करण्यासाठी ही एक स्पेशल केस होती. दुर्मिळ. बाबा रेस्पॉन्डही छान करत होता. त्यामुळे जगभरातल्या शास्त्रज्ञांसाठी बाबाचा मेंदू हा एक खजिना झाला होता. केस-२५११ या नावाने बाबा पुन्हा एकदा नावारूपाला आला होता. बातम्या, मासिकांसाठी मुलाखती, ठिकठिकाणी टेस्ट्स, स्टडीज.. आई तिच्या साठीतल्या बाळाचं सगळं मनापासून करत होती. पण केस-२५११ ची बायको प्रसिद्धीच्याआड राहिली. तिला प्रसिद्धीचा फार सोस होता असंही नाही खरं. पण तिला कधी याचं वाईट वाटलं असेल का? सतत कुणाच्या तरी मागे उभं राहण्याचा कंटाळाआला असेल का? तिच्या मनात हा सल असेल का? सतत नंबर २.."
नंबर २ नंबर २ नंबर २.. हा जप संदीपच्या कानात वाजू लागला. अचानक तटकन तो उठला आणि जुना लॅपटॉप स्टोरेजमधून काढून घेऊन आला. आईच्यास्काइपच्या अकॉउंटचा नेहमी गोंधळ होत असे. त्याला नेहमी तिच्या स्काइपचं ट्रबलशूट करावं लागत असे. असावा, म्हणून त्याने तिचा पासवर्ड लिहून ठेवलाहोता. थोडा वेळ धुंडाळल्यावर त्याला तो सापडला. आईचा पासवर्ड होता 'mrudulaDwitiya!'. एक क्षीणसा अपराधी आवंढा संदीपच्या घशात अडकला.
-----------
मृदुला चहाचा कप घेऊन पोर्चमध्ये बसली. हे घर ती एकटी असताना कसं दिसतं हे ती अनुभवून घेत होती. बागेतली झाडं, पोर्चमधला झोपाळा, 'अशोक वमृदुला कुलकर्णी' - नावाची पाटी.. सगळं नवं असल्यासारखं तिला वाटलं. तिनं चहाचा एक घुटका घेतला आणि आल्याचा दरवळ घेत आपसूक डोळे मिटले.
फाटक वाजलं तेव्हा तिला भान आलं. डिलिव्हरी घेऊन माणूस आला होता. सुंदर बुके होता. उत्सुकतेने तिने त्यावरची चिठ्ठी उलगडली. त्यावर लिहिलं होतं:
मृदुला - 'अ'द्वितीय!
- संदीप
पूर्वप्रसिद्धी: माझा मराठीचा बोल दिवाळी अंक, 2021