Sunday, March 17, 2013

पेच

अतिशय विकल चेहऱ्याने जया सोफ्यावर बसली होती. उध्वस्त झाल्यासारखी. हाता-पायातली शक्ती गेली होती. चेहरा पांढराफटक पडला होता. 'आता पुढे काय?' एक एक धागा जुळवून आपले विचार मार्गावर आणण्याचा ती प्रयत्न करत होती. पण छे! कसलीच बेरीज लागत नव्हती. एकदम धाय मोकलून रडावसं वाटत होतं; पण रडत बसणे ही तिच्या प्रतिमेला आणि अस्मितेला साजेशी गोष्ट नव्हती. काहीही झालं तरी ती एक उच्चशिक्षित आणि स्वतंत्र मुलगी होती. त्यामुळे आता rationally विचार करून 'पुढे काय?' या प्रश्नाचं उत्तर सापडवणं अपेक्षित होतं. म्हणूनच भावनावेग आवरून डोकं तळ्यावर आणण्याचा तिचा प्रयत्न चालला होता. पण तरीही 'का?'

"का वागली असेल ती माझ्याशी असं? मी असं काय केलं की  तिने अशी शिक्षा द्यावी?' 

वर्षभरापूर्वीच जया आपला नवरा आणि दीड वर्षाचा छोटा पार्थ यांच्या बरोबर या घरात राहायला आली होती. कुणाशीही ओळख नसलेल्या या उच्चभ्रू वस्तीत राहायला जायचं म्हणजे थोडं दडपणच आलं होतं. दोघांचीही नोकरी आणि आता सोबतीला पार्थ. आजूबाजूला कुणीही ओळखीचं नाही… दडपण येणं तर साहजिकच होतं. पण आल्याबरोबर काहीच दिवसात जयाची तिच्याशी ओळख झाली. ओळखीचं रुपांतर रोजच्या संपर्कात झालं आणि तिच्यामुळे सगळेच मार्ग सुकर झाले. तिलाही २ मुले होती. त्यामुळे पार्थची काळजी घेण्यासाठी ती जायला नेहमी उपयोगी गोष्टी सांगत असे. तिच्यामुळे जयाची काळजीच मिटली होती. 

जयानेही काही कमी केलं नव्हतं तिच्यासाठी. तिच्या मुलांसाठी नेहमी खाऊ, खेळणी आणणं, सणावारांना भेटवस्तू….  पण चांगल्या सुरळीत चाललेल्या आयुष्यांशी खेळणं हा तर नियतीचा आवडता छंदच!

आज जया ऑफिसमधून घरी येताच टेबल वर तिला एक चिठ्ठी दिसली… 

"बाईसाहेब, उद्यापासून मी कामावर एनार न्हाई. मला माज्या वस्तीपाशी दुसरं घर मिळालं आहे."

पुन्हा एकदा त्या चिठ्ठीवर नजर फिरवून जया मनाचा धडा करून उठली आणि तिने केरसुणी हातात घेतली!!

Sunday, January 27, 2013

खाण्यासाठी जन्म आपुला!

नुकतेच भारतातून परतलो. रिवाजाप्रमाणे महिन्याची सुट्टी कशी संपली कळलं नाही. भारतातल्या दिवसांचे हायलाईट्स असे :

१. नातेवाईक आणि मित्र मंडळींच्या भेटीगाठी, गप्पा, चर्चा, भटकंती इ. 

२. ड्रायव्हिंग शिकणे! (भुवया उंचावलेल्या लोकांना: हो आत्ता शिकले. काय म्हणणं आहे? :P शिकले न शेवटी? :)) या विषयावर १ वेगळा लेख होईल. किंबहुना सामान्य ड्रायव्हिंग, सामान्य बायकांचं ड्रायव्हिंग आणि त्यात माझं ड्रायव्हिंग यावर वेगवेगळे ३ लेख होतील :)

३. धपाधप दिसतील ते सिनेमे आणि नाटकं बघणे. (संधी मिळाली तर 'बेचकी' पहा. अप्रतिम नाटक!)

४. खरेदी (कपड्यांची / भाजीची / किराणा, मॉल मध्ये / दुकानांमध्ये / रस्त्यावर, bargaining करून / न करता इत्यादी.) मुंबईतली रस्त्यावरची खरेदी हा एक संशोधनाचा विषय होऊ शकतो. "थोडा भाव करो ना भय्या" चं  पालुपद घोळवत घोळवत fashion street वर भटकायची गम्मत सगळ्यांना नाही कळत. विशेषतः नवरा जमातीला.

५. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, खा-खा! हो 'खा-खा' च. नुसतं खाणे म्हणलं तर आमच्या खाण्याच्या क्षमतेचा 'वडा' झाल्यासारखं वाटेल. याच विषयावर आजची post बेतलेली आहे हे चाणाक्ष वाचकांनी एव्हाना ओळखलं असेलच. :)

मी मागे कुठेतरी वाचलं होतं की, जेवणाच्या टेबलवर चाललेल्या विषयाचा तुम्हाला गंधही नसेल आणि कुठे तोंड लपवू असं वाटत असेल, तरी काळजी करू नका. कसातरी विषय खाण्यावर आणा. 'खाणे' हा जगात कुठेही बहुतेक लोकांचा आवडीचा विषय असतो. :)

असं असलं तरी उदरभरण म्हणून खाणारे, चवीने खाणारे आणि खाण्यावर प्रेम करणारे असे तीन प्रकारचे लोक दिसतात. मी नि:संशयपणे तिसऱ्या गटात मोडते. भारतातली खाद्य-पदार्थांची विविधता आणि हा तिसरा गट, हे एक deadly combination आहे. त्याचाच परिणाम म्हणून या सुट्टीत पोटात भस्म्या झाल्यासारखं खाल्लं. घरची पुरणपोळी (तुपात बुडवून) खाल्ली. सांगलीच्या कृष्णाकाठची भरल्या वांग्याची भाजी खाल्ली. अलिबाग च्या बीच वरचा रंगीबेरंगी बर्फाचा गोळा (ओल्या कपड्यानिशी) खाल्ला. दुर्गाची कोल्ड कॉफी, लेओपोल्ड कॅफे मधले कबाब, फोर्ट मधला जम्बो ग्लास उसाचा रस (आले, लिंबू टाकून mind u), केतकवळ्याच्या बालाजीचा प्रसादाचा लाडू, अमूलचं आंबा आइस क्रीम, बालगंधर्व रंगमंदीर मधला मध्यांतराचा बटाटेवडा (अहाहा!), आणखीही बरंच काही... आणि तरीपण wishlist मधल्या काही गोष्टी tick झाल्या नाहीतच. उदाहरणार्थ खरवस. आमच्या दूधवाल्याची एकही गाय महिन्याभरात व्यायली नाही! :(

जगात वेगवेगळ्या पाहण्या करून मोठ्या संस्था कसले कसले reports लिहितात. त्यात गुन्हेगारी, लोकसंख्या, रोगराई यांच्यात भारताचा आणि इतर देशांचा जगात कितवा क्रमांक लागतो ते शोधून काढतात. खाद्य पदार्थांच्या विविधतेत कुणाचा कितवा क्रमांक लागतो हे काही कुणी शोधत नाही. भारतावर हा केवढा अन्याय आहे! आपल्याकडे केल्या जाणाऱ्या फक्त चटण्या ची यादी देखील करता येणं अवघड आहे. एकट्या कमलाबाई ओगलेंना केवढ्यातरी चटण्या येतात! (पहा: रुचिरा पान क्र. ६२ ते ७१) ;)

आपल्याकडे सगळे समारंभ, उत्सव खाण्याला केंद्रस्थानी मानून! लग्न-मुंजी, डोहाळजेवण, बारसे, केळवण, सोयर, सूतक, अगदी वाढदिवस, get-togethers सुद्धा. लग्नात नवरा मुलगा कसा आहे यापेक्षा अळूची भाजी किंवा कुर्मा  कसा  होता हा प्रश्न महत्त्वाचा असतो. इतकंच काय, केवळ एखाद्या ठिकाणची एखाद्या विशेष पदार्थाची चव घेण्यासाठी वाट वाकडी करून त्या ठिकाणाला भेट देणारे, एखाद्या मंदिराचा प्रसाद चांगला असतो म्हणून दर्शनाला जाणारे रसिक खवय्ये आपल्याकडेच (म्हणजे आपणच :))

आपले सगळे सण सुद्धा एखाद्या हुषार इसमाने सोयीस्करपणे वेगवेगळ्या पदार्थांना जोडून टाकले आहेत. त्यामुळे संक्रांतीला गूळपोळी, गुढी पाडव्याला श्रीखंड, होळीला पुरणपोळी, गणपतीत मोदक, दिवाळीची तर स्वतःचीच वेगळी खाद्य संस्कृती, असा सगळा जामानिमा नसेल तर आपल्याला सण साजरा केल्यासारखंच वाटत नाही. ते काय कमी म्हणून ईदला शीरकुर्मा आणि ख्रिसमसला प्लमकेकही आपलाच.

बरं हे सगळं फक्त महाराष्ट्रात! बाकी इंदोर सारखं एखादं शहर वगैरे तर या एका लेखाला झेपण्यासारखं नाही! बाकी आपल्या शहरात असलेली हॉटेल्स उत्तर किंवा दक्षिण भारतीय म्हणून जे काही पदार्थ देतात तीच आपण त्या प्रदेशाची खाद्य संस्कृती समजतो. म्हणजे साउथ इंडिअन म्हणजे इडली, वडा, डोसा, उत्तपा आणि पंजाबी इज इक्वल टू बटर रोटी आणि पालक पनीर, व्हेज कढाई, नवरत्न कुर्मा इत्यादी इत्यादी. गुजराती म्हणलं की गोड  कढी आणि खमण ढोकळा. बंगाली म्हणजे रोशोगुल्ला. अशी सगळी समीकरणं आपल्या डोक्यात पक्की असतात. पण या सगळ्या प्रदेशांचे स्पेशल असे खाद्य-कोपरे जाणून घेण्यासाठी तुमच्या शेजारी एखाद्या अय्यर काकू किंवा एखाद्या कमलाबेन असायला पाहिजेत आणि रोज डबा आणणारा एखादा पांडेजी किंवा जोयदीप सेनगुप्ता (मला अशी मोठठी मोठठी बंगाली नावं फार आवडतात) वगैरे नावाचा collegue असायला पाहिजे.

मासे, कोंबडी आणि इतर तत्सम जमाती याला मी हात घालत नाही. मी त्यातली फार दर्दी नाही. पण हे सगळं खात असताना निकटवर्तीयांच्या चेहऱ्यावरचा उत्कट वगैरे आनंद पाहून गळा दाटून येतो :P

अशी ही सगळी खाद्य सफर करून आल्यावर मला साहजिकच भूक लागली आहे. पण फ्रीज उघडायला जाण्याआधी एक प्रतिज्ञा. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या खाद्य परंपरांचा मला अभिमान आहे आणि त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी यासाठी मी सदैव प्रयत्न करेन :D