Wednesday, August 19, 2020

आपला आपला बाप्पा 

 २०१५ जुलै अखेरीस मी जर्मनीहून अमेरिकेत आले. कुणाल आम्हाला सोडून आठवड्याने परत जर्मनीला जायचा होता. मला सेटल व्हायला मदत करण्यासाठी सासू सासरे पुण्याहून आले होते. माझी बहीण मयुरीही योगायोगाने नुकतीच एम.एस. साठी इथेच आली होती. सामान जर्मनीहून २ महिन्यांनी यायचं होतं. तोपर्यंत कंपनीने दिलेल्या टेम्पररी हाऊजिंग मध्ये आम्ही दाखल झालो. घर सुसज्ज होतं आणि गरजेपुरतं वाणसामान भरलं होतं. पण आम्हाला अर्थातच इथली काहीही माहिती नव्हती. आमच्याकडे गाडी, ती चालवण्याचं ज्ञान आणि लायसन्स यातलं काहीही नव्हतं. आणि गणपती तोंडावर आले होते. 

पुण्यात आमच्याकडे पूर्ण १० दिवस गणपती असतो. तो सोडून सासू सासरे इथे आले होते. हे आमचं नवीन देशातलं नवीन पर्व सुरु करताना गणपती बसवायची इच्छा तर खूप होती. विचार करताना आम्हाला ऑनलाईन 'सॉल्ट डो' ची रेसिपी मिळाली. २ भाग मैदा आणि १ भाग मीठ वापरून त्याची घट्टसर कणीक म्हणजे सॉल्ट डो. सामान्यतः तिचा क्ले सारखा उपयोग करून त्याला आकार देतात आणि भाजून (बेक करून) त्याचे ख्रिसमस ट्रीचे दागिने (ऑर्नामेंट्स) तयार करतात. आम्ही तशाच पद्धतीने गणपतीची मूर्ती तयार करता येते का ते पाहायचं ठरवलं. इंटरनेटवरूनच सगळ्यात सोप्पी वाटेल अशी इवलुशी मूर्ती निवडली आणि प्रयोग केला. तो पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाला. म्हणजे मूर्ती फार काही सुबक नसली तरी ती गणपतीची वाटत होती आणि शेवटपर्यंत छान राहिली होती. तेव्हा आम्ही रंग न वापरता घरात जे काही उपलब्ध होतं तेच घेऊन मूर्ती तयार केली होती. त्या घरात जे शोभेचं सामान होतं ते वापरून त्याची आरास केली. गणपती अगदी थाटात पार पडले. आणि सर्वांत मुख्य म्हणजे स्वतः तयार केलेल्या मूर्तीमुळे बाप्पा इतका आपला वाटला की त्याला निरोप देणं खूप जड गेलं.

२०१५

त्यानंतर या वर्षापर्यंत मी आणि मयुरी हा रिवाज पाळत आलो आहोत. आता तो एक कौटुंबिक सोहळाच झाला आहे. दरवर्षी गणपतीची सुरुवात गणेशचतुर्थीच्या आधीच्या वीकएंडपासून सुरु होते. या वेळेस कशी मूर्ती तयार करायची यावर व्हाट्सअप कट्ट्यावर विचारमंथन होतं. दर वेळेस वेगळं काहीतरी करायचा प्रयत्न असतो. गेल्या ३ वर्षांपासून आम्ही कणीक मळून झाल्यावर त्यात खाद्य रंग मिसळून रंगीत मूर्ती करतो. बऱ्याच गमतीजमतीही झाल्या आणि त्यातूनच शिकत गेलो. उदाहरणार्थ एका वर्षी माझ्या भावानं खपून अतिशय सुबक कान तयार केले. आणि नंतर लक्ष्यात आलं दोन्ही डावे कान होते. एका वर्षी कणीक थोडी जास्त सैल झाली होती, त्यामुळे मूर्ती उभी न राहता मागे कलली होती. वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळे अवयव तयार केले तर हमखास स्केल कमी जास्त होते. पण हळूहळू हात बसू लागलाय. रावीसुद्धा न चुकता बाप्पाचा उंदीर, दागिने करते. पूर्णपणे खाण्याच्या पदार्थांपासून बनवलेली ही मूर्ती. कणकेचा पोत क्ले (प्ले डो) सारखा असल्यामुळे तिला आकार देणं मातीपेक्षा सोपं आहे. विसर्जन आम्ही बादलीत करतो. आणि नंतर पाणी झाडांना घालून टाकतो.

२०१६

२०१७

२०१८

२०१९

यावर्षीचा सोहळा गेल्या रविवारी पार पडला. बाप्पा तयार झाल्या झाल्या हावरटासारखे मी मित्र मंडळींना फोटो पाठवले. मला आणि मयुरीला बऱ्याच लोकांनी हे कसं केलं आणि अशा आशयाचे प्रश्न विचारले, म्हणून हे पोस्ट करायचं ठरवलं. सॉल्ट डोची रेसिपी अगदीच सोपी आहे, तरीही लिंक जोडते आहे. या काही आम्हाला एवढ्या वर्षात लक्षात आलेल्या टिप्स:
१. रेसिपी मध्ये सांगितलेल्यापेक्षा कणकेसाठी किंचित कमी पाणी वापरावं. कणीक सैल झाल्यास आकार द्यायला आणि मूर्ती उभी करायला त्रास होतो. 
२. रंग लिक्विड असतील तरी कणीक जास्त सैल होऊ शकते. 
३. मूर्ती घडवत असताना कणीक झाकून ठेवली तर ती कोरडी पडत नाही. 
४. कणीक छान मळून घेतली तर आकार द्यायला सोपा जातो. 
५. मूर्ती बराच वेळ उघडी राहिली तर ती हळूहळू कोरडी पडून तिला भेगा पडू शकतात. त्यामुळे शक्यतो घडवण्याचं काम भराभर करावं लागतं. 
६. मूर्ती विसर्जन झाल्यावर लगेच विघटित होत नाही. बराच वेळ लागतो. 
७. जेव्हा मूर्तीचे हात किंवा इतर सांधे जोडायचे असतात, तेव्हा कधी कधी कणीक चिकटून राहत नाही. अशा वेळेस आम्ही दोन भागांमध्ये एखादी उदबत्तीची किंवा स्क्युअरची काडी घालतो. ती दोन भागांना जोडून ठेवते आणि बेक करताना काही प्रॉब्लेम येत नाही. 
८. २५० फॅरेनहॅटवर साधारण २ तास बेक केली की मूर्तीला छान कठीणपणा येतो. 
९. डोळे आणि इतर गोष्टी आम्ही बेक झाल्यावर मार्कर किंवा पेन वापरून काढतो. 

तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा! यावर्षी लोटलेली सगळी विघ्नं बाप्पाच्या येण्यानं टळून जावोत. मोरया! 

२०२०





No comments:

Post a Comment