Friday, September 4, 2020

मी ट्रोलकर जाळ्याचा राजा 

 विडंबनाचा एक प्रयत्न. कवियित्री शांताबाई शेळके यांची क्षमा मागून. (मूळ प्रसिद्ध कोळीगीत 'मी डोलकर दर्याचा राजा' याचे बोल विडंबनाखाली.)


मी ट्रोलकर जाळ्याचा राजा 

पसरव रे भावा हो पसरव रे मैला 

मी ट्रोलकर ट्रोलकर, ट्रोलकर जाळ्याचा राजा 
जोर शिव्यांवरी, भल्यांची घेतो मज्जा 

लय दावायची होती रं मला गुंडगिरी 
पन फाटायली हो, मानसं दिसता खरी 
मंग घावल्या हो, फेसबूकन इन्स्टाच्या तोफा 
दांडगाईचा भौ, रस्ताच झाला ना सोपा 

दर कमेंट पसरवतो घानी 
कुना कळंना केलंय कोनी 
नाही गर्दीला चेहरा आनी... 
एका हाकेला भाऊबंदाच्या हो फौजा 

या हो इंटर्नेटचा इंटर्नेटचा इंटर्नेटचा पसारा मोठा 
दर कमेंटवरी येतोय दोस्तांचा अंगठा अंगठा अंगठा अंगठा  
कवा यूट्यूबवरी कुनाची लय ठासू 
कवा फोटोतल्या त्वांडाला रं काळं फासू 

जरी शान्यांची टाळकी फिरती 
कुनाकुनाला जाऊन धरती?
त्याच्यामुळेच आपली चलती 
खऱ्या न्हाय तं न्हाय, खोट्या जगी गाजा वाजा 

दर दिवसाला पायरी एक येतो खाली 
कुनी शिंकलं तरी भावना जाते दुखावली 
आनी पेटून मग उठतोच पोस्टीच्या खाली 
खोट्या अस्मितेच्या पाजळूनी रं मशाली 

मजा बघाया गंमत आली 
कशी वाघाची शेरडी झाली 
माझ्या इगोला चढली लाली 
सुरा फिरवाया रोजच बकरा ताजा 


मी डोलकर दर्याचा राजा 
- शांता शेळके 

वल्हव रे नाखवा हो वल्हव रे रामा
मी डोलकर डोलकर, डोलकर दर्याचा राजा
घर पान्यावरी बंदराला करतो ये जा!
आयबापाची लाराची लेक मी लारी
चोली पीवली गो नेसलंय अंजीरी सारी
माज्या केसान गो मालीला फुलैला चाफा
वास परमालता वार्यानं घेतंय झेपा

नथ नाकानं साजीरवानी
गला भरुन सोन्याचे मनी
कोलिवाऱ्याची मी गो रानी
रात पुनवेला नाचून करतंय् मौजा

या गो दर्याचा दर्याचा दर्याचा दरारा मोठा
कवा पान्यावरी उठतान डोंगरलाटा लाटा लाटा लाटा
कवा उदानवारा शिराला येतंय् फारू
तवा पान्यासुनी आबाला भिरतंय तारू

वाट बगून झुरते पिरती
मंग दर्याला येतंय् भरती
जाते पान्यानं भिजून धरती
येतंय भेटाया तसाच भरतार माजा

भल्या सकालला आबाल झुकतं हे खाली
सोनं चमचमतं दर्याला चढते लाली
आमी पान्यामंदी, रापण टाकतो जाली
धन दर्याचं लुटून भरतो डाली

रात पुनवेचं चांदनं प्याली
कशि चांदीची मासली झाली
माज्या जाल्यात होऊन आली
नेतो बाजारा भरून म्हावरां ताजा

No comments:

Post a Comment