इकडे अमेरिकेत आठवड्याची खरेदी एकदाच शनिवारी किंवा रविवारी होते. येता येता दुकानातून किराणा किंवा कोपऱ्यावरून भाजी घेऊन येणं वगैरे प्रकार नाही. वीकेंडची भाजी आणि किराण्याची खरेदी म्हणजे एक कंटाळवाणा प्रकार असतो. आपलं आपलं जाऊन खरेदीची कार्ट घ्यायची, ती ढकलत नेहमीच्या ठिकाणहून नेहमीच्या गोष्टी उचलायच्या. नजरेला आणि जिभेला वाकुल्या दाखवणाऱ्या अति तेलकट किंवा अति गोड पदार्थांतून वाट काढत भाज्या, फळांपर्यंत पोचायचं. ते झालं की दुधाच्या रॅक समोर येऊन ऑरगॅनिक की साधं, फुल फॅट का २% का ०% च्या संभ्रमात २ मिनिटं घालवायची. सगळी यादी एकदाची संपली की रांगेत उभं राहायचं. गल्ल्यावरच्या बाईबरोबर जो काही 'हाय, हावारयू' चा २ वाक्य निरर्थक संवाद होईल तेवढाच. बाकी मनुष्यप्राण्याशी संबंध येण्याचं काही कारण नाही.
मला अशा वेळेस नेहमी भारतातल्या खरेदीची आठवण होते. अहाहा! 'कशी दिली जुडी?', 'कच्ची नका घालू', 'किरमिजी रंगात दाखवा', 'अहो आम्ही रोजचं गिर्हाइक आहोत', 'ताई जरा समजून भाव सांगा ना', 'तुमचं नाही आमचं पण नाही', 'मागच्या वेळचा नारळ नासका निघाला' अशी वाक्यं सतत कानावर पडत नसतील तर कसली ती खरेदी? भारतात खरेदीची सुद्धा एक स्वतःची संस्कृती आहे. तिचे काही अलिखित नियम आहेत. काही उत्तम सेल्समनशिप, सेवा आणि मार्केटिंगचे नमुने पाहायचे असतील तर भारतात छोट्या स्थानिक दुकानांमध्ये खरेदीला जावं.
यात कापडखरेदीचा वर्ग उच्च आहे. कपड्यांच्या दुकानातल्या सेल्समनना अध्यात्म, प्राणायाम, ध्यान यांचं ट्रेनिंग देत असावेत. हे दाखवा, ते दाखवा करत अक्खा स्टॉक काउंटर वर पसरला असला तरी तो निगुतीनं घड्या घालायचं काम त्यांना त्याशिवाय कसं जमेल? साडीखरेदी हा तर सेल्सासमनशिपचा कळस! (गाडीखरेदी त्याच्या दोन बोटं खाली) जनरल कपडे सेल्समन ट्रेनिंग मध्ये डिस्टिंक्शन मिळवणार्यांना साड्या विकण्याच्या एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंगला पाठवत असतील.
साड्या विकणाऱ्याला साडीचा प्रकार माहित नसला तरी चालेल, 'सब मोह माया है' हे तत्व त्याला आधी कळले पाहिजे. २ तास साड्यांच्या घड्या मोडून त्या किती सुंदर आहेत हे पटवून देऊनसुद्धा गिऱ्हाईक त्या हिरवट आमसुली रंगापायी 'डाव मांडून भांडून मोडू नको' ची आर्जवं धुडकावून 'देखके आते है' म्हणत निघून गेलं तरी डिप्रेशनमुक्त राहता आलं पाहिजे - सब मोह माया है! दोन साड्यांमध्ये एक निवडा यची असे ल तर पटकन एक साडी स्वतःला, एक सहकर्मचाऱ्याला गुंडाळून, त्याचबरोबर लाज गुंडाळून उभं राहता आलं पाहिजे. गिऱ्हाईकाच्या रंगाला प्रत्येक साडी कशी खुलून दिसेल हे सांगता आलं पाहिजे. लग्नाच्या बस्त्याची खरेदी हा तर एखाद्या भारतीयेतर माणसाला तोंडात बोटं घालायला लावेल असा प्रकार आहे. दुकानात गाद्या लोड तक्के! हल्ली माॅलमध्ये खरेदी करायला (सामान उचलायला) आलेल्या, कुठेतरी कोपऱ्यात बसून आशाळभूतपणे घड्याळ बघणाऱ्या नवऱ्यांना माॅलमध्ये गाद्या तक्के उपलब्ध करून देणे ही एक स्टार्टअप बिझनेस आयडियाअसू शकते. (इच्छुकांनी आय. पी. चा आदर करावा.) असो. बस्त्याचं गिर्हाईक असं मुक्काम ठोकण्याच्या तयारीने दुकानात येतं. चहा पाणी, जेवणासाठी सुट्टी घेऊन वर्किंग डे सारखी मनोभावे खरेदी चालते. विहिणबाईंसाठी कुठली साडी घ्यावी, मुलाच्या आत्यासाठी कुठली, यांचं सजेशनपण सेल्समन देतात रीतसर.
किराणा दुकानात आपण हाडामांसाच्या माणसांशी बोलत असू हेच हल्ली विसरायला झालंय. सगळा कॅशलेस, पपेरलेस आणि ह्यूमन इंटरॅक्शनलेस व्यवहार. मी लहानपणी किराणा दुकानात किंवा गिरणीच्या दारात राजकीय महाचर्चेपासून नणंदेच्या चहाड्यांपर्यंत कसल्याही गप्पांचे फड रंगलेले पहिले आहेत. तसले ‘मे. अमके तमके ब्रदर्स, किराणा आणि भुसारमालाचे घाऊक आणि किरकोळ विक्रेते' हल्ली फारसे दिसत नाहीत. त्यांच्या जागी आता ‘बिकानेर किराना भंडार’, 'माँ शाकंभरी जनरल स्टोर्स' किंवा 'फूडी गुडी सुपरमार्केट' आले आहेत. काउंटरवर ठेवलेल्या त्या बरण्या, त्यातल्या लिमलेटच्या गोळ्या, ते लाल रॅपर मधले किसमी टॉफी बार्स, वर्तमानपत्राच्या त्या पुड्या, पुडीचे दोरे, त्याचं ते दुकानात टांगलेलं रीळ, मागे उघडून ठेवलेली किराण्याची पोती सगळं आता इतिहासजमा झालं. प्लास्टिकच्या पॅकेट किंवा पिशव्यांमध्ये बसून किराणा घरी येऊ लागल्यापासून पुड्या आणि पुड्या बांधण्याचं हस्तकौशल्यसुद्धा कालबाह्य झालं.
आता सर्वांत महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळते. तो म्हणजे बार्गेनिंग. भारतात भाजी, मासे, किराणा, रस्त्यावरचे कपडे या नेहमीच्या ठिकाणांपासून पाणीपुरीचे गाडे, हॉटेलं, बँका, फार्मसी असं कुठेही बार्गेनिंग चालतं. 'MRP ही (जिथे असते तिथे) शोभेची वस्तू आहे' हा विक्रेते आणि ग्राहक यांच्या परस्परसंबंधाचा पाया असतो. रस्त्यावर खरेदी करणाऱ्या बार्गेनिंग कोळून प्यालेल्या ग्राहकांची खरेदी बघणं हा एक रंजक प्रकार आहे. 'थोडा कम करो' पासून श्रीगणेशा होतो. दोन्ही बाजू पहिली बोली लावायला तयार नसतात. थोडा वेळ 'आप बोलो', 'नही आप बताव' झालं की भैय्या १००० चा नारळ फोडतो. मग समोरून ५० नी सुरुवात होते. मग जोरात वाटाघाटी चालतात. "इतना मार्जिनभी नही है मॅडम", "पता है हमको. हमारे पास पैसेही नही है", "इससे कम नही होगा", "इससे ज्यादा नही दूंगी" वगैरे दहा मिनिटे झालं की सौदा सोडून बेहेनजी चालू लागतात. मागून बुलावा येणार आहे याची त्यांना खात्री असते. शाहरुखने काजोलची बघितली नसेल तेवढी बेहेनजींनी मागे वळून बघण्याची भैया वाट बघत असतो. बेहेनजींना हे ठाऊक असतं. थोडं ताणून शेवटी कुणीतरी 'जाऊंदे राव' म्हणत माघार घेतं आणि सौदा सुटतो.
अशी भावभावनांचा स्पर्श असलेली खरेदी म्हणजे एक अनुभव असतो. नाहीतर 'Paying money in the exchange of goods or services' असल्या कोरड्या गोष्टीला व्यवहार म्हणता येईल फारतर. इकडे युट्यूब वर टार्गेट किंवा वॉलमार्ट शॉपिंग हॉल वगैरे नामक व्हिडिओ बघितले की म्हणावंसं वाटतं, 'हाये कंबख्त तूने पीही नही!'
No comments:
Post a Comment