Saturday, February 25, 2017

हेबामे

हेबामे म्हणजे मिडवाईफ. मराठीत सुईण म्हणता येईल. हेबामे हा जर्मन शब्द आहे. या हेबामे गरोदरपणात आणि बाळंतपणात मार्गदर्शन, मदत करतात. जर्मनी मध्ये हेबामे सेंटर्स आहेत. तिथे जन्माची तयारी आणि नवजात बाळाची काळजी याबद्दलच्या शिकवण्या घेतल्या जातात. या शिकवणीत होऊ घातलेल्या आई, बाबांची तयारी करून घेतली जाते. अमूल्य माहिती, टिप्स आणि सल्ले दिले जातात. येणारा सुंदर पण अवघड काळ कसा सुलभ करावा याचं मार्गदर्शन केलं जातं. या सेंटरला संपर्क करून तुम्हाला हव्या त्या हेबामे बरोबर तुम्ही व्यक्तिगत कॉन्ट्रॅक्ट करू शकता. या हेबामे सुविधेचा खर्च तुमच्या आरोग्य विम्याकडून भागवला जातो. मग ही हेबामे गरोदरपणाच्या पाचव्या - सहाव्या महिन्यापासून घरी येऊ लागते. सुरुवातीला तिच्या भेटींची वारंवारता कमी असते. नंतर ती आठवड्यातून एकदा, नंतर दोनदा येऊ लागते. माझ्यासारख्या परदेशात गरोदरपण आणि बाळंतपण अनुभवणाऱ्या, आई-आज्जीच्या, मावशा-काकवांच्या कोड-कौतुकाला आणि मार्गदर्शनाला मुकणाऱ्या पहिलटकरणींसाठी हेबामे म्हणजे देवदूतापेक्षा कमी नसते. 

माझ्या हेबामेचा चेहरा अजून माझ्या डोळ्यासमोर आहे. क्रिस्टीना तिचं नाव. शेलाटी, हसरी, उत्साहाने सळसळणारी, चेहऱ्यावरून परिपक्व वाटणारी. तिच्या चेहऱ्यावर मेकअपचा लवलेशही नसायचा. जर्मन स्त्रियांसाठी हे विशेष. ती इंग्लंड मध्ये राहिली होती काही वर्षे. त्यामुळे इंग्रजी अस्खलित बोलायची. पाचव्या महिन्यापासून ती येऊ लागली. आमच्या पहिल्याच भेटीत मी तिची भक्त झाले होते. मला प्रसूती या गोष्टीची आधी प्रचंड भिती वाटायची. या प्रसंगाच्या नेहमी भयावह गोष्टीच ऐकलेल्या असतात. त्यामुळे आपण 'खूप दुखतं' यापलिकडे त्याचा विचारच करत नाही. खरंतर मनाच्या आणि शरीराच्या योग्य तयारीने सामोरी गेलं तर तो आयुष्यातला सर्वोच्च क्षण असतो. माणूस म्हणून समृद्ध करणारा. आपल्यात प्रेम करण्याची किती ताकद आहे हे आपल्यालाच दाखवून देणारा. पण हे असं सांगतच नाही कुणी. नेहमी भीतीदायक वर्णनंच कानी पडतात. माझंही तसंच झालं होतं. पण माझ्या सुदैवाने क्रिस्टीना मला भेटली. तिने माझी प्रसूतीची सगळी भीती आधी दूर केली. काही पुस्तकांची नावे सांगितली. ज्यांचा मला खूप उपयोग (खरंतर उपकार) झाला.

क्रिस्टीनाला स्वतःला ३ मुले होती. त्यापैकी दोघांचे जन्म तिच्या घरीच झाले होते. हो, जर्मनीमध्ये हे हल्ली रूढ होत चाललं आहे. बाळाची आणि आईची तब्येत व्यवस्थित असेल तर बऱ्याच स्त्रिया बाळाला घरच्या घरी सुईणीच्या मदतीने जन्म देणे पसंत करतात. ही एक अतिशय नैसर्गिक प्रक्रिया आहे. जर काही गुंतागुंत असेल तर गोष्ट वेगळी. मग डॉक्टर, औषधे, चिकित्सा, भूल वगैरे आलंच. पण सगळं सुरळित असेल तर जिथे सर्वात आरामदायक वाटेल अशा स्वतःच्या घरी, कुठल्याही ड्रग्स, यंत्र यांपासून दूर आपल्या बाळाने या जगात यावं अशी ही विचारप्रणाली आहे. क्रिस्टीनाच्या प्रत्येक सल्ल्यात ही नैसर्गिक प्रक्रियेची ओढ डोकवायची. तिने मला कधीही कुठलीही औषधे लिहून दिली नाहीत. अगदी जीवनसत्वाच्या गोळ्याही नाही. मला आधी घुटमळायला झालं. माझ्या सारख्या इतर मुली ५-५ गोळ्या एका वेळी घटाघट जिरवायच्या. पण थोडं वाचन, अभ्यास केल्यावर मी तिच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवायचा असं ठरवलं. मला ती नैसर्गिक (प्लॅन्ट-बेस्ड) औषधे लिहून द्यायची. आहारात बदल सुचवायची. श्वसनाचे आणि इतर व्यायाम शिकवायची. ध्यान (मेडिटेशन) करायला सांगायची. मी तिचा एक शब्दही खाली पडू द्यायचे नाही. सतत माझे आपले फूस फूस करत श्वसनाचे व्यायाम सुरु. 

प्रसूतीच्या वेळी भीतीपोटी आपण आपले अवयव आखडून घेतो. त्यामुळे नैसर्गिक प्रक्रियेला अडथळा येतो, वेदना वाढतात आणि आपण अजूनच घाबरतो. असं दुष्टचक्र तयार होतं. त्याऐवजी श्वसनावर लक्ष्य केंद्रित करून निसर्गाला त्याचं काम विनासायास करू द्यावं. अंग शिथिल सोडावं. असं केलं तर प्रसूती लवकर आणि सुलभ होते. क्रिस्टीनाच्या या सल्ल्याचं मी प्रसूतीच्या वेळी तंतोतंत पालन केलं. रावीचा जन्म अतिशय सुलभ झाला. आणखीही बऱ्याच मजा मजा झाल्या. ती सगळी गोष्ट नंतर कधी. पण थोडक्यात जन्माचा तो सोहळा तना-मनाने १००% टक्के उपस्थित राहून मी अनुभवला. याचं श्रेय क्रिस्टीनाला. 

जन्मानंतरही काही आठवडे ती येत राहिली. रावीची पहिली अंघोळ, तिची काळजी, मालिश, माझी शारीरिक झीज भरून काढणे, शून्याखालच्या तापमानात बाळाची आणि माझी काळजी या सगळ्यात तिने मला, कुणालला आणि आईला अमूल्य मदत केली. एकदा ती आईला बाळंतपणासाठी काही पाकक्रिया सांगत होती. तेव्हा आईला जाणवलं, हे तर आपले डिंकाचे लाडू! तिच्या आणि आपल्या जुन्या पद्धतींतले अजूनही समान दुवे आम्हाला वेळोवेळी जाणवायचे. 

क्रिस्टीना जरी गरोदर आणि बाळंतपणासाठी सल्ले देत असली तरी तिची विचारप्रणाली त्यापुरतीच मर्यादित नाही. निसर्गाला त्याचं काम करू देणे, उपचारांपेक्षा प्रतिबंधाला महत्व देणे, आजीबाईचा बटव्यातल्या जादूच्या गोष्टी आपल्या स्वैपाकघरात शोधणे, आपल्या शरीरात खाण्यावाटे काय प्रवेश करत आहे, आपण आपल्या शरीराला वरूनही काय लावत आहोत याची पूर्ण माहिती ठेवणे अशा गोष्टींचा विचार ही मला तिने दिलेली देणगी आहे. आपल्या जीवनशैलीला परिसस्पर्श करणारी माणसं भाग्यानंच भेटतात.माझ्यासाठी परीस झाल्याबद्दल मी तिची अतिशय ऋणी आहे. 

No comments:

Post a Comment