वीकांताची सकाळ भासत होती शांत नि साधी,
ठाऊक नव्हते अशी शांतता असे वादळाआधी.
म्हटले उरकून प्रातर्विधी मग ठेवावे आधण,
चार चहाचे घुटके घ्यावे बसून दोघे जण.
अशात कोठून दुर्भाग्याने दुर्बुद्धी ती सुचली,
जाता जाता ओझरती मी स्वप्रतिमा निरखली.
दर्पणातुनि शुभ्र-पांढरा केस तो लुकलुकला,
खोटे कशास बोलू मम हृदयीचा ठोका चुकला.
आंतरातले खंबीर वगरे डगमगले ते स्त्रीत्व,
साहजिक आहे, डोक्यावरचा एकच कण परिपक्व.
कळून आली चूक, देता विवेकास मग संधी,
काय सांगते डोक्यावरची चमचमणारी चांदी.
कोकीळ जैसा देई वसंत-आगमनाची वर्दी,
तशीच ही या वळणावरची ऋतूबदलाची नांदी.
रंगलेपही झाकू न शकती पोक्तपणाच्या खुणा,
खुल्या दिलाने स्वागत करणे यातच शहाणपणा.
डोक्यावरच्या चांदीकरिता उत्तम उपाय गमले,
अशा प्रकारे चहा कपातील वादळ माझ्या शमले.
No comments:
Post a Comment