शिक्षणासाठी किंवा इतर कारणांमुळे घराबाहेर पडलेल्या बहुसंख्य इतर लोकांप्रमाणेच माझी स्वयंपाकघरातली उमेदवारी भारत सोडून जर्मनीला गेलो तेव्हा सुरु झाली. तोपर्यंत घरात आईला मदत करण्यासाठी जी सी ग्रेड कामे करावी लागतात तेवढाच स्वैपाकघरात वावर. म्हणजे पाने घेणे, उष्टं आवरणे, ऐन वेळी घरात नसलेल्या गोष्टी 'पटकन' कोपऱ्यावरच्या वाण्याकडून / भाजीवाल्याकडून घेऊन येणे इत्यादी. नंतर इंजिनीरिंग सुरु झाल्यावर सुट्टीला घरी जाऊ लागले तेव्हा बी ग्रेड कामे सुरु झाली. शेवटच्या २ पोळ्या लाटणे, भाजी फोडणीला घालणे, पाने वाढणे (डावीकडे कोशिंबीर, उजवीकडे भाजी वगैरे सकट). अशा प्रकारे जर्मनीला गेलो तेव्हा मला उपासमार होणार नाही एवढा स्वैपाक येत होता. पण आवड वगैरे निर्माण झाली नव्हती.
पण गरज ही शोधाची जननी असते. तशी चांगलं चुंगलं खायला सोकावलेली जीभ ही माझ्या पाककलेची जननी, जनक, भाऊ-बहीण सगळं होती. कुणाललाही (नवरा) खाण्याची नितांत आवड. आमची पत्रिका बघितलेल्या गुरुजींनी एक गूण जबरदस्त जुळतोय म्हणल्यावर गो अहेड दिला असावा. तोच हा गूण. त्यामुळे आमचं बाकी सगळं उत्तर आणि दक्षिण ध्रुवांवर चालू असलं तरी खाण्याची आवड जोपासण्यासाठी आम्ही विषूववृत्तावर येतो. जर्मनी मध्ये प्राथमिक भारतीय किराणा मिळत होता. पण सगळा कच्चा माल. आली लहर काही खायची, काढली गाडी आणि मारला ताव असे अमेरिकन लाड तिकडे नाहीत. त्यामुळे काही खावंसं वाटलं की मुकाट्याने यू ट्यूब वर संशोधन करायचं, साहित्य गोळा करायचं आणि पाकसाधना सुरु. आपला हात जगन्नाथ.
वेगवेगळ्या cuisine च्या वेगवेगळ्या पाककृती करून बघणे हा आमचा छंद झाला होता. दर सुट्टीच्या दिवशी वेगळा घाट. म्युनिक मध्ये आमच्या ओळखी वाढवण्याच्या निमित्ताने आम्ही नेहमी कुणाकुणाला घरी जेवायला बोलवत असू. खादंतीची खादंती आणि सोशलायझेशनचं सोशलायझेशन. हाय काय अन नाय काय. गूळपोळ्यांपासून तिरामिसूपर्यं
पण हे सगळे पाकप्रयोग वीकांताला चालायचे. एरवी माझे क्लासेस, अर्ध वेळ नोकरी, त्याची नोकरी या दुय्यम गोष्टींमुळे जेवणा खाण्याची गंमत-जंमतच असायची. विशेषतः वरखाण्याची. (म्हणजे चरखाण्याची.) घरी आलं की फ्रिज, १-२ डबे उघडून निराश व्हायचं आणि मुकाट्याने स्वैपाकाला लागायचं.
त्याच दिवसांतला हा एक किस्सा. एकदा मला मोदकांची अतिशय आठवण झाली. मोदक आणि गुळाच्या पोळ्या हे माझे अती आवडते गोड पदार्थ आहेत. बाकी केकादी खाताना नाही म्हणलं तरी किंचित अपराधीपणा शिवून जातो. पण मोदक? कॅलरीज गेल्या उडत! तेव्हापर्यंत मी एकटीने मोदक केले नव्हते. सारण आणि पिठी तयार असेल तर मला माफक सुबक मोदक करता येत होते, पण पिठी कुणी केली होती! मी लगेच न डगमगता रूचिरा चाळलं, घरी फोन केले, २-३ यू ट्यूब वीरांच्या मोदकांचा अभ्यास केला. गुरुवार होता. म्हणलं शुक्रवारच्या रात्री घालू घाट. पहिलाच प्रयोग होता, त्यामुळे दोघांना २-२ येतील एवढेच करायचं ठरवलं. अनायसे सगळं सामान घरात होतं. उद्याचं काम हलकं व्हावं म्हणून सारण करायला लागले. नवरा घरात नव्हता. एरवी तो सारखा मधे मधे प्रशांत दामलेगिरी करत असतो. यात हे का घालत नाहीस, कचरा किती केलास, मधेच कसलातरी तोबरा भरुन माझा अंदाज चुकव इ. पण हे काही नसल्याने सारण सुरळित पार पडलं. सारण वाटीबंद आणि वाटी फ्रिजबंद झाली.
दुसरा अख्खा दिवस मी मोदकांच्या दिवास्वप्नांत घालवला. नाजूक, सुबक २१ पाऱ्यांचा गरम मोदक, त्याचं नाक खुडताच मोकळी झालेली वाफ, गळू पाहणारा तो गोड रस, मग मोदकाच्या पोटात पडलेली साजूक तुपाची धार! अहाहा! घरी आल्या आल्या तयारीला सुरुवात केली. पिठी करायला ठेवली. तिला वाफ येत होती तोवर सारण काढायला फ्रिज उघडला. सारणाची वाटी काही दिसेना. सगळे कप्पे शोधून झाले. मग शंका आली म्हणून बाहेर येऊन पाहिलं तर कुणाल टेबलवर लॅपटॉप घेऊन बसला होता आणि टेबलवर सारणाची वाटी. अर्थातच रिकामी. माझ्या चेहऱ्यावरचे हसू, राग, प्रश्नचिन्ह असे सगळे मिश्र भाव पाहिल्यावर त्याला लिंक लागली आणि तो उत्तरला "पण मला भूक लागली होती!"
अशा सगळ्या मजेदार, कडू, गोड अनुभवांनी आमचं स्वैपाकघर मोठं झालं आहे. स्वैपाक म्हणजे वेगवेगळ्या चवींचं, गंधांचं आणि रंगांचं सेलिब्रेशन आहे. शेवटी चवी काय हो, पाचच असतात. तिखट, खारट, तुरट, आंबट आणि गोड. या चवींचं गुणोत्तर प्रमाण जमलं की स्वैपाकाचं गणित चोख सुटतं. पण कविता करायला जसं शिकवता येत नाही, तसं 'कोशिंबिरीच्या फोडणीत चमचाभर उडदाची डाळ घालून बघा' असं रेसिपीच्या पुस्तकात लिहिता येत नाही. ते आतूनच यावं लागतं. म्हणूनच या साधनेला पाक'कला' म्हणतात.
No comments:
Post a Comment