Friday, December 9, 2016

कल्पनाविश्वाचा खुर्दा

मध्ये कुठेतरी वाचलं, 'आयुष्य नव्याने समजून घ्यायचं असेल तर ३ वर्षे वयाच्या मुलांबरोबर वेळ घालवा' आणि मला माझी लेक नुकतीच ३ वर्षाची झाल्याचा नव्याने साक्षात्कार झाला. मला हे माहित नव्हतं असं नाही. पण रोजच्या रहाटगाडग्यातला एक नमूनेदाखल दिवस माझ्या डोळ्यासमोर तरळला. आत्तापर्यंत शिकलेल्या किंवा ground truth म्हणून स्वीकारलेल्या गोष्टी unlearn करण्याच्या कितीतरी संधी ती मला देत असते. तीच नाही, तिच्या वयाची सगळीच मुलं. पण आपल्यावर आपल्या आजूबाजूच्या जगाचा, इथल्या नियम-अटींचा एवढा पगडा असतो, की असे साक्षात्काराचे क्षण आपण अनुभवातच नाही. कुठे पोचायची एवढी घाई असते कुणास ठाऊक. पण हे त्यावेळेस सुचत नाही.

माझ्या मुलीच्या बालवाडीच्या बाहेर त्यांचा एक मोठा फलक आहे. त्यावर फुग्यांचं चित्र आहे. रोज शाळेत जाताना गाडीतून उतरल्यावर तिचा असा शिरस्ता असतो: त्या फलकाकडे जायचं, त्याला विचारायचं, "मी तुझा एक फुगा घेऊ का ?" मग तो म्हणतो (अर्थात तीच म्हणते) "हो घे." मग ती एक खोटा खोटा फुगा हातात घेते. शाळेत जाईपर्यंत त्याला गोंजारते, तिच्या कपाटात ठेऊन देते आणि खेळायला पळते. या सगळ्या प्रकारात साधारण १० मिनिटे मोडतात. मला घड्याळात धावणारा काटा, मॅनेजरचा चेहरा, कॅलेंडर मधले रकाने इत्यादी दिसत असतं. "चला, आवरा, hurry" चा पाढा मी जिभेवरून परत आत ढकलत असते.

जरा निवांत झालं की विचार येतो, खरंच किती सुरेख कल्पना आहे! फलकावरून रोज एक देखणा रंगीबेरंगी फुगा घ्यायचा आणि दिवसाला सुरुवात करायची! अशा सुपीक मनाला "भरभर, पटकन" ची बंधनं घालून आपण काय मिळवतो? माझ्याकडे २ पर्याय असतात. तिला घाई करून तिचा आणि माझा मूड खराब करून घ्यायचा किंवा सकाळी सकाळी दिवसातली सर्वात सुंदर दहा मिनिटे १०० टक्के हजर राहून अनुभवायची!

खरंच किती किरकोळ गोष्टीत आनंद असतो. फक्त क्षणभर थांबून, जागा बदलून पाहायची गरज असते. टागोरांच्या ओळी आठवल्या: "It is very simple to be happy, but it is very difficult to be simple!"

No comments:

Post a Comment