पुरुषोत्तमच्या त्या मंतरलेल्या दिवसांच्या आठवणीत रेंगाळण्याचं मी आवर्जून टाळते. तो अनुभव पुन्हा पुन्हा जगू शकत नाही याची जाणीव ठसठसते. पण काही दिवसांपूर्वी पुरुषोत्तम च्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात आम्हा कमिन्स च्या पोरींना मिळालेल्या 'केशवराव दाते' चा उल्लेख झाला आणि मला 'आम्हीच त्या' असं TV समोर जोरात ओरडावसं वाटलं. त्यानंतर मात्र मी मनसोक्त त्या दिवसांमध्ये बागडून आले.
![]() |
| माझा खजिना! |
'पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन नाट्यस्पर्धा' म्हणजे पुण्याच्या नाट्य वर्तुळातलं बहुचर्चित प्रस्थ. जीवापाड जपलेले, अभिमानाने मिरवलेले हे माझ्याकडचे पुरुषोत्तमचे ३ पत्रे! त्यातल्या त्यात तो मधला कणभर जास्त लाडका. हाच तो केशवराव दाते करंडक! सर्वोत्कृष्ट वैयक्तिक अभिनयाबद्दल दिला जाणारे बक्षीस. खरं तर हे वैयक्तिक बक्षीस. पण ते माझ्या एकटीचे नाही. १३ जणींनी मिळून मिळवलेल्या 'केशवराव दाते' ची ही कथा!
जून जुलै उजाडला की कॉलेजमध्ये पुरुषोत्तमचं वारं वाहू लागायचं. यावर्षी काय करायचं, विषय कुठला, नाटक कुठलं याविषयी चर्चा, brainstorming सुरु व्हायचं. होस्टेलच्या मेस मध्ये जेवताना गप्पा मारता मारता मैत्रिणीने मुंबईत नुकत्याच झालेल्या बॉम्बस्फोटांवर काहीतरी लिही असं सुचवलं आणि चक्रे सुरु झाली. माझं घर त्यावेळी मुंबईत होतं. मुंबई हा माझ्या मनाचा हळवा कोपरा आहे. तो स्फोट झाला तेव्हा मी पुण्यात होते. घरी फोन करायचा सतत प्रयत्न करत होते आणि लागत नव्हता. तेव्हा झालेली तगमग, आलेला संताप, 'मुंबईचं स्पिरीट' अशी फ़ेमस झालेली चीड आणणारी ओळ हे सगळं ताजं होतं. त्यामुळे लेक्चरला बसल्या बसल्या डोक्यातून काय काय उगवत राहिलं आणि मी त्या रात्रीत नाटकाचा कच्चा आराखडा लिहून काढला. हा आराखडा बऱ्याच विषयात शब्दशः 'कच्चा'च होता. त्या स्क्रिप्ट मधली एक गोष्ट मात्र शेवटपर्यंत तशीच राहिली. ती म्हणजे एकांकिकेचं नाव: दहा-सतरा!
'दस बजकर सतरा मिनट की बोरीवली से चर्चगेट जानेवाली धीमी लोकल' म्हणजे दहा-सतरा. या दहा-सतराच्या एका लेडीज डब्याच्या आयुष्यातले ते चार दिवस म्हणजे ही एकांकिका. अठरापगड स्तरातल्या, वेगवेगळ्या वयाच्या, वेगवेगळ्या रंगरुपाच्या, भिन्न पार्श्वभूमीच्या १३ बायका या डब्याच्या एका कोपऱ्यात कोंबलेल्या असत. रोज दिवसातले १५ मिनिटे ते २ तास त्या एकमेकींबरोबर गुण्यागोविंदाने नांदत, भांडत, हसत, रडत, चिडत, ओरडत, कुटाळक्या करीत, गप्पा मारीत, खोड्या करीत, भाजी निवडत (इ.) असत. या महिलामंडळात ५ वर्षाच्या सोनू पासून ५० वर्षांच्या झोपणाऱ्या काकुंपर्यंत अनेकांचा समावेश असे. हा प्रवास खूप सुंदर नसला तरी तो त्यांचा आपला होता. त्यांच्या आयुष्याचा एक भाग होता.
आणि मग आला तो भयाण दिवस. दहा-सतराने एवढा शुकशुकाट पाहिलाच नव्हता. अख्ख्या डब्यात ३ टाळकी. दहा-सतराची ती बाकडी उगाचच प्रशस्त वाटत होती. दुसऱ्या दिवशी दहा-सतराला रोजच्या बघण्यातला ओळखीचा एक चेहरा गायब झालेला जाणवला. त्या चेहऱ्याचं 'identification' करून आलेल्या पोरींचा आक्रोश तिने ऐकला. या सगळ्याचं भांडवल appraisal साठी वापरणाऱ्या पत्रकाराचा 'तुम्हाला आता कसं वाटतंय' हा सवाल ऐकला. आणि 'कसलं आलंय बोडक्याचं स्पिरीट?' असं पोटातून आलेलं उत्तर ऐकलं. 'खूप खूप लक्त' पाहिलेल्या सोनूचा केविलवाणा चेहरा पाहिला.
आणि दुसऱ्या दिवशी दहा-सतरा पुन्हा भरली. पुन्हा चिवचिवाट सुरु झाला. पुन्हा भांडणं, पुन्हा खोड्या, पुन्हा कोपरखळ्या. एकच फरक होता. आता वयाच्या, स्तराच्या, पार्श्वभूमीच्या सगळ्या दऱ्या बुजल्या होत्या.
अशी दहा-सतरा ची गोष्ट. या एकांकिकेच्या तालमीचा प्रवास म्हणजे 'मंझील से बढकर लगने लगे है ये रास्ते' असा होता. सतत चर्चा, अभिप्राय, सुधारणा, तालमी. लोकलचा फील येण्यासाठी आम्ही एक दिवस मुंबईला जाऊन दिवसभर लोकल मध्ये हिंडलो होतो. 'त्या' दिवसाच्या news cover ची CD मिळवून पाहिली होती. रात्र रात्र जागून तालमी केल्या होत्या. आणि हे सगळं करताना प्रचंड मजा केली होती.
मला आठवतंय, निकाल जाहीर झाले तेव्हा आम्ही भरत नाट्यमंदिराच्या बाहेर होतो. electric वातावरण होतं. भावनातिरेक म्हणजे काय हे तेव्हा मला कळलं. अश्रू काहीही पत्ता लागू न देता नुसते ओघळत होते. दहा-सतराला संजीव करंडक (दुसरा नंबर) मिळाला होता. उत्तेजनार्थ लेखन आणि दिग्दर्शनाची बक्षिसे मिळाली होती. आणि मिळाला सर्वात खळबळजनक निर्णय ठरलेला केशवराव दाते. हा आम्हाला आनंदाचा धक्का असला तरी अनपेक्षित होता. दुसऱ्याच दिवशी त्याचं स्पष्टीकरण मिळालं. मला बाळ कर्वे यांचा वैयक्तिक फोन आला. परीक्षक त्रयीतील ते एक होते. त्यांनी मनापासून अभिनंदन केलं आणि म्हणाले, 'केशवराव दाते हा तुम्हा १३ जणींना विभागून देण्यात आलेला नाही. तो तुम्ही सर्वांनी मिळून उभ्या केलेल्या एकाच भूमिकेला मिळाला आहे. ती भूमिका म्हणजे 'दहा-सतरा'ची. तुम्ही सर्व दहा-सतरा या एकाच वस्त्राचे धागे आहात.' शब्दातीत क्षण!
परवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या सगळ्या इतिहासाची उजळणी झाली. माझ्या टीम ची खूप खूप आठवण आली. आता सगळे रोजच्या संपर्कात नाहीत. पण कधी भेटलो सगळ्या १७ जणी, तर दहा-सतरा पुन्हा जिवंत व्हायला वेळ लागणार नाही. आमेन.

No comments:
Post a Comment