नुकतेच भारतातून परतलो. रिवाजाप्रमाणे महिन्याची सुट्टी कशी संपली कळलं नाही. भारतातल्या दिवसांचे हायलाईट्स असे :
१. नातेवाईक आणि मित्र मंडळींच्या भेटीगाठी, गप्पा, चर्चा, भटकंती इ.
२. ड्रायव्हिंग शिकणे! (भुवया उंचावलेल्या लोकांना: हो आत्ता शिकले. काय म्हणणं आहे? :P शिकले न शेवटी? :)) या विषयावर १ वेगळा लेख होईल. किंबहुना सामान्य ड्रायव्हिंग, सामान्य बायकांचं ड्रायव्हिंग आणि त्यात माझं ड्रायव्हिंग यावर वेगवेगळे ३ लेख होतील :)
३. धपाधप दिसतील ते सिनेमे आणि नाटकं बघणे. (संधी मिळाली तर 'बेचकी' पहा. अप्रतिम नाटक!)
४. खरेदी (कपड्यांची / भाजीची / किराणा, मॉल मध्ये / दुकानांमध्ये / रस्त्यावर, bargaining करून / न करता इत्यादी.) मुंबईतली रस्त्यावरची खरेदी हा एक संशोधनाचा विषय होऊ शकतो. "थोडा भाव करो ना भय्या" चं पालुपद घोळवत घोळवत fashion street वर भटकायची गम्मत सगळ्यांना नाही कळत. विशेषतः नवरा जमातीला.
५. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, खा-खा! हो 'खा-खा' च. नुसतं खाणे म्हणलं तर आमच्या खाण्याच्या क्षमतेचा 'वडा' झाल्यासारखं वाटेल. याच विषयावर आजची post बेतलेली आहे हे चाणाक्ष वाचकांनी एव्हाना ओळखलं असेलच. :)
मी मागे कुठेतरी वाचलं होतं की, जेवणाच्या टेबलवर चाललेल्या विषयाचा तुम्हाला गंधही नसेल आणि कुठे तोंड लपवू असं वाटत असेल, तरी काळजी करू नका. कसातरी विषय खाण्यावर आणा. 'खाणे' हा जगात कुठेही बहुतेक लोकांचा आवडीचा विषय असतो. :)
असं असलं तरी उदरभरण म्हणून खाणारे, चवीने खाणारे आणि खाण्यावर प्रेम करणारे असे तीन प्रकारचे लोक दिसतात. मी नि:संशयपणे तिसऱ्या गटात मोडते. भारतातली खाद्य-पदार्थांची विविधता आणि हा तिसरा गट, हे एक deadly combination आहे. त्याचाच परिणाम म्हणून या सुट्टीत पोटात भस्म्या झाल्यासारखं खाल्लं. घरची पुरणपोळी (तुपात बुडवून) खाल्ली. सांगलीच्या कृष्णाकाठची भरल्या वांग्याची भाजी खाल्ली. अलिबाग च्या बीच वरचा रंगीबेरंगी बर्फाचा गोळा (ओल्या कपड्यानिशी) खाल्ला. दुर्गाची कोल्ड कॉफी, लेओपोल्ड कॅफे मधले कबाब, फोर्ट मधला जम्बो ग्लास उसाचा रस (आले, लिंबू टाकून mind u), केतकवळ्याच्या बालाजीचा प्रसादाचा लाडू, अमूलचं आंबा आइस क्रीम, बालगंधर्व रंगमंदीर मधला मध्यांतराचा बटाटेवडा (अहाहा!), आणखीही बरंच काही... आणि तरीपण wishlist मधल्या काही गोष्टी tick झाल्या नाहीतच. उदाहरणार्थ खरवस. आमच्या दूधवाल्याची एकही गाय महिन्याभरात व्यायली नाही! :(
जगात वेगवेगळ्या पाहण्या करून मोठ्या संस्था कसले कसले reports लिहितात. त्यात गुन्हेगारी, लोकसंख्या, रोगराई यांच्यात भारताचा आणि इतर देशांचा जगात कितवा क्रमांक लागतो ते शोधून काढतात. खाद्य पदार्थांच्या विविधतेत कुणाचा कितवा क्रमांक लागतो हे काही कुणी शोधत नाही. भारतावर हा केवढा अन्याय आहे! आपल्याकडे केल्या जाणाऱ्या फक्त चटण्या ची यादी देखील करता येणं अवघड आहे. एकट्या कमलाबाई ओगलेंना केवढ्यातरी चटण्या येतात! (पहा: रुचिरा पान क्र. ६२ ते ७१) ;)
आपल्याकडे सगळे समारंभ, उत्सव खाण्याला केंद्रस्थानी मानून! लग्न-मुंजी, डोहाळजेवण, बारसे, केळवण, सोयर, सूतक, अगदी वाढदिवस, get-togethers सुद्धा. लग्नात नवरा मुलगा कसा आहे यापेक्षा अळूची भाजी किंवा कुर्मा कसा होता हा प्रश्न महत्त्वाचा असतो. इतकंच काय, केवळ एखाद्या ठिकाणची एखाद्या विशेष पदार्थाची चव घेण्यासाठी वाट वाकडी करून त्या ठिकाणाला भेट देणारे, एखाद्या मंदिराचा प्रसाद चांगला असतो म्हणून दर्शनाला जाणारे रसिक खवय्ये आपल्याकडेच (म्हणजे आपणच :))
आपले सगळे सण सुद्धा एखाद्या हुषार इसमाने सोयीस्करपणे वेगवेगळ्या पदार्थांना जोडून टाकले आहेत. त्यामुळे संक्रांतीला गूळपोळी, गुढी पाडव्याला श्रीखंड, होळीला पुरणपोळी, गणपतीत मोदक, दिवाळीची तर स्वतःचीच वेगळी खाद्य संस्कृती, असा सगळा जामानिमा नसेल तर आपल्याला सण साजरा केल्यासारखंच वाटत नाही. ते काय कमी म्हणून ईदला शीरकुर्मा आणि ख्रिसमसला प्लमकेकही आपलाच.
बरं हे सगळं फक्त महाराष्ट्रात! बाकी इंदोर सारखं एखादं शहर वगैरे तर या एका लेखाला झेपण्यासारखं नाही! बाकी आपल्या शहरात असलेली हॉटेल्स उत्तर किंवा दक्षिण भारतीय म्हणून जे काही पदार्थ देतात तीच आपण त्या प्रदेशाची खाद्य संस्कृती समजतो. म्हणजे साउथ इंडिअन म्हणजे इडली, वडा, डोसा, उत्तपा आणि पंजाबी इज इक्वल टू बटर रोटी आणि पालक पनीर, व्हेज कढाई, नवरत्न कुर्मा इत्यादी इत्यादी. गुजराती म्हणलं की गोड कढी आणि खमण ढोकळा. बंगाली म्हणजे रोशोगुल्ला. अशी सगळी समीकरणं आपल्या डोक्यात पक्की असतात. पण या सगळ्या प्रदेशांचे स्पेशल असे खाद्य-कोपरे जाणून घेण्यासाठी तुमच्या शेजारी एखाद्या अय्यर काकू किंवा एखाद्या कमलाबेन असायला पाहिजेत आणि रोज डबा आणणारा एखादा पांडेजी किंवा जोयदीप सेनगुप्ता (मला अशी मोठठी मोठठी बंगाली नावं फार आवडतात) वगैरे नावाचा collegue असायला पाहिजे.
मासे, कोंबडी आणि इतर तत्सम जमाती याला मी हात घालत नाही. मी त्यातली फार दर्दी नाही. पण हे सगळं खात असताना निकटवर्तीयांच्या चेहऱ्यावरचा उत्कट वगैरे आनंद पाहून गळा दाटून येतो :P
अशी ही सगळी खाद्य सफर करून आल्यावर मला साहजिकच भूक लागली आहे. पण फ्रीज उघडायला जाण्याआधी एक प्रतिज्ञा. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या खाद्य परंपरांचा मला अभिमान आहे आणि त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी यासाठी मी सदैव प्रयत्न करेन :D
very nice :) .. majja aali wachun
ReplyDeletethankoo Gaya :)
Deleteनमस्कार मधुराणी,
ReplyDeleteआपली लेखकृती रुचली. एकदम खुसखुशीत झाली आहे.
आपला
(खानरसिक) प्रवासी
धन्यवाद प्रवासी! आपली प्रतिक्रिया वाचून आनंद वाटला.
ReplyDeleteबाकी आपली खानरसिकता आणि प्राजक्ताचे पाककौशल्य या दोन्हीची मला कल्पना आहे :)
There is no Food for Thought.
ReplyDeleteWe just think of Food 24x7
:D
DeleteMasta post.. Khuup majja aali vachun.. Almost asa watla ki you are telling the whole thing :)
ReplyDeleteKeep writing!!
Anagha thank you! :) tuzi comment vachun pan majja ali :D
ReplyDelete