गेले बरेच दिवस मी एक हरवलेली अवस्था शोधते आहे. तिला चपखल असा शब्द मला सापडत नाही. ‘फुरसत’ हा शब्द जवळ जातो, पण तरी तंतोतंत जुळत नाही. म्हणजे निवांतपणा. पण नुसता निवांतपणा नाही. तंद्री लावणारा. आजुबाजूच्या जगाचा विसर पडायला लावणारा. ध्यान (मेडिटेशन या अर्थी) नाही. त्यात विचारांना थोपवायचं असतं म्हणतात. इथे मनाच्या घोड्याला वारा पाजून बुंगाट दामटवायचं असतं. खिडकीबाहेर नजर लावून तोंड उघडं ठेवून हातातल्या गोष्टीशी चाळा करत बसून राहणारं, ते हे ध्यान! इथे नजर खिडकीबाहेर असली तरी दिसत काही वेगळंच असतं. परत जेव्हा आजूबाजूचं दिसू लागतं, तेव्हा आत्ता या क्षणी आपण काय करायला हवं याचे विचार सुरु होतात आणि असा विचार आला रे आला, की निवांतपणा समाप्त.
असे क्षण पूर्वी वारंवार यायचे. त्यावेळी ते इतके मौल्यवान असतात हे माहीत नव्हतं. ते कळलं असतं तर 'ए तंद्री!', 'मधेSS, लक्ष्य कुठे आहे?', 'अबसेन्ट माईंडेड' किंवा तत्सम संबोधनांकडे मी जाणून बुजून दुर्लक्ष्य केलं असतं. (दुर्लक्ष्य आपोआप व्हायचं ही गोष्ट वेगळी.) अशा निवांतपणात निवांत बुचकळी मारून आलं की अंघोळ करून आल्यावर वाटतं त्यापेक्षा ताजं वाटतं. मेंदू रिस्टार्ट झाल्यासारखं. कानात बसेलला दडा सुटला की कसं एकदम स्वच्छ ऐकू येऊ लागतं, तसं काहीतरी.
असे क्षण पूर्वी यायचे आणि आता येत नाहीत याची कारणं सरळ आहेत. पहिलं म्हणजे पूर्वी आपल्याला आनंद , दुःख, संताप यांच्याबरोबर कंटाळा नावाची भावनाही होती. म्हणजे करायला काहीच नसणं. असं झालं की विचारांचा निचरा सुरु होत असे. हल्ली म्हणजे, कंटाळ्याच्या हद्दीत जायच्या आतच टीव्ही, लॅपटाॅप किंवा फोन अलगद झेलतात. श्रवण, मनन, चिंतन यांपैकी फक्त श्रवण म्हणजे माहितीचं संकलन तेवढं होत राहतं. त्या फाइल्स परत चाळून, नको ते टाकून देणं, योग्य त्या फोल्डरमध्ये विभागून जतन करणं इ. झालं नाही, तर त्या माहितीचं पुढे काहीच होत नाही. नुसतंच इकडून तिकडे गेले वारे. पूर्वी काही नाही तरी त्या (घरात नाही आणि परसातही नाही, खोली आहे पण रुंदी नाही अशा त्या (_/\_ पु ल)) विशेष ठिकाणी तरी हे व्हायचं. तुम्हाला सुचलेल्या सगळ्या उत्तम कल्पना तिथेच का सुचल्या सांगा पाहू! पण आता तिथेही फोनची सोबत असते.
दुसरं कारण म्हणजे कार्यक्षमता वाढविण्याचा हव्यास. हो हव्यासच. एका दिवसात सगळंच साध्य करायचं. जरा निवांत बसावं असा विचार मनात आला की लग्गेच इतर अनेक विचारांचा ‘कार्यक्षमता वाढवा’ मोर्चा त्याला हाणून पाडतो. अचानक घरातला कचरा दिसू लागतो. स्वैपाकघरातला किंवा कपड्यांच्या कपाटातला एखादा कप्पा बऱ्याच दिवसांपासून विस्कटलाय तो आठवतो. ऑफिस मधल्या कामाचा १०१वा टक्का द्यायचा राहिलेला असतो. कॉलेज मध्ये ऑप्शनला टाकला नसता तर कल्याण झालं असतं असा एखादा विषय वाचायचा असतो. मुलांना quality time का काय म्हणतात तो द्यायचा असतो. व्यायाम तर नेहमी todo list मध्ये वरचा नंबर पटकावून ठाण मांडून बसलेला असतो. नेटफ्लिक्स वरचा बॅकलॉग भरून काढायचा असतो. एखादी उत्साहानी सुरु केलेली कादंबरी वाचून संपवायची असते. एखादी सुचलेली कल्पना लिहून काढायची असते. या सगळ्या मारुतीच्या शेपटीचा गोंडा काही हातात येत नाही. प्राधान्यक्रम ठरवण्याच्या नादात निवांतपणातला निवांतपणाच निसटून जातो. याला उपाय म्हणून एखाद्या relaxing vacation ची आखणी होते. पण तिथेही लहानपणापासून जतन केलेला मध्यमवर्गीय बाणा डोकं वर काढून म्हणतो, "आता एवढ्या दूर आलोय, तर हेही पाहून घेऊ, तीन तासांवरच तर आहे". तसंही लहान मुलं सोबत असतील तर relaxing vacation वगैरे सगळ्या अंधश्रद्धाच असतात.
बाबा म्हणतात, तुमच्या पिढीचे हे असले प्रॉब्लेम्स (?) तुम्हीच निर्माण आणि मोठे केलेले आहेत. खरंच आहे ते. तंत्रज्ञानाने सगळं सोप्पं केलंय, पण साधेपणा मात्र हरवलाय. म्हणूनच पुन्हा शोधायची आहे मला 'फुरसत'. उद्या स्वच्छता करण्यासाठी राखलेल्या वेळात, मी फोन घरी ठेऊन फिरायला जाणार आहे. बघूया सापडते का.
Good
ReplyDeleteThank you 😊
DeleteVery well written. Glad to have found your blog serendipitously.
ReplyDeleteThank you 😊
DeleteNakki sapdel. 2-4 kilo gheun thev, malahi hawiye thodi...
ReplyDelete😂😂
DeleteWow, Madhu awesome :), Regards Amol
ReplyDelete😀 thank you Amol!
Delete