Sunday, February 18, 2018

एका जेवणाची गोष्ट

काल रात्री एका देशी रेस्टाॅरंटात जेवायला गेलो. आम्ही आणि माझ्या चुलतभावाचं कुटुंब. पोराबाळांचं लटांबर घेउन. लटांबर म्हणजे खरंतर माझी एक आणि त्याची एक. पण दोघी मिळून इतका छळ मांडतात, की एखाद्या खऱ्या लटांबराला लाजवतील. रेस्टाॅरंट मध्ये पोरांना घेउन गेल्यावर काय गमती होतात ते पक्कं माहीत असूनही आम्ही पुन्हा पुन्हा आगीशी खेळायला जातो. आपण हार मानत नाही. किमान हॉटेलमध्ये पोहचेपर्यंत तरी. 

मॅंगो लस्सी आणि चिकनची वचनं दिल्यावर सुरूवात तर शांततेत झाली. खेळपट्टी आश्वासक वाटत होती. आम्ही आयांनी चतुरपणे दोघींना एकमेकींच्या शेजारी बसून दिले नाही. या आधी टेबलची दाणादाण झाल्याचा अनुभव ताजाच होता. त्यामुळे ही खेळी कामी येत होती. पण त्यामुळे लौकरच कंटाळा आला आणि त्याच्या निवारणासाठी आयांच्या पर्सेस मधून काहीबाही खेळणी, क्लीपा, वॅसेलीनच्या डब्या, basically हाताला लागेल ते बाहेर पडू लागलं. तेवढ्यात मँगो लस्सीही आली. मँगो लस्सी हा हॉटेलमध्ये जेवू इच्छिणाऱ्या लेकुरवाळ्या नव - आई बाबांसाठी केवढा मोठा आधार आहे हे त्या आई बाबांना आणि त्यांच्या लस्सीच्या किमतीतच मार्जिन काढणाऱ्या त्या हॉटेल मालकांनाच ठाऊक. मँगो लस्सी एकटीच आधी आल्यामुळे 'आधी मम्मम आणि मग लस्सी' वगैरे शस्त्र म्यानातच ठेवावी लागली. पण तिच्यामुळे निदान आता तहाची लक्षणं दिसू लागली होती. त्यामुळे लस्सीपानात अडथळा आला नाही. 

एकूण छान चाललं होतं. आत्तापर्यंत कुठेही काहीही सांडलं / पडलं / उडालं नव्हतं. वाईप्स पर्समधून बाहेर काढावे लागले नव्हते. (आई झाल्यावर सगळं बदलतं म्हणतात ते किती खरं आहे! आकाशाला गवसणी वगैरे घालायची स्वप्न मी आधीही पहिली नव्हती, पण गेलाबाजार चांगली नोकरी, घर, सुंदर ठिकाणी सहली वगैरे आमची स्वप्न. आई झाल्यावर माझं एकच स्वप्न आहे - वाईप्सचा अमर्यादित पुरवठा. त्या द्रौपदीच्या थाळीसारखा. एका वाईप्स च्या खोक्यातून वाईप्स येत राहावेत, येत राहावेत, संपूच नयेत! अहाहा!) 

पण मँगो लस्सी संपत आली तरी जेवण आलं नव्हतं. त्यामुळे कंटाळ्याने परत ताबा घेतला. आता पर्समधल्या खेळायला देता येण्यासारख्या गोष्टीही संपल्या होत्या. रावीला एक कागद दिसला आणि चित्र काढायची अनावर इच्छा झाली. खडू नव्हतेच. एखादं पेनही कुणाकडे मिळेना. अशा वेळी रडू टपून बसलेलंच असतं. कुठे कशी संधी मिळतेय, याची वाट बघत. ते टपकलं. एकदा रडू आलं, की रावीला आयुष्यात ज्या सगळ्या गोष्टी तिच्या मनासारख्या होत नाहीयेत त्या सगळ्यांची एकामागून एक आठवण येऊ लागते. मग रडू रडू न राहता कधी त्याचं भोकाड होतं, कळतही नाही. एके दिवशी लौकर आवरत नाही म्हणून बाबा कसा रागावला होता, एकदा कार्टून चालू असताना आईने कसा टीव्ही बंद केला होता, शाळेतल्या अँड्रूने कसा तिला चिमटा काढला होता ते सगळं आठवलं. आणि मग शाळेवरून तिला तिचं जालीम अस्त्र आठवलं. आधीच्या सगळ्या तक्रारींना आई बाबांकडे उत्तरं होती किंवा उत्तरं तयार करता येत होती. पण हे लेटेस्ट अस्त्र निरुत्तरित करणारं आहे. 'मला आत्ताच्या आत्ता बेबी सिस्टर पाहिजे'. शाळेतल्या मैत्रिणीला बहीण झाल्यापासून याचा शोध लागला आहे. 'आपण आत्ताच्या आत्ता हॉस्पिटल मध्ये जाऊन डॉक्टरांकडून बेबी सिस्टर आणूया'. हॉस्पिटल मध्ये खेळण्यांच्या दुकानासारखी बाळं डिस्प्लेमध्ये ठेवलेली असतात अशी तिची समजूत आहे. म्हणजे बेसिकली बायका खा खा खातात, मग त्यांचं पोट खूप मोठं होतं, आणि दुखायला लागतं. मग त्यांना डॉक्टरांकडे जायला लागतं. आणि रावीला जसे इंजेक्शन घेतल्यावर डॉक्टर स्टिकर देतात, तसं बायकांना एक बेबी देतात असं काहीतरी तिच्या डोक्यात असावं. मला एकदा तिच्या डोक्याच्या या विभागात हात घालायचा आहे. असो. 

असा हा सगळा बेबी राडा चालू असतानाच माझ्या भावाला आठवलं की त्याच्या गाडीत तेलीखडू आहेत. त्याच्या गाडीच्या डिक्कीत रावीला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी प्रकट होतात. मला वाटतं, तो आणि त्याची बायको त्यांच्या मुलीबरोबरच रावीला काय लागू शकेल याचाही विचार करून बाहेर पडतात. त्यामुळे पळत जाऊन खडू आणण्यात आले. जेवण आणि खडू एकत्रच आले. त्यामुळे मम्मम आणि चित्र हातात हात घालून पूर्ण झालं. पण पोट भरलं आणि चित्र काढून झालं. पण मोठे लोक अजून जेवतच होते. मग परत टिवल्या बावल्या सुरु झाल्या. पलीकडे वाहिनीने नुकतेच पराजयाचे पांढरे निशाण फडकावले होते. मुलीच्या हातात फोन गेला होता. ते पाहून आम्हीही आमची विजयाची तुतारी बंद केली आणि फोनवर पेपा पिग चालू केलं. मग मोठ्यांची जेवणंही विनासायास पार पडली. नव-पालकांच्या रुलबुकप्रमाणे ज्याचं जेवण आधी होईल त्याने मुलांना खेळायला बाहेर घेऊन जायचं असतं. काल ते भाग्य मला लाभलं. मग बाहेर लपाछपी, पकडापकडी, टाळ्यांचे खेळ (म्हणजे 'आओ मीना सिबा बिना' असलं काहीतरी निरर्थक गाणं म्हणत आपण लहानपणी जे खेळायचो ते) हे सगळं झालं. मग बाकीचे सगळे बाहेर आल्यावर साखरेच्या बडीशेपेचे बकाणे भरून झाले. आता डोळ्यावर झोप यायला लागली होती, तरी अजून खेळायचं होतं. लहान मुलींच्या रुलबुकप्रमाणे घरी जायच्या आधी, सोबत असलेल्या मैत्रिणीच्या / बहिणीच्या घरी जायचा किंवा तिला आपल्या घरी घेऊन जाण्याचा हट्ट करायचा असतो. तेही यथासांग पार पडलं. मग परत छोटंसं निरोपाचं रडू झालं. 

गाडी हॉटेलच्या आवारातून बाहेर पडता पडताच मागे कारसीटवरून घोरण्याचा आवाज येऊ लागला!

तळटीप: फोटो आणि हा किस्सा यांचा तसा काही संबंध नाही. ते विजयी हास्य सोडले तर. 

8 comments:

  1. Wow! So apt. He baghun dilasa milala ki ya yudhat amhi ekte nahi ahot. Pu La ni mhanlela ki tyancha shankrya "baithya satyagraha" la basaycha. Hallichi karti, jhoptya satyagrahala bastat asa me mhanin :-)

    ReplyDelete
    Replies
    1. Haha true! Baitha, zopta, radta, oradta sagle satyagraha, asahakar chalu astat daily 😂

      Delete
  2. Can't agree more to each n everything you've written there.

    ReplyDelete
    Replies
    1. 😆😆 I am also feeling relieved that people are with me in this!

      Delete