मज्जा जेव्हा छोटी होती तेव्हा किती मस्त होती
इवल्याश्या बुडबुड्यात निर्व्याज व्यस्त होती
हसरी, सालस, आनंदी, हाडाची भिडस्त होती
देणं तिचं भरभरून, मागणी मात्र स्वस्त होती
नकळत होई तिची माझी अनेकदा भेट
बोलावल्याचं आठवत नाही कधी तिला थेट
इतर भावांत मिसळायची धुंद लकेरी घेत
सुख द्यायची, होतं तिचं आनंदाचं शेत
सणवाराची आठवते ती सजलेली सुंदर
भावंडांच्या घोळक्यामध्ये नेहमीच ही हजर
बागेमध्ये झोका घ्यायला यायचीच बरोबर
नाही कुठले आढे वेढे, नाही जर - तर
घरी तर ती सारखीच येऊन जाऊन असायची
ताईचं गाणं ऐकताच हमखास टपकायची
आज्जीची गोष्ट तिला खूप खूप आवडायची
आईने शिरा केला, की मनोमन हरखायची
कधी कुणास ठाऊक, पण झालं असेल हळूहळू
मोठं झालं जग माझं, लागलं जास्त कळू
मज्जादेखिल फुगली, लागली सतत छळू
तिच्यामागे धापा टाकत दिवस लागले पळू
येईल का ती वाढवला जर एखाद स्क्वेअर फूट?
येईल का जर विकत घेतला मखमलीचा बूट?
वाळूसारखी निसटत होती घट्ट होती मूठ
पैसा, कीर्ती, गाडी-माडी ठरवत सारं झूठ!
कधीतरी तिने जरी दिलं अंधूक दर्शन
आमच्यामध्ये होतं एक साहजिकच घर्षण
मला होतं आणखी मोठ्या मजेचं आकर्षण
"बघ!" म्हणलं मी तिला फेसबुकचं प्रदर्शन
एके दिवशी बागेमध्ये दिसली एक धिटुकली
तिच्याबरोबर विहरत होती तिची मजा चिमुकली
तिला पाहता आगळीक माझी चटकन मला उमगली
घटनांची श्रुंखलाच माझ्या डोळ्यांपुढे चमकली
तिच्या नव्हे तर माझ्याभवती होता तो बुडबुडा
दूर दूर ती जात होती, वाढे त्याचा वेढा
फुटला तेव्हा पडला खोट्या अपेक्षांचा सडा
त्याक्षणी ती पुन्हा बिलगली दाटलेल्या गळा!
व्वा..किती सुरेख लिहिलं आहेस. सगळ्यांच्याच हातून अशी चिमुकली मज्जा कुठे निसटून गेली कळलच नाही..खूप भावली.
ReplyDeleteThank you 😊
Deleteमधू, खूपच सुंदर लिहिलंस गं, खरंय, नकळत कधी आपण आपलं बालपण हरवून बसतो ते समजत सुद्धा नाही. तुझ्या सुंदर शब्दांतली गुंफण मंत्रमुग्ध करणारी आहे. अप्रतिम.
ReplyDeleteथॅंक्यू गं 😀🙏
Delete