पहाटे साडेचारला रेखाचा गजर होई. नवरा आणि पार्थ उठू नयेत म्हणून एकाच रिंगमध्ये ती चटकन गजर बंद करून मच्छरदाणीच्या बाहेर येई. पार्थचा हमखास बाहेर आलेला हात अलगद आत सरकवून मच्छरदाणी पुन्हा खोचून सारखी करून ती आवरायला लागे. स्वैपाकघरात येऊन पहिल्यांदा ती फ्रिजवरच्या रेडिओचं बटण फिरवत असे. मग पुढचा एक तास आर जे महेशचा खर्जातला आवाज, जुनी रसाळ हिंदी गाणी आणि तिचं स्वैपाकघरातलं नादमय जग. रेडिओचा आवाज फार मोठा न करताही नीट ऐकू यावा म्हणून ती पंखाही लावत नसे. एवढ्या पहाटेही उष्ण चिकट हवा आणि समोर तापलेला तवा असला तरी.
त्या गाण्यांच्या मधुर आवाजात हरवून जाऊन रेखा झपाट्यानं कामं हातावेगळी करू लागे. एखाद्या बॅले नृत्यांगनेसारखं तिचं लाटणं पोळपाटावर नजाकतीनं अलगद लहरू लागे. पोळ्यांवर पोळ्या पडत रहात. फोडणीतल्या मोहऱ्याही तालात तडतडल्यासारख्या भासत. त्यात भाजी पडली की मात्र थोड्या वेळासाठी ते नादमय जग विचलित होई. समेवरची टाळी चुकल्यासारखं. मग रेखा घाईघाईनं भाजी परतून कढईवर झाकण ठेऊन भाजीचा आवाज बंद करून टाके. मग पुन्हा एकदा ते स्वैपाकघर गाण्यांच्या लयीत तरंगू लागे. शेवटची पोळी पोळपाटावर आपटायला आणि आर जे शलाकाच्या 'गुड मॉर्निंग मुंबई'ला एकच गाठ पडत असे. सकाळी ६ चा हा ठोका.
मग रेखाचा रेडिओ बंद होई. आल्याच्या चहाची धार शांततेचा भंग करत गाळणीतून कपात पडे. मग पंखा पूर्ण पाचावर सुरु होई. तेव्हा कुठे तिला आपण घामात निथळतोय याची जाणीव होई. मग पुढची दहा मिनिटं चहा, खिडकीतून दिसणारं फटफटू लागलेलं चिंटूसं आभाळ आणि पंख्याच्या भरारा वाऱ्यात थंड होत जाणारं मन आणि शरीर. मच्छरदाणीतून बाहेर पडून पुन्हा मच्छरदाणीत शिरेपर्यंच्या अख्ख्या लांब दिवसातली 'तिची' अशी ही दहा मिनिटं. एकदा चहाचा कप रिकामा झाला की दिवसाचा रहाट पूर्ण वेगात फिरू लागे. रेखाचा हा गेल्या अनेक वर्षांचा क्रम.
एकदा चहाचा पहिला घोट घेतानाच तिला समोरच्या बिल्डिंगमधली तिच्या समोरची खिडकी उघडताना दिसली. तिथे तिने आजपर्यंत कधीही कुणाला पाहिलं नव्हतं. खिडकीत तिच्यासारखीच एक बाई तिच्यासारखाच चहाचा कप हातात घेऊन उभी होती. तिच्यासारखाच गाऊन घालून. तिच्याचकडे बघत होती. जणू तिची आरशातली प्रतिमाच. रेखाला मजा वाटली. तिनं मनातल्या मनात तिला 'प्रतिमा' असं नाव देऊन टाकलं. छान शोभत होतं तिला ते नाव. तेवढ्यात प्रतिमानं कप खाली ठेऊन शेगडी सुरु केली आणि तवा ठेवला. तिच्या पोळ्या सुरु झाल्या. रेखानंतर दीड तासांनी. एक किंचित असूयेची छटा रेखाच्या मनात उठली.
मग हे रुटीनच झालं. डबे भरत असताना रेखाचं लक्ष समोरच्या खिडकीत असे. प्रतिमाचा स्वैपाक सुरु असे. तिच्या हालचालीत कुठलीही घाई, दगदग, लोकल पकडायचे वेध नसत. तिला असं शांत पाहताना रेखाच्या त्या दहा मिनिटातली शांतताही पोखरून जात असे. कधी नव्हे ते गजर बंद करताना तिला त्रास होऊ लागला होता. त्या दीड तासाच्या झोपेअभावी चरफड होऊ लागली होती. घरी येताना कधी चौथी सीट मिळाली तरी ट्रेनमध्येच भाजी निवडून घ्यायचा तिचा आटापिटा चाले. मग साडेचारचा गजर पावणेपाचावर ढकलता येत असे.
एके दिवशी तर समोरची खिडकी उघडलेली जवळजवळ घर सोडताना तिला दिसली. म्हणजे सात वाजता! मानेला हिसका देऊन फणकाऱ्यानंच रेखाने खिडकी बंद केली. संध्याकाळी घरी आल्यावर तिला बिल्डिंगमध्ये एकीकडे हळदीकुंकवाला जायचं होतं. तिथे पोचताच समोरच तिला प्रतिमा दिसली. प्रतिमाने हलकंसं हसून ओळख दाखवण्याचा प्रयत्न केला. पण रेखाने मान वळवली. 'आज अजून बरी साडी घालायला हवी होती'. रेखाचं मन त्या दीड तासाच्या झोपेची भरपाई शोधत होतं. प्रतिमा घोळक्यात गप्पांमध्ये गुंतली. रेखाच्या कानावर तिचं बोलणं पडत होतं. 'आज सकाळी घरी येताना ट्रेन बंद पडली. घरी यायला जवळजवळ एक तास उशीर झाला. वैताग.' प्रतिमा नर्स होती. नाईट शिफ्ट करून घरी आल्यावरचा तिचा तो चहा!
दुसऱ्या दिवशी बऱ्याच दिवसांनी रेखाला गजर बंद करताना त्रास नाही झाला.
- मधुराणी
७.२.२०२१
No comments:
Post a Comment