मला असं नेहमी वाटतं की, कापडाचे कपडे होतात, तेव्हा त्याला आकार येतो आणि त्यात माणसं वावरू लागतात, तेव्हा त्यात जीवही येऊ लागतो. त्याशिवाय वापरून विटलेल्या, जीर्ण झालेल्या कुडत्यात जीव अडकला नसता. सहवासानं माणसाचं व्यक्तिमत्वही त्यात पाझरत जातं. आजूबाजूच्या परिसराची लक्षणं त्यात जाणवू लागतात.
म्हणजे, आजीच्या साडीचा स्पर्श तिच्या हातांच्या स्पर्शासारखा जाणवतो. मखमली नसला तरी मऊ, उबदार!
बाळाचं दुपटं, त्याच्याच बोळक्यासारखं. कुणासाठी नकोशा वासाचं, पण आईसाठी चंदनाहून सुगंधी!
पोळ्यांच्या सावित्री काकूंची साडी, त्यांच्या स्वाभिमानासारखी. ठिगळ लावून मजबूत झालेली.
दुकानात टांगलेला टॉप, दुकानातल्या पुतळ्यांसारखा. सुंदर, पण निर्जीव.
आजोबांचा जुना खादीचा शर्ट, त्यांच्या व्यक्तिमत्वासारखा. एकेकाळचा रुबाब गमावलेला, पण अजूनही कडक. शुभ्र.
बाबांची लुंगी, त्यांच्या मनासारखी. अघळ-पघळ. मापे न काढता कुणालाही सामावून घेणारी.
आईची ठेवणीतली साडी, तिच्या लाजेसारखी. कधीतरीच दिसणारी, पण इतकी मोहक की कुणीही प्रेमात पडावं.
आणि देवपूजेचा रुमाल, पूजेच्या फुलांसारखा. एकच मांगल्याचा वास असलेला. देवाच्या स्पर्शाने देवपण लाभलेला!
Masta
ReplyDeletedhanyavad!
DeleteKhup khup chaan....VRUdaysparshi
ReplyDeleteVachun ANAND zala :)
Delete