भारतीयांच्या सामाजिक कार्यक्रमांमध्ये सामान्यतः खादाडी हे मुख्य सूत्र असते. बाकी सणवार, लग्न-मुंजी-बारशी, वाढदिवस वगैरे निमित्त. एकत्र जमून खा-खा करण्याचं. आम्ही जर्मनी मध्ये असताना, अशा सोशल गॅदरिंग मध्ये सगळे घरून काहीतरी करून आणत आणि सगळे मिळून आम्ही त्यावर तुटून पडत असू. तोंडी लावायला गप्पा. मग शेवटी उरलेल्या पदार्थांचं वाटप होत असे.
सांगायची गोष्ट अशी, की अशा एका गॅदरिंग नंतर एका मैत्रिणीचा लाल रंगाचा, झाकण अटॅच असलेला प्लास्टिकचा सुंदर डबा माझ्याकडे गुलाबजाम भरून आला. गुलाबजाम तर अप्रतिम झालेच होते, पण तो डबाही मला खूप आवडला होता. ती मैत्रीण त्यानंतर दुसऱ्या शहरात शिफ्ट झाली आणि आम्हीही अमेरिकेत आलो. त्यामुळे तो डबा माझ्याकडेच राहिला. काही दिवसांपूर्वी कर्मधर्मसंयोगाने ती मैत्रीणही अमेरिकेत आली आणि तेही आमच्याच शहरात. मग तब्बल पाचेक वर्षांनी आमचा पुन्हा एकदा खादाडीचा कार्यक्रम झाला. तेव्हा मी तो डबा प्रामाणिकपणे तिला परत दिला. तो बघून ती वरवर 'अय्या मी कधीच विसरले होते' असं म्हणली, तरी डबा परत मिळाल्याचा आनंद मला तिच्या डोळ्यात दिसत होता. आणि मी तो समजू शकत होते.
हे डबे प्रेम माझ्यात पूर्वी नव्हतं खरं तर. हार्मोनल बदल असावा. (कुठल्याही कारण न देता येणाऱ्या बदलाला मी या हार्मोनल बदल या कॅटेगरीत टाकते. उदा. मुलं खिल्ली उडवायच्या वयाची झाली की पुरुषांना अचानक पाचकळ विनोद करण्याची वारंवार इच्छा होते किंवा काही केसेस मध्ये इच्छा प्रबळ होते / पाचकळता वाढते - हार्मोनल बदल. मुलं भिंतीवर चित्र काढण्याच्या वयाची झाली की अचानक बायकांना स्वच्छतेची आवड निर्माण होते - हार्मोनल बदल. असो.) पूर्वी इतर मैत्रिणी, काकवा (काकूचं अनेकवचन काय आहे बुवा?), मावश्या वगैरेंना डब्यांबद्दल आस्थेनं बोलताना ऐकून मला बुचकळ्यात पडायला होत असे. डब्यापेक्षा त्याच्या आत काय आहे हे मला जास्त महत्वाचं वाटत असे. पण एवढी आमटी अमक्या डब्यात मावेल का, असले अंदाज जसजसे सुधारत जातात, तसतसे गृहिणीमधले गृहिणीपण व्रुद्धिंगत होत जाते. बरेचदा गृहिणीसकट. त्याच वाटेवर कधीतरी या डबेप्रेमाची लागण होते. पुड्यांमधलं सामान बरण्यांमध्ये हलतं. वेगवेगळं किराणा सामान भरून कपाटात रचून ठेवलेले एकसारखे पारदर्शक डबे.. त्यातलं सौंदर्य दिसू लागतं.
पूर्वी डबे फक्त स्टीलचे होते. प्लॅस्टीकचा जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी शिरकाव होण्याआधी. हे डबे मध्यमवर्गीय वाटायचे. उगाच भपका नसलेले, नेटके. पोटात काय आहे ते झाकल्या मुठीसारखं लपवून ठेवणारे. त्यांची झाकणं मात्र अगदीच दगाबाज असायची. एकतर उघडायची नाहीत पटकन. मग ते डबे टेबलवर आपटा, नखांना त्रास देत त्यांच्याशी झटापटी करा.. असं सगळं रीतसर झालं की मगच ती बधत असत. असल्या एखाद्या लढाईनंतर एखादं झाकण रूसून तोंड फाकवून बसत असे. अशा डब्यांची उघडझाप पार देवाचं नाव घेऊन करावी लागत असे. आणि तरीही ते गुण्यागोविंदाने वर्षानुवर्षं फडताळात नांदत असत. शाळेचे डबेही तेव्हा स्टीलचे होते, २ मजल्यांचे किंवा २ कप्प्यांचे. हमखास दप्तरात गळणारे.
डब्यांच्या क्षेत्रात मग टपरवेअर क्रांती झाली. घराघरांत रंगीबेरंगी हवाबंद एकातले एक वगैरे टपरचे डबेच डबे झाले. ५ पैकी ४ घरांत टपरचे डबेच डबे आणि ५ पैकी २ घरांत टपरच्या एजन्स्या बोकाळल्या. हे डबे कितीही फॅन्सी असले तरीही मला ते फार आवडले नाहीत. कारण ते त्यांच्या आत ठेवलेल्या पदार्थाला उदारपणे त्यांचा वास देतात. भले कितीही चविष्ट पदार्थ असेल, या वासाने त्याचा विचका झालाच म्हणून समजा. मग याला पर्याय म्हणून काचेचे डबे. पण घरात १० वर्षाखालील माणसे (किंवा त्यावरील वेंधळट माणसे) असतील, तर काचेचे डबे, भांडी शोकेसमध्येच कायम मुक्काम ठोकून. त्यांच्या योग्यतेचे पाहुणे जेवायला कधी येतील, त्याची वाट पहात.
असं डबा विश्लेषण करायला दर्दी डबेप्रेमी असावं लागतं. मी अजून wannabe आहे. खऱ्या डबेप्रेमीला, समाज (नवरे) या डबेप्रेमाच्या कट्टर असला तरीही ते जिवंत ठेवता आलं पाहिजे. उदा. खरेदीला गेल्यावर नवीन डब्यांनी खुणावलं पाहिजे. ते डबे घरातल्या डब्यांपेक्षा कसे वेगळे आणि उपयुक्त आहेत याचं, आधी स्वत:ला आणि मग इतरांना जस्टीफिकेशन देता आलं पाहिजे. स्वैपाकघरातल्या सगळ्या कपाटांमधल्या / फ्रीजमधल्या बहुसंख्य कप्प्यांमध्ये डबे नांदले पाहिजेत, त्यांची झाकणं वेळच्या वेळी मिळाली पाहिजेत. हरेक डब्याचा इतिहास भूगोल लक्ष्यात असला पाहिजे. कुणाकुणाच्या घरी आपले कुठले डबे काय भरून गेले आहेत, त्याचा हिशोब तोंडावर असला पाहिजे.
डब्याचं काय एवढं कौतुक? असा प्रश्न reasonable आहे. कल्पना करा, भल्या सकाळी एखाद्या लांबच्या प्रवासाला जाताना तुमच्या आईने तुम्हाला स्टीलचा चपटा डबा दिलाय. बस / ट्रेन मध्ये बसून तुम्ही डबा बॅगेतून बाहेर काढता. त्याचा तळ अजूनही गरम लागतोय. पोटात कावळे ओरडतायत. तुम्ही घाईने डब्याचं झाकण उघडता. झाकणाच्या आतल्या बाजूला वाफेचं झालेलं पाणी थेंबाने गळतं. डब्यातून वाफ एकदम मोकळी होते. नाक वासाने खवळतं. डब्यात खोबरं कोथिंबीर पेरलेले बटाटा पोहे आहेत. एक घास खाऊन तुमची ब्रम्हानंदी टाळी लागते.
आता मला सांगा, अशा सगळ्या सेन्सरी एक्सपीरियन्स मधून त्या नम्र डब्याला कसं बरं वेगळं करता येईल?
ता. क. : गृहकृत्यदक्षतेचे सारे गुण मी पुरुषांमध्येही पहिले आहेत. पण हे डबेप्रेम आजपर्यंत फक्त बायकांमध्येच पहिले आहे. म्हणून हे शीर्षक. कुणी असेल अपवाद, तर मी आनंदाने ताबडतोब शीर्षक बदलेन ;)
Hahaha!! zakkas!! Tuze sagalech blogs atishay chokh ani purnataha patnare astat!! ani vachtannaa relaisation ni khadkhadun hasayalahi yeta ... khupach bhari!!
ReplyDeleteHaha thank you very much! 😀
DeleteMast lihilay. Junya aathavani. Shaalet pan steel che dabbe gheun jaaycho, mag tyachi jaga Tupperware ne ghetli. Aani halli tar steel che dabbe jase kaahi lupt zale.
ReplyDeleteI know! I miss shalecha steelcha daba!
DeleteAmazing :-), risky relatable. mi hi tuzyach ranget pudhe maage ahe kuthe Tari :-)
ReplyDeleteHaha thanks ga!
DeleteI meant, totally relatable ;-)
ReplyDelete