अजून अगदी होतीस तश्शीच आहेस तू! वरवर बदल झाले असतील थोडेफार, पण तीच आहेस अजून. २ वर्षांनी भेटलो आपण. रोजचा संपर्क सुटून तर आठेक वर्ष झाली. आज एवढी वर्षं झाली तरी तुझी आठवण व्याकूळ करते. माझा एक तुकडा ठेऊन घेतलायस तू. माझ्या मी असण्यातही तुझा अंश आहे.
आज इतक्या वर्षांनंतरही पहिल्या भेटीत वाईट इंप्रेशन द्यायची तुझी खोड अजून टिकून आहे! तसं लव्ह अॅट फर्स्ट साईट वगैरे भाकडच वाटायचं तुला नेहमी. ‘प्रेम ही आधाशीपणे तोंडात टाकण्याची नाही, तर लोणच्यासारखं मुरवून चवीनं चाखायची गोष्ट आहे’ हाच विश्वास. त्यामुळे कुणावर पहिली छाप पाडायच्या फंदात पडली नाहीस तू कधी. उलट एखाद्या नवख्याला आपला चढता पारा दाखवून बसल्या जागी घाम फुटवण्याचीच शक्यता जास्त. मलाही अगदी असंच केलं होतंस. तुझ्या वाटेला जायचंच नाही फार गरजेशिवाय असं ठरवून टाकलं होतं मी. पण हळूहळू लक्ष्य नाहीसं पाहून भुरळ घातलीसच तू. जादूटोणा येतो का गं तुला? प्रेम बसत गेलं तुझ्यावर. आपला सहवास जसजसा वाढत गेला, तसतसा तुझा एकेक पापुद्रा उलगडत गेला. तुझं आभाळाएवढं मन समोरच्याला अगदी खुजं करून टाकतं. तुझ्या छायेत आलेल्या कुणालाच उपाशी झोपून देत नाहीस. ‘मेहनत करण्याची तयारी’ या एकाच गुणावर तोलतेस प्रत्येकाला!
वरवर सुंदर मुखवटा मिरवणारे असतात बरेच. पण तुझं सगळं आरपार! जसा ऐटीत तुझा राणीहार मिरवतेस, तशाच तुझ्या शरीरावरच्या पाशवी खुणा, तसंच नेसूचं लक्तर! अजून तसंच सगळं. तुझ्या अनुभवांची पोतडी थोडी अजून फुगलेली दिसत्ये, हाच काय तो बदल.
माझी मुंबई! अजून अगदी होतीस तश्शीच आहेस तू!
No comments:
Post a Comment