महाराष्ट्रीय अनिवासी भारतीयांसाठी जून-जुलै ही भारतवारीसाठी सर्वोत्तम वेळ आहे हे मी आज घोषित करते. डिसेंबर मध्ये ५-७ लग्ने अटेंड करता येत असली तरी. मान्सून यावेळेस आम्हाला तब्बल ८-९ वर्षांनी अनुभवता आला. पावसाळा हा भारतीय जीवनशैलीचा इतका महत्त्वाचा घटक आहे! त्याच्या आठवणींवर जळमटं तयार झाली होती. आणि त्यांची जाणीवही झाली नव्हती. यावेळी पावसाने सगळी जळमटं, धूळ धुवून काढली. आठवणी ओल्या झाल्या!
एरवीचा सह्याद्री आणि पावसातला सह्याद्री यांमध्ये दिवस रात्रीचा फरक आहे. पुण्यात सिंहगडावर गेलो तेव्हा पावसाने खो घातला होता. (९ वर्षांनी सिंहगड चढलो, दीड तासात. not too shabby! :P ) पण तरी सह्याद्रीचं पहिलं दर्शन सुखावह होतं. हवेत पावसाच्या आधीचा दमटपणा होता. भजी, पिठलं भाकरी वगैरे मॅंडेटरी सोपस्कार करून पावसाची वाट पाहून उतरायला लागणार एवढ्यात धुक्याचं दर्शन झालं. पाहता पाहता ढग अंगावर येवू लागले. थंडगार वाऱ्याने मौसम सुहाना करुन टाकला. तिथून हलावंसंही वाटेना. इतक्या वर्षांचे तहानलेले आम्ही त्या ढगांमध्ये बराच वेळ वारा पीत राहिलो. धन्य झालो!
खरंतर ही फक्त सुरूवात होती. साताऱ्यात आलो त्याच्या दुसऱ्याच दिवशी सज्जनगड, ठोसेघर असा बेत ठरला. गाडीने आम्ही सज्जनगडाच्या पायथ्याशी पोचलो तेव्हाच जोरदार पाऊस सुरु झाला होता. टोप्या छत्र्या सावरत चढायला सुरूवात केली. सज्जनगडाला फारतर दोनशे पायऱ्या असतील. सुबक घोटीव दगडी पायऱ्या. त्यांच्यावरून वळणे घेत चढत असताना, खालच्या खोऱ्यात जे काही निसर्गदर्शन होत होतं, त्याचं वर्णन करायला माझ्याकडे शब्द नाहीत. धुकं, पाऊस, हिरवेगार डोंगर-दऱ्या, पायाखालचे ओले दगड, लाल माती, पाण्याचे लोट, चिखल, रिपरिप पाऊस आणि मधेच जोरादार सळक या सगळ्याचं मिश्रण हे अवर्णनीय होतं. थेट लहानपणात घेऊन जाणारं! लहानपणी शाळेत आपण ‘माझा आवडता ऋतू - पावसाळा’ असा निबंध लिहायचो. त्यात धरणीमातेने जणू काही हिरवा शालूच पांघरला आहे वगैरे ठराविक वाक्यं असायची. त्यावेळेस त्या शालूचं काही वाटायचं नाही. घरका शालू ओढणी बराबर असल्यासारखं. पण घर सोडून ८ वर्षं राहिल्यावर आपण निबंधात exactly काय लिहायचो हे कळलं!
आता या ठिकाणी रावीला थोडं फुटेज ठेवणं अपरिहार्य आहे. मला नेहमी असा प्रश्न पडतो, की महाराष्ट्र सोडून एवढ्या लांब कुठेतरी मुलांना वाढवत असताना आपल्या आई वडिलांची मुळं त्यांना अगदी आपलीशी नाही, तरी ओळखीची वाटतील का? प्रश्न अजून सुटलेला नाही; पण जीव थोडा भांड्यात पडला यावेळेस. सिंहगडावर रावीने तुटक्या हाताने लढाई करणाऱ्या तानाजीचं चित्र पाहिलं. तिच्या कुतुहलानं डोकं वर काढलं आणि मी ते पडत्या फळासारखं झेललं. त्या दिवसापासून घरी दारी, झोपता उठता महाराजांच्या गोष्टी सुरू झाल्या. तिला जिकडे तिकडे मावळे, घोडे, गनीम दिसू लागले. आम्ही या सुट्टीत ३ गड सर केले. सज्जनगडावर रावीने सुरूवातीला ‘माझ्या बुटात पाणी जातंय’ अन् ‘छत्रीचं पाणी अंगावर पडतंय’ अशी रडकी सुरूवात केली, पण ५-१० पायऱ्यांतच तिच्यात महाराज संचारले. मग ती गड सर करूनच थांबली. मला छान वाटलं, पण कृतकृत्य वाटण्याचा क्षण पुढेच होता.
गडावर आम्ही रामदास स्वामींचं दर्शन घेतलं, मठात जाऊन आलो आणि मग प्रसादाच्या पंगतीला बसलो. सज्जनगडावर रोज आमटी-भाताचा प्रसाद असतो. अगदी साधं सात्विक अन्न. गोड्या मसाल्याची पातळ आमटी, भात, उसळ आणि खपली गव्हाची पाणी घालून (दूध नाही) केलेली खीर असा बेत. बसल्यावरच 'श्रीराम जयराम जय जय राम' चा गजर सुरू झाला. ताटं मांडली गेली, वाढायला सुरूवात झाली. सगळं वाढून होईपर्यंत सर्वांच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या रामनामाने त्या अन्नावर आणि लोकांवर जणू संस्कार होत होते. मंतरलेलं वातावरण होतं. आमटी भाताच्या त्या पहिल्या घासाचं काय वर्णन करू! त्या पहिल्या घासातच ब्रह्मानंदी टाळी लागली.
मला उत्सुकता होती रावीची. पंगतीला खाली बसून हाताने भात खाणं मीही कितीतरी वर्षांनी करत होते, रावीची तर पहिलीच वेळ. एरवी तिचे खाण्याचे ४ वर्षे वयाला साजेसे नखरे असतात. मी तिला ‘इथे चमचे आणि पेपर नॅपकिन्स नसतात’ असं सांगून ठेवलं होतं आणि भरवण्याची तयारीही केली होती. पण आज तिने धक्के द्यायचंच ठरवलं होतं. १५ मिनिटात आपल्या हाताने तिने सगळं ताट स्वच्छ करून टाकलं. मिटक्या मारत. आणि म्हणाली ‘मला अजून भात हवाय’. हाच तो क्षण! ही जादू त्या वातावरणाची, रामनामाची का फक्त तिला चढून भूक लागली होती, मला माहित नाही. पण त्या क्षणी मला आभाळ ठेंगणं झालं होतं. त्या वेळेस मला वाटलं, मुलं कशी निपजतात, यात त्यांच्या जडणघडणीचा मोठा वाटा असतोच, पण जीन्सही आपलं काम करतच असतात. अशा कधीतरी अनाहूत क्षणी ते आपलं अस्तित्व दाखवून देतात.
अशा या हाय नोटवर आम्ही सज्जनगड उतरलो. पुढे ठोसेघर आणि मग परळी ते सातारा पदयात्रा. तेव्हाही खूप मजा आली, पण या वरच्या क्षणानंतर मला ते फिकं वाटतंय, त्यामुळे इथेच थांबते. प्रतापगड, पांचगणी, वाई पुढच्या भागात.
सिंहगड - सह्याद्रीचं पाहिलं दर्शन
सिंहगडावरचे विधी १
सिंहगडावरचे विधी २
निवांतपणा
ठोसेघरचा धबधबा
सज्जनगड - श्री समर्थ महाद्वार
सज्जनगडावरून
No comments:
Post a Comment