साताऱ्यात आणि एकूणच भारतात आल्यानंतर खादंतीला ऊत आला होता. तो अगदी निघेपर्यंत ओसरला नाही. यावेळी तर पावसाचे असे खास पदार्थही होते. गरमागरम खमंग खेकडा भजीला आणि बटाटेवड्यांना पावसाची ऍडिशनल चव असेल तर जी काय मौज येते, ती कॅलिफोर्नियात कशी बरं यावी! प्रयत्नही करू नये. महाबळेश्वरच्या धुक्यात, ओलसर थंडीत, रिपरिप पाऊस पडत असताना मक्याच्या कणसाची चव द्विगुणित नाही दहा गुणित होते. याशिवाय पावसाळ्याची खास फळंही यावेळेस लय दिसांनी चाखली. (अॅक्चुली हाणली). हापूस अगदी निसटता हाती लागला. फणसाचं तोंड क्ष वर्षांनी पाहिलं. पपई, पेरू, सीताफळं, चिक्कूही मिळाले.
प्रतापगड चढताना जांभळं, करवंदं, गरे यांनी मजा आणली. रावी जांभळांवरच होती. खायला रानमेवा, आजुबाजूला रान आणि ऐकायला रानातल्या गोष्टी. दोन pairs of आजीआजोबा होते तिचा शब्द न् शब्द झेलायला. मजा करून घेतली तिने.
प्रतापगडावर महाराजांचा मोठा अश्वारूढ पुतळा आहे. त्याभोवतीचा चौथरा आणि इतर बांधकाम सुरेख आहे. कड्यावरून जावळीच्या खोऱ्याचं हिरवंगार भव्य दर्शन झालं. कुठल्याही गडावर जाऊन असं कड्यावरून खाली पाहिलं की त्यावेळेस कसे वेढे भेदले असतील, कसे घोडे वर चढले असतील, या उंचसखल मावळप्रांतात कशा लढाया झाल्या असतील असे प्रश्न पुन्हा पडल्याशिवाय रहात नाहीत. प्रतापगडावर थक्क करणारी आणखी एक गोष्ट पाहिली. महाराजांचं एक पत्र दरवाज्यात मोठ्या बोर्डवर लिहीलेलं आहे. महाराजांच्या दूरद्रुष्टीचा हा मला आधी माहित नसलेला पैलू. त्यात महाराज आपल्या सरदारांना उद्देशून म्हणतात, “शस्त्रास्त्रे किंवा आरमाराच्या कामासाठी लाकडाची गरज लागते. हे लाकूड आपल्या प्रांतात मुबलक आढळणाऱ्या साग आदी झाडांचे वापरावे. फणस, आंबा इ. झाडे रयतेने आपल्या पुढच्या पिढीसाठी लावलेली व जतन केलेली असतात. त्याशिवाय अशी झाडे तोडल्याने पर्यावरणाचे नुकसान होते. एखादे फळझाड अगदी निकामी झाले असल्यासही मालकाच्या संमतीने तोडावे. बळजबरी कदापिही करू नये!” रयतेची आणि मातृभूमीची अशी काळजी घेणारा नेता विरळाच. ४०० वर्षांपूर्वी तो आपण जिथे उभे आहोत त्या मातीत होऊन गेला, या विचाराने शहारा आला!
मी लहान असताना आम्ही २ वर्षं वाई आणि १ वर्ष पाचगणीत होतो. त्यावेळच्या माझ्या शाळा बघून आलो. त्यावेळच्या घरांचं दर्शन झालं. आठवणी ताज्या झाल्या. पाचगणीच्या टेबल लॅंडवर जिथे आम्ही घोड्यावर रपेट मारायचो, तिथेच रावीनेही मारली. आपल्या अशा लहानपणीच्या गोष्टी आपल्या मुलांना दाखवण्यात एक वेगळीच मजा असते. त्याच इंटेन्सिटीने त्या त्यांच्यापर्यंत पोचत नाहीत. कशा पोचणार? पण मजा वाटते एवढं खरं.
महाबळेश्वर, पाचगणी आणि वाईमध्ये पाऊस आणि आठवणींमध्ये भिजून आम्ही वाईत मावशीकडे थांबलो. तिच्या पाहुणचाराचा समाचार घेऊन निघण्याआधी ढोल्या गणपतीच्या दर्शनासाठी कृष्णेच्या घाटावर आलो. तिथे शेजारीच माझी शाळा आहे. लहानपणी कधी शाळा सुटल्यावर आम्ही घाटावर यायचो. कृष्णामाई उत्सवात या घाटावर गाण्याच्या मैफिली, नाटकं पहायचो. पावसाळ्यात नदीला पूर आला की घाटच काय, मंदिराचा कळसही पाण्यात असायचा. मी खरंतर फार देवभोळी नाही. या आठवणी ताज्या करण्यासाठी असेल, पण मला गणपतीला जायचंच होतं.
त्या दिवशी संकष्टी होती. मनोभावे बाप्पाला नमस्कार करत मी गाभाऱ्यात पोचले. गणपतीची महाकाय दगडी मूर्ती माझ्यापासून २ फुटांवर होती. मूर्ती डोळ्यात साठवून मी हात जोडून नतमस्तक झाले आणि काहीतरी वेगळंच वाटू लागलं. गळा दाटून आला आणि डोळ्यातून पाणी येऊ लागलं. भावनावेग, पण अगदी अनोळखी भावना. होमसिकनेस, आप्तेष्टांना खूप दिवसांनी भेटल्याचा आनंद, जुन्या आठवणींना उजाळा, त्या त्या वेळी आपलं घर मानलेल्या ठिकाणांचं दर्शन या सगळ्यांचं साठलेलं रडू असेल कदाचित. त्या त्या वेळेस मोठेपणाच्या बंधनांनी अडवून ठेवलेलं. बराच वेळ ते मला आवरत नव्हतं. या भावनांच्या निचऱ्यासाठी मी बाप्पाची ऋणी आहे. स्थलमहात्म्य म्हणतात ते हेच असावं! या दिवसाचीही हाय नोट वर सांगता झाली.
एकूण यावेळची भारतवारी खास झाली. पावसाने समाधान दिलं. पुढच्या वर्षभराला पुरेल एवढं पेट्रोल आम्ही आमच्या टाकीत भरून घेतलं. इंजिनात वंगण घातलं. पावसानं धुवून गाडी चकचकीत करून टाकली. आता अजून तरी लोण्यासारखी पळते आहे.
प्रतापगड
प्रतापगड
टेबल लँड, पांचगणी
No comments:
Post a Comment