Monday, August 20, 2018

शाळेचा पहिला दिवस!

रावीचा - म्हणजे माझ्या मुलीचा केजीचा आज पहिला दिवस होता. आत्तापर्यंत प्रिस्कूल - म्हणजे फक्त डबा खायचा, खेळायचं, झोपायचं आणि पत्रावळी भरभरून रंगकाम करायचं असं वेळापत्रक होतं. 

रावीला अगदी दीड वर्षांची असल्यापासून शाळेत जायची सवय आहे. अगदी ९ ते ६. तरीही त्याबद्दलचा गिल्ट, शाळेत कसं होईल यांचे काळजीवजा विचार अशा आई-सुलभ भावना १० दिवसांपासूनच माझ्याशी खोखो खेळत होत्या. शाळेच्या पेन्सिल, मार्कर, रंगपेट्या वगैरे सामानानी भरलेला खोका आम्ही वीकेण्डला तयार ठेवला होता. नवीन गोष्टींवर नावं घालायचा पहिलाच अनुभव. आतापर्यंत दुपारी शाळेत गुरगुरीत २ तास झोप काढायची तिला सवय होती. आता दुपारची झोप बंद. थोडाफार का होईना, अभ्यास सुरू. 

आज शाळेचा पहिला दिवस आहे हे पूर्ण विसरून नेमकी आजच मी तिच्या डाॅक्टरांची अपाॅइंटमेंट घेतली होती. वार्षिक चेकअप होतं, विशेष काही नाही. पहिल्याच दिवशी शाळेत उशीर होणार होता, पण इलाज नव्हता. सकाळी उठल्या उठल्या तिने पुन्हा एकदा खात्री करून घेतली.

“आई इंजेक्शन नाहीए ना आज?” 

“नाही गं बाई. डाॅक्टर फक्त तपासणार.”

हे ऐकून तिचं समाधान झालं. 

आम्ही दवाखान्यात पोचलो. उंची, वजन, बाकीच्या छोट्या मोठ्या तपासण्या झाल्या. अगदी जाता जाता डाॅक्टरांनी टीबी टेस्ट करायला सांगितली. ही टेस्ट म्हणजे सुई हे मला आठवलं आणि शाळेच्या पहिल्या दिवसाचं भरीत डोळ्यांसमोर दिसू लागलं. पकडापकडी, आरडाओरड, रडारड आणि मग रुसवे फुगवे.. सगळा क्रम दिसला आणि मी पदर खोचला. “आलीया भोगासी” म्हणत डाॅक्टरांच्या मागे जड पावलांनी मी इंजेक्शन रूममध्ये पोचले. रावीला अजून कल्पना नव्हती. त्यामुळे ती ‘मी किती शूर’ अशा अविर्भावात मजेत चालली होती. 

तिथे पोचल्यावर मात्र तिला कुणकूण लागली. सुया, सिरिंजेस दिसल्या तशा तिने काढता पाय घेण्याची तयारी सुरू केली. गुरं पळायच्या आधी जशी खुरं जमिनीवर घासतात तसा मला भास झाला. मी तिला पकडलं आणि सुरू केलं, “रावी ते चित्र किती छान आहे ना?”, “रावी ते बघ तुझ्यासारखं पेन” वगैरे. क्षणभर ‘आपली आई आत्तापर्यंत बरी होती’ असे एक्सप्रेशन देऊन तिने मुद्द्याला हात घातला. “आई मला इंजेक्शन नकोय”.

इतक्यात नर्स काकूंनी मला तिला मांडीवर घेऊन बसायला सांगितलं. आम्ही बसलो. नर्स काकू आणखीही काही सूचना देत होत्या; पण मला फक्त त्यांचं हलणारं तोंडच दिसत होतं. मी पूर्ण शक्तीनिशी रावीला धरून बसले होते. रावी रडकुंडीला आलीच होती, मी भोकाडाची वाट बघत होते. सगळी तयारी झाल्यावर नर्सकाकू म्हणाल्या, “आय वुइल् नीड हर राईट आर्म”. म्हणजे असं म्हणाल्या असाव्यात. मला काही ऐकू आलं नाही. मी “साॅरी, कम अगेन” ची जुळवाजुळव करत असतानाच अहो आश्चर्यम्! रावीने फ्राॅकची बाही मागे सारून हात पुढे केला! तिच्या मेंदूतलं बटण आॅन झाल्यासारखी ती पालटली. सुई जेव्हा त्वचेला स्पर्श करते ते मी आजही पाहू शकत नाही. आणि ही चिंटरी धीटाईने ते डोळे रोखून पहात होती, हू की चू न करता! माझा वासलेला आ बंदच होईना. ते सगळं पार पडल्यावर मी तिच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला. “कसं असं झालं?” या प्रश्नावर तिने भाव खाऊन घेतला. मी कशी फ्रूट्स आणि व्हेजीटेबल्स खाते, त्यामुळं कशी मला शक्ती आलीए, वगैरे संवाद झाले. आम्ही गाडीत बसून शाळेत जात असताना ती स्वत: सुद्धा ‘असं आपल्याला कसं झालं’, याचा विचार करत असावी. मधेच म्हणाली, “आई जेव्हा तुला माझ्यावर प्राउड वाटतं, तेव्हा मला खूप हॅपी वाटतं.” तिच्या असल्या नौटंकीची पूर्ण सवय असूनही माझे डोळे धूसर झाले. 

शाळेत पोचलो. मी डबा, बाटली जागेवर ठेवेपर्यंत विजयी वीर घोळक्यात इंजेक्शनची खूण दाखवण्यात मग्न झाले होते. मी तशीच उभी होते थोडा वेळ. मग वळले. आता मला तिच्यापेक्षा माझीच जास्त काळजी वाटत होती!

6 comments:

  1. Lovely write up. ह्या वेळेला रावी अगदी माझ्या डोळ्यासमोर आली सगळे करताना, तिला शाळेसाठी शुभेच्छा आणि तुला all the best

    ReplyDelete
  2. Wow! Masterpiece! All the best for her new school journey!

    ReplyDelete
  3. Ravi ani tu dolyasamor ubhya rahilat. Khupach chan.

    ReplyDelete