रावीचा सहावा वाढदिवस यावेळेस लक्ष्मीपूजनादिवशी आला होता. लहानपणी एखादा सण रविवारी आला की त्याने ‘सुट्टी खाल्ल्याची’ हळहळ वाटत असे. तसंच यावेळेस दिवाळीने वाढदिवस खाल्ला. म्हणून मग त्यापुढच्या रविवारी करायचा ठरलं. कुणा कुणाला बोलवायचं हे तिला विचारताच तिने मारूतीच्या शेपटीपेक्षा (तिच्या भाषेत रपुंजलच्या केसांपेक्षा) लांब यादी सांगितली. मी म्हणलं, “कौन है ये लोग? कहाॅंसे आते है?” त्याकडे तिनं दुर्लक्ष्य केलं. त्यावेळेस तिच्या चेहऱ्यावरचा भावही मला संबोधून नेमकं तेच म्हणत होता. “कौन है ये लोग? कहाॅंसे आतेहै?” मग मी मुकाट्यानं यादी लिहून घेतली. तेव्हा मला सांगण्यात आलं की आपली आपण यादी ठरवून तिने परस्पर आमंत्रणं देऊन टाकली होती. त्यामुळे मी उपचार म्हणून, पत्ता बित्ता कळावाम्हणून आमंत्रणं पाठवली. मग म्हणलं बाकीची तयारी सुरू करावी. कामांची यादी करायला सुरूवात केली तसे तिच्या मित्रमंडळींचे नुकते झालेले वाढदिवस माझ्या डोळ्यांसमोर आले. वाढदिवस आता साधेसुधे राहिले नाहीत. एकतर रावीला सरासरी एका वीकेंडला एक या दराने वाढदिवसांची आमंत्रणं असतात. घर स्वच्छ करणे, ग्रोसरी आणणे याच यादीतलं हे एक काम झालंय. वाढदिवसाला जाणं. भेटवस्तूंचं बजेट ठेवावं लागतं. दुकानात जाऊन खेळणं घ्यायचं, ते गुंडाळायला कागदांचा कचरा विकत घ्यायचा, ते ठेवायला प्रेझेंटची सुंदर कागदी पिशवी घ्यायची आणि हे सगळं दर आठवड्याला करायचं. मग बड्डेला जायचं. तिथं गेलं की पोरं खेळण्यात नाहीशी होतात. ओळखीतला वाढदिवस असेल तर ठीक, नाहीतर पालक इतर पालकांशी ओळख करून घेण्याचा, आधीची थोडीफार ओळख असेल तर संभाषण सुरू करण्याचा किंवा ओळख लागत नसेल तर मेंदूला ताण देण्याचा प्रयत्न करत असतात. (एकदा अशाच एका बड्डे पार्टीला माझा नवरा रावीला घेऊन गेला होता. सगळी पार्टी झाल्यावर तो तिसऱ्याच कुणालातरी शुभेच्छा देऊन 'आता आमच्या घरी या' वगैरे म्हणून आला होता.) बड्डे टू बड्डे भेटणाऱ्या या इतर सहपालकांशी बोलून बोलायचं तरी काय हा प्रश्नच असतो. हवामानाच्या तक्रारी करून करून किती करणार! मग बाबा मंडळी ॲाफिस आणि क्रिकेटवर घसरतात. आणि मम्मा गोटात शाळा, प्रोजेक्ट यांच्या गोष्टी सुरू होतात. मग पिझ्झा आणि केक खायचा आणि रिटर्न गिफ्ट घेऊन घरी यायचं. त्या दिल्या - घेतलेल्या भेटवस्तूंच्या पिशव्यांमधल्या गोष्टी घरी जाऊन खेळाच्या बादलीत पडल्या की त्यांचा कार्यभाग उरकला. भारतीय लग्नांना जसं बिग फॅट इंडियन वेडिंग म्हणतात, तसे काही बड्डेपण बिग फॅट असतात. त्यांना एक ‘थीम’ असते. म्हणजे एक सामायिक संकल्पना असते. उदा. मिकी माऊस किंवा कुठलीतरी एक परी. मग त्या बड्डेच्या स्थळाची सजावट, केक, केकवरची कॅंडल, यजमान कुटुंबाचे कपडे, रिटर्न गिफ्ट्स, पार्टीच्या टोप्या सगळं झाडून त्या कल्पनेला अनुसरून असतं. भलामोठा जेवणाचा घाट असतो. काही बड्डे पूर्णपणे आउटसोर्स्ड असतात. इथे लहान मुलांना खेळण्यासाठीचे 'प्ले एरिया' आहेत. म्हणजे एका मोठ्या हॉलमध्ये बरीच खेळणी, घसरगुंड्या, झोपाळे, भुयारं वगैरे तयार केलेली असतात. अशा ठिकाणी बड्डेची पॅकेजेस असतात. त्यात खेळ, खाणं, रिटर्न गिफ्ट्स सगळं समाविष्ट असतं. असे बड्डे म्हणजे खिशाला खड्डे. खरं सांगायचं तर वाढदिवसाला मुलांना फक्त केक कापणे/खाणे आणि मित्रमंडळींबरोबर मनसोक्त खेळणे यातच रस असतो. आपापल्या बाब्याला घेऊन आलेल्या अतिथी आई - बाबांना फार तर जेवणात रस असतो. फक्त शनिवार रविवार जरा निवांत मिळतात त्यांना. त्यामुळे सगळ्यांच्या मनात 'या दोन तासात सोफ्यावर पसरून नेटफ्लिक्स अँड चिल करायला कसं वाटलं असतं' असे विचार असतात. वाढदिवसाच्या भेटवस्तू या प्रकारातही मुलांना त्याचं वेष्टन काढेपर्यंतच रस असतो. आत काय आहे हे कळलं की त्या भेटवस्तू कपाटाचं धन होऊन जातात. कंझ्युमरिझमची मुलांशी एवढ्या कोवळ्या वयात ओळख होते. हॅलोविन, ब्लॅक फ्रायडे, व्हॅलेंटाईन दिवस यांच्या जोडीला वाढदिवसही. या दिवसांपोटी पैशांची प्रचंड उलाढाल होते. वस्तूंमागून वस्तू घरी येतात आणि पडून राहतात. 'आपल्या वाढदिवसाला त्यांनी आपल्याला अमूक तमूक दिलं होतं' असल्या ताणापोटी आणलेली कसली ती भेट? एखादं हाती तयार केलेलं कार्ड, स्वतः लिहिलेलं पत्र, खाऊ वगैरेही भेटवस्तू असूच शकते. हा सगळा विचार करून आम्ही यावेळेस थोडा वेगळा बड्डे करायचा ठरवला. आई बाबांना सांगितलं, मुलांना आमच्याकडे सोडून तुम्ही तुमचे मुले-विरहित २-३ तास घालवा. भेटवस्तू आणू नका असंही सांगितलं. (आता ते अगदी काहीच लोकांनी ऐकलं ही गोष्ट वेगळी). रिटर्न गिफ्ट म्हणून एकेक डाळिंब (आमच्या अंगणात डाळिंबाचं झाड आहे) दिलं. मुलांना मज्जा म्हणून बोलणारे पक्षी बोलावले होते. (इथे राहणाऱ्या एका जोडप्याचा हा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे ५-६ पाळीव पक्षी आहेत. ते त्यांना बोलायला, छोट्या मोठ्या करामती करायला शिकवतात आणि अशा पार्ट्यांमध्ये हे पक्षी लोकांचं मनोरंजन करतात.) या दोन-तीन तासांचा सदुपयोग करून कुणी पालक बऱ्याच दिवसांनी डेटवर जाऊन आले, कुणी आठवड्याची कामं उरकली. मुलांनीही खूप मजा केली. बड्डे गर्ल एकदम तोऱ्यात होती. दिवसभर नाचून ती आणि २-३ तास वीसेक पोरांना हाकून आम्ही अर्धमेले झालो होतो. संध्याकाळी लवकर झोपून गेलो. एकूण, दिवस छान गेला. रावी आणि रावीचे पालक थोडे मोठे झाले.
छान ग! आईबाप नक्की दुवा देत असतील तुम्हाला! :D
ReplyDeleteया गिफ्ट प्रकाराने अगदी वैताग आला होता. त्यामुळे आम्ही पण गेली २ वर्षं गिफ्ट – रिटर्न गिफ्ट प्रकारांना फाटा दिलाय. सुदैवाने आता आमच्या सोसायटीमध्ये पण बरेचसे नो गिफ्ट्स बड्डे व्हायला लागलेत. गिफ्ट न्यायचंच असेल, तर सरळ तेवढ्या पैशाचं जवळच्या दुकानाचं गिफ्ट कुपन देतो हल्ली.