मिळतच नाही आम्हां प्रेरणा
नवी पिढी पेचात
अभेद्य कवचे आम्हाच भवती
कशी शिरावी आत
सृष्टी टाके ओवाळुनिया
चैतन्याचा झरा
दैव देते, नेते कर्म
अशी आमुची तऱ्हा
बोथट संवेदना तयांना
प्रेरणा ना सापडे
सदैव त्यांवर पांघरलेली
तंत्राची झापडे
कुठे नभी रंगांची वर्षा
कुठे प्रशांत निळाई
लता-फुलांतून उमटवलेली
कुठे निसर्ग रुबाई
इंद्रधनुष्ये कधी तर कधी
ऋतूंत स्थित्यंतरे
परंतु कॅमेऱ्याची
त्यांच्या-आम्हांमध्ये अंतरे
बाळाचे निष्पाप बोळके
हसू स्निग्ध सुकुमार
गूगल तेव्हा आम्ही करतसू
दात कधी येणार
बदकांचा तो थवा पोहतो
उठवुन तरंग जळावरी
ते न पाहता आम्ही तरंगू
इन्स्टावरच्या रिळांवरी
तंत्राचा सत्कर्मी वापर
मनोमनी आकळो
कवच तयाचे भेदायाची
आम्हां प्रेरणा मिळो!
No comments:
Post a Comment