स्टॅन्ड अप कॉमेडी हा एक नवा कलाप्रकार हल्ली प्रचलित झाला आहे. स्टॅन्ड अप कॉमेडीकार तसे मराठी माणसाला नवे नाहीत. पुल, वपु किंवा शंकर पाटलांची कथाकथनं हा घराघरात चवीनं ऐकला, चर्चिला जाणारा प्रकार होता, आहे. किस्से, चुटकुले, शाब्दिक कोट्या, राजनैतिक भाष्य, नकळत प्रबोधन आणि मुख्य म्हणजे विनोद हे सगळे घटक जरी तसेच असले तरी आज स्टॅन्ड अप कॉमेडीच्या प्रयोगांना एक रचना, एक ठराविक स्वरूप आलं आहे. हे प्रयोग अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत.
'करून तर पाहू' अशा विचाराने मी या वर्षी पहिल्यांदाच स्टॅन्ड अप कॉमेडीच्या या नव्या पाण्यात उडी घेतली. आणि लवकरच आपण गटांगळ्या खाणार अशी खात्रीच वाटू लागली. मी आजपर्यंत नाटकं लिहिली / केली आहेत, वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाषणं केली आहेत, गाण्याच्या कार्यक्रमांचं निवेदन केलं आहे, माफक विनोदी लेखनही केलं आहे. मला वाटलं असून असून काय वेगळं असणार आहे? पण लोकांना हसवणं हे काही येरागबाळ्याचं काम नाही, हे पुन्हा एकदा वेगळ्या प्रकाराने शिकायला मिळालं. माझ्या स्टॅन्ड अप प्रवासाची ही गोष्ट.
वर उल्लेख केलेल्या बेडकाच्या आत्मविश्वासाने मी स्टॅन्ड अप कॉमेडीच्या पहिल्या प्रयोगाला हो म्हणलं. स्टॅन्ड अप म्हणजे नाटकासारखं कुणीतरी संहिता हातात आणून देणार, दिग्दर्शक पुढचं शिकवणार असले लाड नाहीत. (ते फार सोपं आहे, असं माझं मुळीच म्हणणं नाही.) त्यामुळे आधी लिखाण आलं. आम्ही ९ जण दीड तासाचा प्रयोग करणार होतो. त्यामुळे प्रत्येकाच्या वाट्याला दहाच मिनिटांचा भाग होता. ही दहा'च' मिनिटे नसून दहाSSS मिनिटे आहेत याची लवकरच उपरती झाली. दहा मिनिटे पुरतील एवढे विनोद लिहिणे हे एक शिवधनुष्य वाटायला लागलं. मला जे कागदावर तुफान विनोदी वाटत होतं, ते तोंडी अतिशय गरीब-बिचारं, केविलवाणं वाटू लागलं. या सगळ्या प्रकारातून काढता पाय घ्यावा की काय अशा विचारात असताना म्हणलं थोडा याचा अभ्यास करून बघावा.
विनोद हा प्रकार जेवढा उत्स्फूर्त तेवढी त्यात जास्त मजा आपल्याला वाटतं. पण या कलेलाही एक तांत्रिक बाजू आहे. (इंग्रजीत ज्याला क्राफ्ट म्हणतात ते.) म्हणजे एखादं शिल्प जसं तासून तासून संयमाने घडवत जावं लागतं, तसाच एक एक विनोद घेऊन त्याची चिरफाड करून त्याला तासून काढलं की मगच तो सादर करण्यालायक होतो, आणि जेवढी चिरफाड, तासणी, अभ्यास जास्त तेवढा तो विनोद मंचावरून एफर्टलेस, सहज वाटतो. ही तासणी म्हणजे अनेक प्रकारची असू शकते:
१. शब्दांची निवड: शब्दांची चपखल निवड ही एक अतीव महत्वाची गोष्ट आहे. बरोब्बर शब्द मिळाला की विनोद अनेक पटींनी सुरेख होतो, थेट 'ये हृदयीचे ते हृदयी' भिडतो.
२. शब्दांची / वाक्यांची रचना: प्रत्येक विनोदाची एक पंचलाईन (ब्रीदवाक्य?) असते. जे वाक्य तुमचा विनोद पोचवतं. हे वाक्य कसं, कुठे, किती वेळा यावं यावर विनोदाचा प्रभावीपणा खूप अवलंबून असतो. या वाक्याबरोबर प्रयोग करून बघितल्यावर मला आपलाच विनोद नव्याने भेटू लागला. त्याची जातकुळी बदलता येऊ लागली. एकाच वाक्याची किंवा शब्दाची केवळ जागा बदलल्याने खूप काही बदलतं आणि हे अनुभवणं हा एक सुंदर अनुभव होता.
३. गरजेपुरते शब्द: ही मला वाटतं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि काळाबरोबर ती जास्तच महत्वाची होणार आहे. फक्त विनोदासाठीच नव्हे तर सगळीकडेच. आपल्या भावना नेमक्या पोचवता येतील तेवढेच शब्द वापरणे ही एक अवघड गोष्ट आहे. जे तुम्ही बोलताय त्याच्यापेक्षा जे बोलत नाही आहात ते महत्वाचं आहे. कविता लिहितानाही या कौशल्याचा कस लागतो. इथेही तोच प्रकार आहे. जेवढे नेमके आणि कमी शब्द तेवढा प्रभावी विनोद असं ढोबळ गणित आहे.
पहिला मसुदा तयार झाल्यावर मी आमच्या टीम बरोबर ते सगळं म्हणण्याचा सराव करू लागले. त्या ब्रेन स्टोर्मिंग मुळेही अनेक कल्पना मिळाल्या, आहेत त्या कल्पना ठाशीव करण्यासाठी अभिप्राय मिळाले.. हे सगळं अतिशय मौल्यवान होतं.
तशी मला स्टेजची सवय आहे. पण इथे पूर्ण १० मिनिटे तुम्ही एकटेच स्टेजवर. लोकांना अखंड आपल्याबरोबर धरून ठेवायचं, हसतं ठेवायचं, त्यांच्याशी १:१ संवाद साधायचा हे सगळं नवीन होतं. त्याची तयारी करण्यासाठी आम्ही सगळे एकत्र येऊन आमचे सेट सादर करत असू. ते परत परत चावून चघळून चोथा झाले होते, त्यामुळे आपल्याच विनोदांचा कंटाळा येऊ लागला होता. पण नवीन लोकांसमोर सादर केलं तर पुन्हा वेगळा अनुभव मिळत होता.
आधी मला माझ्या दोन वाक्यांमधला विराम अतिशय अस्वस्थ करत असे. त्यामुळे मी माझा अख्खा सेट न थांबता म्हणत असे. एकदा गाडी सोडली की विना वाहक विना थांबा ती शेवटाकडे येऊन पोचत असे. या प्रकारात विरामांबरोबर मी प्रेक्षकांकडेही सपशेल दुर्लक्ष करत होते. जिथे लोक हसायला हवेत, तिथे न थांबल्यामुळे लोक नुसतेच तोंड फाकवल्यासारखं करत आणि मला वाटे आपला विनोद म्हणजे अगदीच ह्या आहे. पण एकदा माझ्या कुटुंबासमोर सादर केल्यानंतर माझ्या डोक्यातली खिट्टी सैल झाली. मग मी पुन्हा तोच सेट दमानं, विरामांना न घाबरता सादर केला. लोकांना बरेचसे विनोद तेव्हा पहिल्यांदा कळले. अशा अनुभवांनी मला खूप शिकवलं.
मला गर्भगळीत करणारा अजून एक प्रकार म्हणजे प्रेक्षकांसोबत संवाद साधणे, ज्याला क्राउड वर्क म्हणतात. इथे उत्स्फूर्तता लागते. लोकांना सामील करून घेणे, त्यांच्या कथा ऐकणे, त्यातून शुद्ध विनोद निर्मिती करणे, हे कसलेल्या विनोदवीरांनाच जमतं. बरेचदा समोरच्या प्रेक्षकाची खिल्ली उडवण्याची पळवाट लोक अवलंबतात. हे कितपत करायचं, खिल्लीची सीमा कशी ओळखायची हा ज्याचा त्याचा प्रश्न. मी काही याचे फार प्रयत्नच केले नाहीत. जुजबी थोडंफार लोकांशी बोलत होते, पण तेवढंच.
स्टॅन्ड अप शो मध्ये होणारा शिव्यांचा वापर हा एक मोठा विषय आहे. त्यावर अनेक मत-मतांतरं आहेत. माझ्या मते लोकांना न दुखावता (हल्लीच्या काळात एरवीच हे एक शिवधनुष्य झालंय, कॉमेडी शोज मध्ये तर वेगळीच गोष्ट), आपली गोष्ट पोचवण्यासाठी जसे शब्द योजायचे असतील त्याची मुभा कलाकारांना हवी. पण हेही नक्कीच म्हणेन विनोद आणि शिव्या यांचा काहीही संबंध नाही आणि तो असू नये. विनोदात शिव्यांचं स्थान हे कुबड्यांचं आहे.
बरेचदा विनोदाचा वापर आपल्या पोटात खदखदणाऱ्या जाणिवा पोचवण्यासाठी लोक करतात. यासाठी विनोदासारखं दुसरं माध्यम नाही. हसवत, कोपरखळ्या मारत, शालजोडीतून तुम्ही तुमच्या बोचऱ्या भावना पोचवू शकत असाल, तर आणखी काय हवं? जसे चित्रपट, नाटकं ही समाजमनाचा आरसा असतात, स्टॅन्ड अप शोज सुद्धा अगदी तेच काम करू शकतात.
जसजशी शोची वेळ जवळ येत होती, तसतसा पोटातला खड्डा मोठा होत होता. पण पहिला प्रयोग झाला आणि जादू झाल्यासारखा हा खड्डा गायब झाला. आपली गोष्ट मनापासून चार लोकांना सांगण्याएवढं सोपं होतं हे. त्यांचं हसू हा खणखणीत बोनस. एकदा स्टेजवर गेल्यानंतर तांत्रिक तयारी, क्राफ्ट, शब्दांचा क्रम वगैरे सगळं मागे पडलं (अर्थात त्या तयारीमुळेच हे एवढं सहज वाटू शकलं) आणि उरली निव्वळ गोष्ट. एकाच वेळी ५० लोकांशी जुळलेलं नातं. त्यांच्या चेहऱ्यावरचा अमूल्य आनंद, हसू.
या अनुभवाची चांगलीच किक बसली आणि आम्ही त्या पहिल्या प्रयोगानंतर आणखी ६ हाऊसफुल प्रयोग केले. (८वा येतोय लवकरच). मी अजून नवशिकी आहे आणि करून बघण्यासारखं खूप काही आहे. पण मजा मात्र खूप आहे.
या अनुभवामुळे माझी विनोदाशी घट्ट ओळख झाली. विनोदात ताणतणाव, कपाळावरच्या आठ्या, गंभीर चेहरे यांना थोडा स्वल्पविराम देण्याची शक्ती आहे. केवळ एका विनोदात पूर्णतः अनोळखी लोकांमध्ये तात्काळ एक बंध निर्माण करून टाळीची देवाण घेवाण घडवण्याची शक्ती आहे. विनोद ही केवढी सुंदर गोष्ट आहे!
No comments:
Post a Comment