Sunday, December 13, 2020

मुक्त

यंदा पावसाने वाडी झोडपून काढली होती. अंगणातला कुंद बिचारा कसाबसा तग धरून होता. आज सकाळपासून जो जोरदार पाऊस लागला होता, तो आत्तापर्यंत कोसळत होता. सगळीकडे लाल चिकचिकाट झाला होता. मुसळधार पावसाचा आवाज, पागोळीची वेगळीच संततधार रिपरिप, मधेच वीजेचा कडकडाट आणि दूरवरची समुद्राची गाज.. सगळं मिसळून गेलं होतं. हवेत गारवा होता. ओल पडवीपर्यंत आली होती. दुर्गाक्का ओसरीत कंदीलाच्या मिणमिणत्या उजेडात गोणत्यावर पाय पसरून बसली होती. तिचे ओठ आपसूक श्लोक पुटपुटत होते. हात आपसूक दुखऱ्या गुडघ्यांवरून फिरत होते. कंदीलाजवळ जी चिलटं, पाऊसकीडे घोंगावत होते, त्यांच्याकडे बघत तिची तंद्री लागली होती


आज मुकुंदाला बराच वेळ लागला होता. तो बावलीहून येताना दुर्गाक्काच्या झोपेच्या गोळ्या घेऊन यायचा होता. हल्ली झोपेच्या गोळीशिवाय तिच्या डोळ्याला डोळा लागत नसे. माजघरात मिट्ट काळोखात गादीवर पडल्या पडल्या तिच्या टकटकीत डोळ्यांना ब्रम्हांड दिसत राही. आतून कोरडं कोरडं वाटत राही. अशा वेळेस झोपेची गोळी घेतली की अलगद सगळ्याचा विसर पडून कधीतरी डोळा लागत असे


एवढ्यात कवाड वाजलं. दुर्गाक्काची तंद्री भंगली. मुकुंदा छत्री मिटवून आत आला. तो जवळजवळ नखशिखांत भिजला होता. लेंग्यावर राड झाली होती. त्यानं लगलीच खिशातल्या गोळ्यांचं पाकीट दुर्गाक्काच्या हातात दिलं.


म्हातारे, पावसा-पाण्याची इथं कशाला बसलीस? आत पडायचं होतंस. उशीर झाला आज.”

रे तो व्हायचाच. एवढा रांचा कोसळतोय राक्षस. एवढ्या पावसात यष्टीचा मेलीचा कुठला नेम!”

यष्ट्या सगळ्या अर्धा अर्धा पाऊण पाऊण तास उशिरा सोडत होते रांचे. तुझी बोट बाकी आहे होव् टायमावर उद्या. मी नं बाब्या येऊ उद्या बंदरावर. एकदा का तुला मुंबईस धाडले की मी मोकळा. सामान भरलेस ट्रंकेत?”

नाही आणखी. काय भरू नं काय नको त्या मेल्या ट्रंकेत? हा कुंद कसा भरू म्हणतोस? पडवीतला झोपाळा कसा भरू? माझी परसाची बाव कशी भरू?"

"म्हातारे हे सगळं का कुठे पळून जातंय? गुंते सोडवायची वेळ झाली तुझी आता."

"गुंता म्हण की आणखी काही म्हण. सोडवत नाही रे. आठव्या वर्षी लग्न पाऊल टाकले इथं. बरे-वाईट सगळे श्वास इथं घेतले. आठवणी आहेत रे बघावं तिथं."

"कष्टीच करणार असतील तर त्या आठवणी काय कुरवाळायच्या म्हातारे? चार लोकांत राहा, नातवंडं सांभाळ, आनंदात रहा.. लेकाकडे जा, तूपरोटी खा, जाडजूड हो चांगली…"

"हात् मेल्या."

"चल निघतो."

मुकुंदा जाता जाता ओसरीवर टांगलेल्या विठ्याच्या पिंजऱ्याला झोका देऊन निघून गेला

"विठ्या असता आत तर कलकलाट करून सोडला असता आत्ता" दुर्गाक्काच्या मनात आलं. विठ्याला माहेरून घेऊन आली होती परकारातली दुर्गा.. त्याला फार लाडात ठेवलं होतं. त्याचं हवं नको बघितलं, देखणा पिंजरा आणला त्याच्यासाठी. बोलायलाही शिकवायची त्याला. एक दिवस पिंजऱ्याचं दार उघडं राहिलं चुकून. तर बेटा गेला उडून. त्याची आठवण म्हणून हा पिंजरा तसाच ठेवला होता तिने. तो हेलकावे खाणारा पिंजरा तिनं सावरला आणि आत जाऊन पडी टाकली


दुसऱ्या दिवशी मनाचा हिय्या करून तिनं ट्रंक उघडली. जुजबी कपडे भरले. ठिकठिकाणी पारा गेलेला तिचा गोल आरसा ट्रंकेजवळच होता. परसदारीच्या पायरीवर बसून सासूबाई तिच्या आणि कुसुमवन्संच्या घट्ट वेण्या घालायच्या. मग पोरी या आरशात स्वतःला न्याहाळत केसात बागेतलं फुल माळायच्या. दुर्गाक्कानं आरशावरून आपली खरखरीत बोटं फिरवून तो ट्रंकेत भरला


सासूबाई, मामंजी आणि नंतर यजमानांनीही जिथे शेवटचा श्वास घेतला ती वळकटी भरली. देव्हाऱ्यातली अन्नपूर्णा फडक्यात गुंडाळून भरली. स्वैपाकघरातल्या फडताळातला पितळी गोल डबा.. याच्यात सासूबाई काहीबाही गोडाचं जपून ठेवायच्या. कामात दिरंगाई केली किंवा पोरांनी फार धुडगूस घातला तर क्वचित सासूबाईंच्या हातचा रट्टा मिळायचा. त्यानंतर मुसमुसून गाल लाल झालेले दिसले की त्या या डब्यातला एखादा लाडू, वडी हातावर ठेवायच्या. तो डबा पुसून ट्रंकेत गेला.  


श्रीधर झाला तेव्हा त्याच्या बारश्याला म्हादू रामोशानं - म्हणजे बाब्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी मायेनं पितळ्याचा वाळा केला होता. बाकी सगळ्या गावानं उंची सोन्या चांदीचे आहेर केले होते. पुढे गावाला आणि घराला उतरती कळा लागल्यानंतर ते सगळे दागिने कुठे गहाण पडले होते, काही विकले गेले होते. पण तो वाळा अजून दुर्गाक्काच्या तांदळाच्या डब्यात शाबूत होता. तिला सोबत करत होता. तो पदरानं पुसून तिनं ट्रंकेत भरला


करता करता संध्याकाळ झाली. कुणाच्याही लेखी काहीही किंमत नसलेल्या दुर्गाक्काच्या आयुष्याचा सारांश ट्रंकेत जमा झाला. गतवैभवाचे पोपडे, जोडलेल्या माणसांच्या एकेकाळच्या अस्तित्वाच्या खुणा, आठवणींनी लगडलेल्या फुटकळ वस्तू. तिनं अस्वस्थपणे ट्रंक बंद केली. तिच्यावरून हात फिरवत ती नुसतीच बसून राहिली


मुकुंदा आणि बाब्या बाहेर वाट बघत होते.

"म्हातारे वाड्यासकट बैस बोटीत. घेतील होव तूस." मुकुंदानी हाळी दिली


दुर्गाक्का गंभीर होती. ट्रंक सावरत ती बाहेर आली. बाब्यानं लागलीच ट्रंक तिच्याकडून घेतली. दुर्गाक्कानं घराला नमस्कार करून माजघराचा कोयंडा लावला. बाहेर येऊन चप्पल सरकवणार तेवढ्यात तिला विठ्याचा पिंजरा वाऱ्याने हेलकावे खाताना दिसला. तिनं जवळ जाऊन तो हाताने थांबवला. त्याचं दार वर केलं. क्षण ती तशीच उभी राहिली. आणि मग अचानक येऊन तिनं बाब्याकडून ट्रंक घेतली, ती उघडली. त्यातलं कपड्यांचं गाठोडं बाहेर काढलं. ट्रंक पुन्हा बंद करून आत ठेऊन आली. आणि गाठोडं बखोटीला घेऊन तरातरा रस्त्याला लागली

4 comments:

  1. आठवणी दाटतात...त्या आठवणींमधे डावे-उजवे काहीच नसते; तरीही मन घट्ट करून काहींना बाजूला सारावेच लागते. आठवणींचा सुंदर प्रवास, आणि शेवटचे वळणही जिवाला भावणारे

    ReplyDelete
    Replies
    1. सुंदर लिहिलंत. धन्यवाद!

      Delete