Sunday, July 5, 2020

सतरंगी

सतरंगी ही दुनिया वेड्या, माणूसप्राणी विरळा न्हाय,
कशापायी हे मागं म्होरं, गोरा काय न काळा काय!

डोक्यावरची कवा सफेदी सांगे अनुभवाचे बोल,
एखांदा मग करू लागतो नवेपणाच्या गोष्टी खोल,
हरेक शिकवीत असतो ऐका, मोठा काय न बाळ्या काय!
कशापायी हे मागं म्होरं, गोरा काय न काळा काय!

तांबडं रगुत माझंन् तुझं, भात्तर ठोकं नाडीला,
पायं दोन हातं दोन, दोन डोळं जोडीला,
एकच काळीज धड्धड् धड्धड्, जाडा काय न कवळा काय!
कशापायी हे मागं म्होरं, गोरा काय न काळा काय!

कट्टाळवाणं जीणं जर का हरेक जण एक साचा,
येगळा हैस म्हणूनच लेका, हैस तू महत्त्वाचा!
प्रेम कराया येतंच गड्या, नास्तिक, देवभोळा काय!
कशापायी हे मागं म्होरं, गोरा काय न काळा काय!

2 comments: